०४ डिसेंबर, २०१२

सोळावा नियम धोक्याचा

मनोगताच्या यंदाच्या दिवाळी अंकाच्या संपादकीयात शुद्धलेखनाच्या नियमांचा फारच चांगला ऊहापोह केलेला आहे.
http://www.manogat.com/diwali/2012/node/63.html

मला या विषयी काही मत मांडायचं आहे. तसं पाहिलं तर सोळावा नियमही जाचकच म्हणायला हवा. तो नियम असा..
राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत
रहाणे, राहाणे, पहाणे, वहाणे, वाहाणे, अशी रूपे वापरू नयेत.

आधुनिक विचारवंतांना हा नियम बहुधा मान्य होणार नाही व भाषेला वाहाणे आणि वहाणे हे दोन्ही शब्द पुढेमागे स्वीकारावे लागतील असे दिसते. यात हरकत अशी आहे की वहाणे हे क्रियापदाचे रूप वहाण ह्या चप्पल या अर्थाने असलेल्या शब्दावर अतिक्रमण करतो. अशा वेळी त्या शब्दाचा अर्थ संदर्भाने घ्यावा लागेल. एकच शब्द विविध पद्धतीने लिहीला गेला तरी चालेल उलट त्यामुळे भाषेतील सर्वसमावेशकता वाढेल व प्रत्येकाला आपली भाषा(च/ही) बरोबर असल्याचा दिलासा मिळेल असा युक्तिवाद करणार्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की अशाने भाषेतील शब्दांचे स्थान डगमगीत होईल व कालांतराने ती भाषा मागे पडेल. कारण लिहीताना व वाचताना संदर्भ दरवेळी लक्षात घेतला जात नाही. बोलताना संदर्भच मोलाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे भाषणात एखाद्याने "देवाला फुले वहाणे" असा उल्लेख केला की तो शब्द वाहाणे या अर्थाने आला आहे यात शंका राहात नाही. पण लिहताना व वाचताना शब्द मागे-पुढे होऊ शकतो किंवा वाचायचा राहून जाऊ शकतो. संगणकाला तर फक्त शब्दच कळू शकतो. सॉफ्टवेअरला संदर्भ कळणे तर जवळजवळ अशक्यच दिसते. म्हणजे गुगल भाषांतरातही यामुळे चुका होतील. मराठीला बोली भाषा म्हणून काहीच धोका नाही पण जर इतर भाषांप्रमाणे भविष्यात ज्ञानभाषा म्हणून प्रगती करायची असेल तर शब्दांची संपत्ती जपावी व वाढवावी लागेल. त्यासाठी प्रत्येक शब्दाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करावे लागेल. हे नियम कमी अधिक प्रमाणात असे काम करत आहेत. त्यात बदल करायचा झाला तर फार काळजीपूर्वक केला पाहिजे असे मला वाटते.