२७ मार्च, २०११

इतिहासाचे ओझे

इतिहास मग तो १ महिन्यापूर्वीचा असो किंवा ५ हजार वर्षांचा. तो आपल्याला काही ना काही शिकवत असतो. ही शिकवणी घ्यायची आणि भविष्याला भिडायचं असं अभिप्रेत असते, त्या इतिहासाचे कलेवर राजा विक्रमादित्याप्रमाणे आपल्या पाठीवर घेऊन नको तिकडे जायचे नसते. मला काय म्हणायचे आहे ते उदाहरणाने स्पष्ट करतो.

हरियाणात असे एक गाव आहे जिथे आल्यावर म्हणतात की श्रावण बाळाची मती फिरली आणि त्याने आईवडिलांकडे काशी यात्रेला घेऊन जायचे पैसे मागितले. तेव्हापासून "सो कॉल्ड" शाप हा गाव भोगतो आहे आणि कोणताही बुवा बाबा तिथे जाऊन बायकापोरांना ही गोष्ट सांगून रडवतो आणि जमेल तेवढी माया जमा करून जातो.

ही गोष्ट खरी की खोटी कोणाला माहीत? वादापुरती खरी मानली तरी तो त्या मातीचा दोष कसा मानता येईल? इमोशनल ब्लॉकमेलींगची एक से एक उदाहरणे हिंदू धर्मात मौजूद आहेत आणि त्याविषयी ब्र काढावासा कोणाला वाटत नाही. भावना दुखावणे हा फार हळवा प्रकार असतो आणि त्याचे परिणाम गंभीर स्वरूपाचे होऊ शकतात याची सर्वांनाच कल्पना असते.
_____

भटक्या जातीच्या हालाचे वर्णन करणारे एक पुस्तक मी २५ वर्षांपूर्वी वाचले होते. आता नाव विसरलो पण त्यातील मजकूर नाही. यात त्या तांड्याचा मुखीया लेखकाला सरकारी मदत नाकारण्याचे कारण सांगताना सांगतो "श्रीकृष्णाने आम्हाला तुम्ही भटकत राहा कुठेही स्थिर होऊ नका असा आदेश दिला आहे, तो मोडणे आम्हाला शक्य नाही."

आता यात खर्‍या खोट्याची शहानिशा कशी करणार? समजा खरे असेल, तरी तो आदेश आपद्धर्म म्हणून असेल. कृष्णाने स्वतःच्या जीवनात अशा काही गोष्टी (उदा. मथुरेतून पळून जाणे) अपवाद म्हणून केल्या होत्याच. आज तो कायदा समजून वागणे कितपत शहाणपणाचे आहे?

महाराष्ट्रातील एका अग्रगण्य मंदीरात लहान मुलींचे खुशाल कृष्णाशी लग्न लावून दिले जाते. मुलांचेही लावून दिले जाते. देवदासी फक्त मुलीच नाही, मुलेही बनतात म्हणे. आणि त्यांच्या जटा कापून टाकायला त्यांच्यातलाच एखादा पुढे आला तर तो होतो जातीबाहेर.

जाती-बहिष्कृत: जातीवरून आठवले. हिंदू धर्मातील विचारवंत, ख्रिश्चन धर्माशी तुलना करताना सांगतात, त्यांच्यात वेगळा विचार करणार्‍याला जाळून मारण्यात आलं, आमच्यात असलं काही नाही झालं. झालं ना सिद्ध? अहो कुठलं काय? आमच्याकडे जाळून मारण्यापेक्षा जास्त वाईट हत्यार होतं ना! जातीतून उठवणे. ज्ञानेश्वरांसारख्या सिद्ध पुरुषाला आत्महत्येकडे प्रवृत्त करणारा हा जातबाहेर प्रकार काय होता हे इतिहासाच्या अभ्यासातून कळते.

इतिहासाच्या अभ्यासातून मी खूप शिकलो. पण ते ओझे होईल असे वाटले की मी पुढे जात नाही. अभ्यास म्हणूनही नाही. कदाचित वयाचा परिणाम असेल. इतिहासाबरोबरच थकलेले शरीरही खूप काही शिकवते. नाही का?

२५ मार्च, २०११

मराठी हिंदीतील फरक

https://addons.mozilla.org/af/firefox/addon/hindi-spell-checker/

हिंदी भाषेसाठी बनलेला फायरफॉक्स स्पेलचेकर नुकताच माझ्या पाहण्यात आला. मी तो अर्थात लगेच वापरून पाहिला. त्यात मराठी / हिंदी भाषेतील एक मुलभूत फरक माझ्या लक्षात आला. टेक्निकल अंगाने व भाषाशास्त्राच्या दृष्टीनेही त्यात काही तथ्य असावे.
मराठी मध्ये जसे स, ला, ते, चा, ची, चे असे प्रत्यय लागतात तसे हिंदी भाषेत लागत नाहीत. त्यामुळे त्या भाषेतील स्पेलचेकरमध्ये केवळ पंधरा हजार शब्द असून तो स्पेल चेकर चांगला चालतो आहे. उदा..

भाषा की - भाषेची
भाषा का - भाषेचा
भाषा के - भाषेचे

मराठीत असे एका शब्दापासून अनेक शब्द बनतात तसे "तिकडे" बनत नाहीत. इकडे प्रत्येक शब्द स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखतो, पण हिंदी / इंग्रजीत असे होत नाही बहुतेक!

for language
to language

यात लैंग्वेज हा शब्द बदलत नाही. तर फॉर, टू असे प्रत्यय बदलतात. यामुळे त्या दोन भाषा जवळच्या वाटतात तशी मराठीला इंग्रजी तांत्रिक द्रष्ट्या जवळची वाटत नाही.

०६ मार्च, २०११

काळ आला आणि वेळही

सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते वंदिनस्ताः कथाः
सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ॥

ती सुंदर नगरी, तो ताकदवान राजा, त्याचे विश्वासू सरदार, त्याच्या आश्रयाने राहणारी विद्वान लोकांची सभा , चंद्राप्रमाणे सुंदर चेहऱ्याच्या स्त्रिया , उदंड असा राजपुत्रांचा समूह , स्तुती गाणारे देशी/ विदेशी भाट आणि त्या भाटांनी गायलेल्या त्या उत्तमोत्तम स्तुती हे सर्व गेले कुठे? वेळ बदलली. सद्दी संपली. वर्तमानाला इतिहासाच्या पानात ढकलून सतत पुढे जाणार्‍या काळाला नमस्कार करण्यावाचून आपल्या हातात काय आहे? सध्या जगात जे चालू आहे त्याला काळाचा आणखी एक महिमा असेच म्हणता येईल.