२० मार्च, २०२२

शुद्धलेखनाच्या नियमांचे सार

१९७२ सालापासून शुद्धलेखनाचे १८ शासनमान्य नियम अस्तित्वात आहेत.  रामाने जसे शिवधनुष्याचे तुकडे केले तसे मराठी माणसाने त्यातील ८.१ या नियमाचे तुकडे करून फेकून दिले आहेत. तर तो नियम आहे असा...

उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी ऱ्हस्व लिहावा.
उदाहरणार्थ : गरीब-गरिबाला,गरिबांना,चूल-चुलीला,चुलींना. 

अपवाद-दीर्घोपान्त्य तत्सम शब्द.
उदाहरणार्थ:परीक्षा-परीक्षेला, परीक्षांना, दूत-दूताला, दूतांना.

थोडक्यात सांगायचे झाले तर शब्दातील शेवटून दुसरे अक्षरे कधी पहिले तर कधी दुसरे काढायचे ते ब्रह्मदेव देखील खात्रीने सांगू शकणार नाहीत. ट्राफिकचे काही रूल हे फक्त "मामा” लोकांच्या वरकमाईसाठी निर्माण केले गेले आहेत असे त्या विषयातील जाणकार सांगतात. तसे हा नियम डुढ्ढाचार्य / अंकल लोकांच्या सोयीसाठी आहे असे या विषयातील जाणकार सांगतात. खोटं वाटत असेल तर कै. अरूण फडके यांनी या नियमात काय बदल सुचविला होता ते येथे वाचता येईल.

https://arunphadake.com/2011/01/01/shuddhalekhanachesulabhikaran/

10) उपान्त्य अक्षराचा दीर्घ इकार किंवा दीर्घ उकार सामान्यरूपात ऱ्हस्व लिहावा.

(महामंडळाच्या नियम क्रमांक 8.1ला हा पर्यायी नियम आहे. उपान्त्य अक्षराचा दीर्घ इकार किंवा दीर्घ उकार सामान्यरूपात ऱ्हस्व करणे, ही मराठीची प्रकृती आहे. त्यामुळे ‘वीर, पूजा, गीत’ ह्यांसारख्या संस्कृत शब्दांची सामान्यरूपेही ‘विराला, पुजेत, गितासाठी’ अशी लिहिली जातील. ‘कुटुंबीयांना’ हा शब्द अनेक वेळा ‘कुटुंबियांना’ असा लिहिला जातो आणि प्रचलित नियमांनुसार तो चुकीचा ठरतो, हे आपण पाहतोच. त्याशिवाय तो शब्द संस्कृतमधून मराठीत आला आहे हे ओळखायचे कसे हा प्रश्न इथेही आहेच.)

आमच्या शाळेतील एक शिक्षक वेळेवर न येणाऱ्या, अभ्यास न करणाऱ्या मुलांचे पुढे काय होणार याचे लेक्चर आम्हा वेळेवर येणाऱ्या मुलांना देत असत. त्याप्रमाणे कुटुंबीयांना हा शब्द अनेक वेळा कुटुंबियांना असा चुकीचा लिहिला जातो, याची शिक्षा म्हणून वीराला, पूजेत, गीतासाठी असे शब्द विराला, पुजेत, गितासाठी असे लिहावेत अशी त्यांनी केलेली सूचना कोणीही स्वीकारलेली नाही. ही सूचना बरोबर असून मी तसेच लेखन करतो असे म्हणणारा एकतरी व्याकरणतज्ज्ञ कोणाला माहीत आहे का? ही सूचना अस्वीकारार्ह आहे कारण कोणी त्यापुढे जाऊन म्हणेल की सामान्यरूपात तरी ऱ्हस्व का करा? दीर्घच ठेवला तर हा नियम अधिक सोपा नाही का होणार? (उदा. गरीब - गरीबाला, गरीबांना, चूल - चूलाला, चूलांना) आणि अगदीच पुढे जाऊन ऱ्हस्व इकार/ उकार काढूनच टाका - फक्त दीर्घ इकार/ उकार पुरेसे आहेत असे म्हणणारे देखील आहेत की! ते मान्य केले तर "चुलीत घाला तुमचे नियम" हे वाक्य "चूलीत घाला तूमचे नीयम” असे लिहावे लागेल. ही दोन्ही वाक्ये मोठ्याने वाचून पाहिल्यावर ऊंझा जोडणी मराठीच नाही तर खुद्द गुजराती भाषेने देखील का स्वीकारली नाही ते कळेल. गुजरातीचे मला माहीत नाही पण मराठीचे ऱ्हस्व / दीर्घ उच्चार अगदी स्पष्ट होतात आणि ते तसेच लिहावे लागतात हे सर्व नियमांचे सार आहे.