०९ डिसेंबर, २०१९

नियमानुसार काम!

"मी चहा प्यायला" हे प्रमाणभाषेतले वाक्य उदाहरण म्हणून घेऊ. जर "प्यायला" हा शब्द "पाय्ला" असा लिहिला तर तो शब्द अशुद्ध ठरतो. त्याखाली लाल रेघ येते आणि योग्य शब्द म्हणजे "प्यायला" राईट क्लिकवर दिसतो. इथपर्यंत तुमचं आमचं जमलं. आता पुढचं पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या!
"मी चहा प्यायला" हे प्रमाणभाषेतले वाक्य, तर "मी चाय पिली" हे बोली भाषेतले वाक्य. दोन्ही शुद्धलेखनाच्या दृष्टीने शुद्धच आहेत. स्पेलचेकमध्ये "पिली" या शब्दाखाली लाल रेघ येत नाही. असे का? "बसणे" या क्रियापदावरून ज्या  नियमाने "बसली" हे रूप बनते त्याच नियमाने "पिणे" वरून "पिली" बनते. स्पेलचेकर शब्दाचे लिंग तपासत नाही. त्यामुळे "चाय पिली" किंवा "चाय पिला" दोन्ही शुद्धच! प्रमाणभाषेत हे बसत नाही ही गोष्ट मान्य. पण त्याला काय करणार? "शिश्ठ"  लोकांना मान्य नसेल तर हा स्पेलचेकर "शिष्टमान्य" नाही असे फार तर म्हणता येईल. अर्थात मी बोली भाषेत लिहितो असे म्हणत कोणी "मी चाय पीली" असे लिहिले तर पीली शब्दाखाली लाल रेघ येईल. दीर्घ "पी" बदलून ह्रस्व करावा लागेल. हंस्पेल नियमांच्या बाबतीत नो काँप्रोमाईज!