१६ सप्टेंबर, २०१२

कारण "त्यां" ना तसंच हवं आहे म्हणून!

मनोगताचा मी अगदी पहिल्यापासूनचा मेंबर आहे. आणि मनोगताच्या अनेक चढ उतारांचा साक्षीदार देखील.

http://www.manogat.com/node/23447

मला "असे का? " या चर्चेत भाग घ्यायचा होता पण माझे म्हणणे सविस्तर व प्रशासकांच्या अनुमतीशिवाय प्रसिद्ध व्हावे म्हणून या ब्लॉगवर. असं का व्हावं याला अनेक कारणं आहेत.

१) प्रशाकीय हस्तक्षेपः यावर अनेकांनी प्रतिसादातून लिहिल्यामुळे अधिक लिहत नाही.

२) विदागाराला झालेला अपघातः मनोगतचा डेटाबेस कोसळला तेव्हा मी मनोगतावरच काहीतरी वाचत होतो. म्हणजे मी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष साक्षीदार. एकादे संकेतस्थळ असे अपघातग्रस्त होणे ही त्याच्या यशाची पहिली पायरी असते. ट्विटरला देखील अशा अपघाताचा सामना करावा लागला होता. पण मनोगत त्यातून सावरलेच नाही.

३) ओपन सोर्सला विरोधः मनोगत ड्रुपल या प्रणालीवर आधारीत असले तरी त्याच्या सोर्स कोडमध्ये बरेच बदल केले गेले आहेत. नवीन मॉड्यूल लिहीली गेली. ती कधीच बाहेर आली नाहीत. शुद्धलेखनाचे तंत्र API द्वारे इतरांना उपलब्ध करून देता आले असते. फुकट किंवा विकत कशाही प्रकारे तंत्रज्ञान शेअर झाले नाही. मी फक्त RSS फीड वाचतो. बहुतेक सर्व साईट्स अशा प्रकारे आपले लेख फीडमध्ये उपलब्ध करून देतात. मनोगतचा फीड पहिल्या काही महिन्यांनंतर गायब झाला. RSS फीडमुळे लेख चोरीला जातात असे कारण पुढे करणे हास्यास्पद आहे. मनोगताच्या लाखोपट अधिक व्हॅल्यू असलेले विकिपीडिया / स्टेक ओव्हरफ्लो सारख्या साईट्स API, RSS फीड एवढ्यावर न थांबता आपलं पूर्ण विदागार सर्वांसाठी उपलब्ध करून देतात हे पाहिल्यावर मला मनोगत एखाद्या हट्टी खडूस म्हातार्‍यासारखे वाटायला लागले.

मनोगताची अशी अवस्था का झाली असा प्रश्न विचारण्यापेक्षा मनोगताची अशी अवस्था (प्रशासकांनी) का केली? असा प्रश्न जास्त संयुक्तिक होईल आणि त्याचे उत्तर उघड आहे. प्रशासकांना एकहाती सांभाळता येईल इतकेच विदागार वाढायला हवे आहे. लोकांनी इथे फार काही लिहू / वाचू नये. महिन्यातून एखादी चक्कर मारावी अशी त्यांचीच अपेक्षा असल्याने मी सध्या तीच पुरी करतो आहे!