०९ नोव्हेंबर, २०१४

से नो टू जंक

आजच्या लोकसत्ता - लोकरंग पुरवणीतील वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांचा आहारावरचा लेख फारच छान.

http://www.loksatta.com/lokrang-news/to-stop-acidity-1039776/?nopagi=1

त्यातील काही महत्त्वाची वाक्ये अशी:
आजची बाल आणि युवा पिढी यांचा आहार पोषक नाही हेच खरं आहे. चॉकलेट्स, वेफर्स, आइस्क्रीम, पाव, बेकरीचे म्हणजे मद्याचे पदार्थ, शीतपेये, पाणीपुरी-शेवपुरी असे चाट पदार्थ, बर्गर, विविध चवींचे सॉस, मिओनीज, न्यूडल्स या सगळ्या पदार्थामध्ये शरीराला वापरता येतील असे पोषक घटक नगण्य असतात. यातले काही पदार्थ तर नैसर्गिक नाहीतच, कृत्रिम आहेत. त्यामुळे त्यांचं काय करायचं हे शरीराला कळतच नाही. त्यातलाच काही भाग ते नाइलाजानं ठेवून घेतात, (रमीच्या डावात हवी ती पानं येत नसतील तर आपण नाही का आलेली निरुपयोगी पानं ठेवून घेतो..) साठवतात आणि वजन वाढू लागतं.

मुलांच्या लहानपणापासूनच पालकांनी जागरूक राहायला नको का? लाड म्हणून, आम्हाला मिळालं नाही म्हणून, सगळं खाण्याची सवय हवी म्हणून, जवळ पैसे आहेत म्हणून, मुलांना आवडतं म्हणून - अशी तद्दन भंकस कारणं पुढे करून या कचऱ्याची/ विषाची चटक मुलांना कोण लावतं? आई-बाप झाल्यावरही आपल्याला जर आहाराबाबत योग्य-अयोग्य ठरवता येत नसेल, तर बिचाऱ्या मुलांना इतक्या लहान वयात सांगितल्याबरोबर ते कळेल आणि वळेल अशी अपेक्षा आपण कशी काय करू शकतो? मग यावर उपाय काय? तर या पदार्थांना उत्तम पर्याय असे घरगुती, ताजे, पोषक आणि चविष्ट पदार्थ सगळ्या मातांनी ते बनवले पाहिजेत.

सायलीसारख्या मुलींच्या अग्नीची वाट लावणारा मुख्य घटक म्हणजे व्यायामाचा अभाव. 'मार्कांच्या स्पर्धेत उतरवलेल्या आपल्या पाल्यानं अभ्यासाशिवाय इतर कुठलेही 'फालतू' उद्योग (व्यायाम, घरकाम, स्वतःची कामं, खेळ, चालत शाळेत जाणं) केलेले आजच्या महत्त्वाकांक्षी पालकांना अजिबात खपत नाही.

औषधं, पंचकर्म याद्वारे इलाज करता येतात. पण ते खूप वेळखाऊ असतात आणि रुग्ण ते गांभीर्यानं घेत नाहीत. लहानपणापासून योग्य आहार ठेवला तर कित्येक आजारांपासून आपल्या मुलांना दूर ठेवता येऊ शकतं. आरोग्याच्या बाबतीत नेहमीच 'तहान लागण्यापूर्वी विहीर खणणे' इष्ट. 
_____

खरोखर डोळ्यात अंजन घालणारा लेख आहे हा.
मुळातूनच सगळा वाचायला हवा असा.

जंक फुड खाण्यापूर्वी मी माझीच अशी समजूत करून घेत असे की "कधीतरी खायला काय हरकत आहे? आपण काय रोज थोडीच खातो ह्या गोष्टी?" पण आता हिशोब करतो तेव्हा लक्षात येते की जंक फुडचे हजारो प्रकार. एकच ईश्वर पण त्याची खूप नावे, तसा काहीसा हा प्रकार. वर्षातून एक, दोनदाच खायचे म्हटले तरी कित्येक वर्ष पुरतील इतक्या व्हरायटीने सगळे मॉल ओथंबून वाहताहेत. यातून बाहेर पडायचा एकच उपाय, "से नो टू जंक फूड" गाई म्हशींसकट सगळं प्राणी जगत आपलं अन्न ओळखतं आणि बाकीच्या गोष्टींना तोंड लावत नाही. आपण मात्र पुढे येईल ते पोटात ढकलतो! आहार हाताबाहेर जाण्यास आपले संस्कारही कारणीभूत आहेत. यातील मुख्य नऊ:

१) पानात काहीही टाकायचं नाही.
२) सगळं पचलं पाहिजे, नसेल पचत तर सवय करायची.
३) रोज नाही, पण कधीतरी खायला काय हरकत आहे?
४) शिपीभर अन्न पातेल्यात उरता कामा नये. केलेलं सगळं संपलं पाहिजे.
५) तो बघ. तुझ्या एवढाच आहे. पण त्याचे खाण्यापिण्याचे काही नखरे नाहीत. एकदम आदर्श मुलगा !
६) आपल्यात (आपल्या जातीत) हे खात नाहीत किंवा हा पदार्थ असाच करतात.
७) असली थेरं इथे चालणार नाहीत. खाण्यापिण्यावर असा खर्च केला असता तर आमचा संसार झाला असता का?
८) पालेभाजी धुवा, निवडा, चिरा म्हणजे खूप व्याप. पालेभाजीला श्रम आणि वेळ जास्त लागतो. त्यापेक्षा वांगं, बटाटा, भेंडी अशा फळभाज्या बर्‍या पडतात करायला. त्यालाही वेळ नसेल तर नाक्यावर मिळतात हल्ली सगळ्या भाज्या, रेडिमेड. ४० रुपये प्लेट म्हणजे थोड्या महाग पडतात, पण वेळ (त्यापेक्षा श्रम) वाचतात. ते महत्त्वाचे.
९) आज मिळतंय ते खाऊन घे. उद्या कदाचित हे देखील मिळणार नाही.

काही दुकानांमध्ये "कृपया इन शब्दोंका प्रयोग मत किजीये" अशी विनंती करणारा एक फलक असतो. त्यात "पहचानता नहीं क्या? , पैसा कल देता हूं, लिख लेना" अशी वाक्ये असतात. तसा घरात एक बोर्ड बनवायला हवा. वर दिलेली ९ वाक्ये उच्चारू नयेत असा!