२७ डिसेंबर, २००९

रवी रतलामी यांना मंथन पुरस्कार

छत्तीसगडी या भाषेत संपूर्ण संगणक उपलब्ध करून देण्याचं भगिरथ काम ज्यांनी केले त्या रवी रतलामी यांना यंदाचा मंथन पुरस्कार मिळाला हे लोकलायझेशनच्या क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. सुमारे एक लाख स्ट्रींग्स इंग्रजीतून छत्तीसगडी या भाषेत भाषांतरित कराव्या लागल्या तेंव्हा कुठे या प्रयोगाने थोडाफार आकार घेतला. त्यांचं मूळ नाव रवीशंकर श्रीवास्तव. पण जालावर सर्वजण आपल्या ब्लॉगच्याच नावाने ओळखले जातात. ते जेव्हा रवी रतलामी या नावाने हिंदी ब्लॉग लिहीत तेव्हापासून मी त्यांचा ब्लॉग वाचत आलो आहे. पुण्यातील एका कार्यशाळेत त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचाही योग आला होता. एका निरलस, निरपेक्षपणे काम करणार्‍याला एक मोठा पुरस्कार मिळाला ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आता इथेच थांबतो कारण मराठीच्या के.डी.ई ची प्रगती किती असा साळसूद प्रश्न करून माझ्या चेहर्‍यावरचे भाव निरखण्याचा एक प्रकारचा आसूरी आनंद मी कोणालाच मिळू देणार नाही.