०८ ऑगस्ट, २०२२

इंग्रजी शब्द मराठीत (भाग २)

tragedy हा शब्द तीन प्रकारे लिहिता येतो.  १) ट्रॅजडी २) ट्रॅजिडी ३) ट्रॅजेडी 

त्यातील पहिला पर्याय ऑक्सफर्डसंमत असल्यामुळे विकीपीडियावर तो वापरता येईल कारण तो ज्ञानकोश असून पूर्णपणे नियमाने चालणे अपेक्षितच आहे.

पण स्पेल चेकसाठी तो पर्याय उपयोगी नाही. इथे "शास्त्रात रुढी बलियसी" हा न्याय वापरावा लागतो. त्यामुळे दुसरा पर्याय ट्रॅजिडी योग्य वाटतो. कारण गूगलमध्ये तो शब्द तिसऱ्या शब्दापेक्षा दसपट जास्त वेळा वापरला गेला आहे. पण गूगलमध्ये हिंदी पानांवरदेखील हा शब्द दिसतो. त्यामुळे कदाचित हिंदी स्पेलचेकसाठी दुसरा पर्याय योग्य होईल. मराठी स्पेलचेकसाठी मात्र तिसरा पर्याय घेतला पाहिजे कारण 'चा’, 'ची', 'चे' सारखे विभक्ती प्रत्यय आणि 'मध्ये’, 'पेक्षा’, 'वर’, 'वरून’, 'कडे' यासारखी अव्यये तिसऱ्या शब्दात वापरलेली दिसतात, दुसऱ्या शब्दात त्यांचा वापर फार कमी झालेला दिसून येईल. उदा. "ट्रॅजिडीकडे" या शब्दासाठी गूगलमध्ये एकही पान दिसत नाही तर "ट्रॅजेडीकडे" या शब्दासाठी चार-पाच पाने दिसतात.

तेव्हा "ट्रॅजेडी" मराठी स्पेलचेकमध्ये,  "ट्रॅजिडी" हिंदी स्पेलचेकमध्ये तर "ट्रॅजडी" मराठी / हिंदी विकीपीडियावर अशी मांडणी करावी लागेल असे वाटते.

_____

खाली दिलेल्या शब्दात अर्ध्या "न" चा उच्चार स्प्ष्ट होतो आणि तो काही पर-सवर्ण पद्धतीने काढलेला अनुस्वार नाही तेव्हा हे शब्द पहिल्या पर्यायाप्रमाणे लिहायचे आहेत.

ट्रेन्ड ट्रेंड
ट्रान्स्लेटर ट्रान्सलेटर ट्रांसलेटर
ट्रॅन्सप्लॅंट ट्रान्स्प्लान्ट ट्रान्स्प्लांट ट्रान्सप्लांट ट्रांसप्लांट
लॅन्सेट लँसेट
कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रक्टर कॉण्ट्रॅक्टर कॉण्ट्रक्टर कॉंट्रॅक्टर

इतर काही शब्दः

ट्रम्प ट्रंप
ट्रीटमेंट ट्रिटमेन्ट ट्रिटमेण्ट ट्रिटमेंट

_____

शास्त्राप्रमाणे "टेक्स्चर" तर रुढ शब्द आहे "टेक्श्चर". म्हणून हे दोन्ही शब्द स्पेल चेकच्या डेटाबेसमध्ये घेतले. असे शब्द अपवादात्मक असावेत.