०९ एप्रिल, २०२०

लॉकडाऊनच्या निमित्ताने

सध्या लोकांकडे भरपूर मोकळा वेळ आहे, तेव्हा खाली दिलेल्या समस्या या खरोखरच्या समस्या आहेत हे निदान मान्य करण्याकरता थोडा वेळ कोणाला काढता येईल का?

१)  गर्दीचा सोस
२) थुंकण्याचा रोग
३) स्वच्छतेचे महत्त्व
४) प्रदूषणाचा राक्षस
५) ध्वनी प्रदूषणाची समस्या
६) रांगेची शिस्त
७) व्यसनाचा विळखा
८) लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार

१)  गर्दीचा सोस
"अंत्यसंस्कारांचे कार्यक्रम"  या लेखात डॉ. सुधीर देवरे म्हणतात...

सुख असो की दु:ख. लग्न असो की मृत्यू. कार्यक्रम भरगच्च हवाच. खूप गर्दी हवी कार्यक्रमाला. माणसाला गर्दीशिवाय सुख साजरं करता येत नाही की दु:ख. जेवढी गर्दी तेवढा जसा मोठा आनंद; तशी जेवढी गर्दी, तेवढं प्रचंड मोठं दु:खं. माणसाला गर्दी आवडते. दु:खात सुध्दा आपल्या आजूबाजूला प्रचंड गर्दी हवीच. गर्दीने दु:खाची सुध्दा प्रतिष्ठा वाढते असा आपला समज होतोय का?

http://sudhirdeore29.blogspot.com/2019/10/blog-post.html

२) थुंकण्याचा रोग
थुंकू नये याचा भारतीय अर्थ थुंकून ये असा होतो असे सचिन वाडी म्हणतात...

तर मित्रांनो, मी (आणि आपण पण) रोज आपल्या आजूबाजूला थुंकणाऱ्या व्यक्तींचे थवे च्या थवे (कळप म्हणा हव तर) बघतो. अगदी मनापासून थुंकतात हे लोक. यांना काही वेळ, काळ, जागा याचं भान ठेवण्याची गरज नसते. हे आपल्याच विश्वात असतात . ट्राफिक सिग्नल असोत, दवाखाने असोत, ऑफिसेस च्या इमारती असोत का त्या इमारतीमधील लिफ्ट्स किंवा भिंती असोत; आम्ही आपल्या बापदादांची जागा आहे असे समजून एकदम बेभान होवून थुंकणार.

https://sachinwadi.wordpress.com

३) स्वच्छतेचे महत्त्व
स्वच्छ भारत अभियान आणि आपण या लेखात निलेश म्हणतात...

आपण सगळे आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. आपला पैसा, आपला वेळ वाया जात आहे. आपल्या नद्या या सांडपाणी वाहून नेणारी गटारे बनल्या आहेत. कचर्‍याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत.

https://www.misalpav.com/node/29008

त्यावर आलेली पहिलीच (मासलेवाईक) प्रतिक्रिया म्हणजेः सुंदर निंबध. शुद्धलेखनासाठी पाच मार्क एकस्ट्रा

इतर काही प्रतिक्रिया अशाः

गाडगेबाबा थकले सांगून.
नागरिकशास्त्राची पुस्तकंसुद्धा कामी येयीनात.
हजारेंच्या अण्णांनीही प्रयत्न केलेच.
आता मोदी.
चालायचंच.

लोक फक्त आपल्या स्वतःच्या रहात्या घराला घर समजतात, शहराला/ गावाला/ देशाला 'आपले घर' समजत नाहीत, हा खरा प्रॉब्लेम आहे. लोकांमध्ये एकमेकांमधली दरी कमी होत नाही आणि नागरिक विरुद्ध सरकार असा एक विनाकारण बसलेला तिढा सुटत नाही, तोपर्यंत लोक स्वच्छतेच्या बाबतीत बेपर्वा रहाणार हे देखील एक कारण आहेच.

४) प्रदूषणाचा राक्षस
थुंकण्याची तुलना श्वसनाशी करणारे सारंग दर्शने म्हणतात…

सर्वसामान्य भारतीय नागरिकांना थुंकू नका, असे सांगितले तर ‘श्वसन करू नका’ असे सांगितल्यावर जशी एखाद्याची जीवघेणी घुसमट होईल, तशी घुसमट सामान्य भारतीय नागरिकाची होईल. रस्त्यात थुंकू नका किंवा रेल्वेच्या डब्यातून प्लॅस्टिकची पिशवी बाहेर टाकू नका अथवा सार्वजनिक ठिकाणी हातातला कचरा बेलाशक फेकून देऊ नका, हे नियम आणि निकष योग्यच आहेत. आवश्यकही आहेत.

https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/athatho/swachh-bharat-abhiyan-competition/

५) ध्वनी प्रदूषणाची समस्या
एक गलबलून टाकणारा अनुभव सांगताना चंद्रशेखर म्हणतात…

पुण्यात नागरिक शास्त्र जाणणारे, शिकलेले लोक रहातात असा माझा कालपर्यंत भ्रम होता. काल रात्रीच्या दोन तासात तो दूर झाला. पुणे ही अनेक जंगली टोळीवाल्यांची मिळून बनलेली वस्ती आहे हे लक्षात आले. यापैकी प्रत्येक टोळीची स्वत:ची वागण्याची तर्‍हा आहे. यामुळे इतर लोकांना कितीही त्रास झाला तरी या जंगली टोळीला त्याची पर्वा असण्याचे काहीच कारण नाही. त्या लोकांनी स्वत:चे बघून घ्यावे.

http://mr.upakram.org/node/2621

६) रांगेची शिस्त
शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे? असा प्रश्न विचारणारे नागोराव येवतीकर म्हणतात...

शाळा तर सर्वांनीच शिकलेली असते मग शाळेत शिकलेली शिस्त कुठे गेली? असा प्रश्नदेखील मनात येतो. शाळेतल्या कोणत्याच बाबीचा परिणाम प्रत्यक्षात समाजात जीवन जगताना दिसत नसेल तर या शिक्षणाचा फायदा तरी काय? शिक्षण हे फक्त नोकरीसाठीच आहे काय? मुलांना पुस्तकी ज्ञान देताना त्यांना मूल्यशिक्षण देण्याचे पार विसरून चाललो आहोत

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/saamana-epaper-saam/lekh+shaletil+rangechi+shist+jate+kuthe-newsid-99436965

७) व्यसनाचा विळखा
व्यसनाबद्दलचा आपला स्वानुभव सांगताना तुषार नातू म्हणतात...

मी पूर्णपणे ब्राऊन शुगर च्या आहारी गेल्यावर माझी भूक मंदावली होती , वजन कमी होत चालले होते , तसेच आता ब्राऊन शुगर साठी लागणारे पैसे जमवणे देखील कठीण होत चालले होते. त्यामुळे घरात चोऱ्या करणे, बाहेर उधारी करणे, ओळखीच्या लोकांकडे उसने पैसे मागणे असे प्रकार सुरू झाले होते.

http://tusharnatu2013.blogspot.com/2013/03/blog-post_1623.html

८) लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार
लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीतील लेखक म्हणतात...

दर चार मुलींपैकी एका मुलीला आणि दर सात मुलग्यांपैकी एका मुलग्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागलेलं असतं. अशी आकडेवारी बाहेर आली की, एक प्रतिक्रिया नेहमीच समोर येते- ‘‘हे असले प्रकार होत असतील पाश्चात्त्यांकडे. आमची भारतीय मूल्यव्यवस्था फार चोख आहे!’’

https://www.loksatta.com/chaturang-news/we-must-speak-5598/