०३ नोव्हेंबर, २०१९

कशाकशाचे सुलभीकरण?

"बालभारतीपुरस्कृत अभिनव मराठी संख्यावाचन पद्धतीबद्दल काही शंका"  हा सलील कुळकर्णींचा अमृतमंथन ब्लॉगवरील लेख नुकताच वाचनात आला.

या धोरणामुळे मराठीचे सुलभीकरण होत असेल तर त्याला माझा विरोध असण्याचे कारण नाही. पण हे सुलभीकरण फक्त संख्या वाचनापुरतेच मर्यादित असणार आहे की पुढे पुढे सर्वच क्षेत्रात त्याचा संचार होणार आहे हे देखील स्पष्ट होऊ द्या.  इंग्रजीत नाते संबंध देखील फार सुलभ पद्धतीने सांगितले जातात. "आँटी" म्हणजे काकू, मावशी किंवा आत्या कोणीही असू शकते.  चायनीज भाषेत मात्र वडिलांच्या मोठ्या भावाला एक शब्द तर वडिलांच्या लहान भावाला दुसरा शब्द आहे. आपल्यासारखे फक्त काका किंवा अंकल म्हणून ते पुरे पडत नाही. त्यांना ही नाते सुलभीकरणाची प्रक्रिया समजावून सांगायला कोणी तयार होईल का? माझी आई फोन वर देखील "नंडेची सासू" वगैरे शब्द वापरते. संभाषण पुढे जाते म्हणजे पलिकडची जी कोण असेल तिला ते नाते समजले असा होतो. माझ्याबरोबर बोलताना मात्र तिला फार जपून (सुलभीकृत) भाषेत बोलावे  लागते. कारण "नणंद" म्हणजे नक्की कोण असा माझा प्रश्न  असणार हे तिला माहीत असते. सुलभीकृत भाषेत बोलावे असा अत्याग्रह धरला तर संवादच थांबतो असा माझा तरी अनुभव आहे. तेव्हा बालभारतीने ती शक्यता देखील विचारात घ्यावी. गुजरात राज्याच्या विकासाचे मॉडेल सगळीकडे चालेल असे समजणे शहाणपणाचे नाही तसेच एका भाषेतील सुलभता दुसरीकडे कॉपी-पेस्ट करून समस्या सुटत नाही, उलट जटील बनते कारण प्रत्येक भाषेला स्वतःचा असा इतिहास, संस्कृती आणि गरजा असतात व त्या पूर्ण करणारे शब्द हवे असतात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा