०३ जुलै, २०१४

भविष्यातील नवी आव्हाने

जीवघेणी स्पर्धा, वैचारिक कट्टरता आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता या तीन गोष्टींशी नवीन पिढीला सामना करावा लागणार आहे. खूप स्पर्धा निर्माण झाली की तिला गळेकापू (cut throat) म्हणतात. "गळेकापू" या शब्दातच हिंसा आहे. अशी स्पर्धा केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असे प्रत्येकाच्या मनावर बिंबवले जात आहे आणि त्यामुळे ज्याला त्याला जिथे तिथे घुसण्याची घाई झाली आहे. विरोध सहन न होण्याची असहिष्णुता ही आहे आजची नवीन फॅशन. धर्म, जात, भाषा या सर्व बाबतीत कडवेपणाचा स्विकार केला तर काय होईल? आपल्या अनुभवाचा परीघ लहान होत जाईल. आपण आपल्याच नकळत संकुचित विचारांचे बनू आणि आपलेच नुकसान होईल. इंग्रजीला विरोध केला तर तंत्रन्यानात मागे पडू. "लुंगी हटाव" अशी घोषणा देत दाक्षिणात्यांना विरोध केला तर तिकडच्या सुंदर मंदिरांचा आणि भोजनाचा आस्वाद घेताना आपण काहीतरी चुकीचे करत आहोत असे आपल्याला वाटेल. हिंदू धर्मात अनेक जाती/ पंथ आहेत. प्रत्येकातून काहीतरी शिकण्यासारखे आहे. प्रजापिता ब्रम्हाकुमारीचा पंथ असेल तर त्यातून स्वच्चता आणि अन्नाची शुद्धता शिकता येईल. रामदेव बाबाकडून योग शिकूया तर पंढरीच्या वारकर्‍यांकडून समानता आणि निर्व्यसनी रहायला शिकेन अशी द्रूष्टी हवी. आता त्या पंथातही काही चुकीच्या गोष्टी होत असतीलच, पण आपली नजर फक्त जे उज्जव आणि भव्य असेल त्याकडे हवी. काय स्वीकारायचे ते शिकायला हवे. ड्न्य्हानेष्वरीत फार सुंदर उपमा आहे. गाईच्या आचळाला चिकटलेले गोचीड काय पिते? तर रक्त. दुधाच्या इतके जवळ राहून दूध न पिता रक्त पिण्याची बुद्धी गोचीडाला का व्हावी? आपल्याही आजूबाजूला मंगल, उदात्त, भव्य आणि आशादायक गोष्टी आहेत त्या न पाहता फक्त कचराच का पाहायचा?

आज अशी परिस्थिती आहे की भविष्यात सगळं चांगलंच होईल असं ग्रूहीत धरून चालता येणार नाही. कदाचित काही जुनी माणसं म्हणतात तसं "गेले ते दिवस बरे होते" असे म्हणण्याची देखील वेळ येऊ शकते. पण कशाही परिस्थितीला तोंड देता आले पाहिजे. सुखाच्या आणि दु:खाच्या लाटांमधून पोहून कसं पार व्हायचं याचं शिक्षण आपल्याला मिळालं पाहिजे. ते घरी, शाळेत, क्लासमध्ये आणि जगाच्या शाळेत असं शिक्षण मिळतं. ते शिकता मात्र आलं पाहिजे. आपल्याला ते शिकता येत नाही याचं महत्त्वाचं कारण आपल्याला त्या न्यानाबद्दल व ते शिकवणार्‍या गुरुंबद्दल आदर नसतो. गीतेमध्ये कृष्णाने सांगितले आहे की "इदं तु ते नातपस्काय, नाभक्ताय कदाचन". भक्ति आणि तपस्वी नसेल त्याला हे सांगू नको. का? कारण अशी लोकं आपल्यालाच शिकवतील आणि आपला मुद्दा कसा चूक याचा कीस काढत बसतील. म्हणतात ना, "तुटे वाद, संवाद तो हीतकारी". वाद नको, संवाद हवा, ज्यात दोघांनाही काहीतरी लाभ होईल. संवाद वाढवायचा तर मन आकाशासारखं खुलं ठेवायला हवं. कुजक्या डोक्यानं जे होतं त्याला भांडण, वितंडवाद म्हणतात आणि त्याचं पर्यवसन द्वेष आणि मत्सरात होतं. मला असं सांगितलं गेलं आहे की हल्ली शाळेत शिक्षक वर्गावर येतात आणि विद्यार्थांकडे न बघता शिकवतात मग निघून जातात. जर संवाद साधला नाही तर ते एकतर्फी शिक्षण होईल. त्यातून कदाचित मुले पास होतील पण ती विकसित, जबाबदार आणि लोकप्रिय नागरिक बनणार नाहीत.
भविष्यातील नवी आव्हाने स्विकारण्याची शक्ति आणि बुद्धी आपल्या सर्वांना मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.