११ मे, २०१०

मराठीचा ट्रॅप

दादर सार्वजनिक वाचनालय येथे संपन्न झालेल्या "मराठी ब्लॉगर्स" संमेलनामुळे मला झालेला फायदा म्हणजे इन्स्क्रिप्ट टंकलेखनाचे महत्त्व (नव्याने) समजले. लीना मेहेंदळे यांनी इंग्रजीतून विचार करण्यास भाग पाडणारे फोनेटिक तंत्र विसरा व इन्स्क्रिप्ट पद्धतीने टंकलेखन करा नाहीतर अजून काही वर्षांनी मराठी देवनागरीत का लिहावी? सरळ रोमनागरीतच का लिहू नये असा विचार पुढे येईल आणि तो मान्य झाला तर देवनागरी लिपीच (मराठीपुरती) नष्ट होईल असा इशारा दिला. हा विचार मला थोडा अतिरंजित वाटला. असे होण्याची शक्यता फार कमी आहे. ताईंनी "ट्रॅप" हा शब्द वापरला. मी माझी ओळख करून देताना तोच धागा पुढे नेऊन असे सांगितले की देवनागरी लिपी नष्ट करण्याचा खरा ट्रॅप अशुद्धलेखन व त्याचे निर्लज्ज समर्थन हे आहे. उदाहरण द्यायचे झाले तर "पितळी तांब्या" हा शब्द आपण जर "पितळि पीतळी पीतळि पितली पितलि पीतली पीतलि पित्ळी" अशा विविध प्रकारांनी लिहू लागलो तर अजून काही वर्षांनी रोमन मध्ये लिहिलेले "pitalee tambya" डोळ्यांना अधिक सुखावह वाटू लागेल. त्यात र्‍ह्स्व दीर्घ, जोडाक्षरांची "भानगड" नाही आणि जगात कोणालाही वाचता येईल, भाषा नाही समजली तरी!
विनोबांनी एके ठिकाणी म्हटले आहे की "विस्मरण हा दोष आहे असे कोणाला वाटतच नाही." त्याप्रमाणे अशुद्धलेखन हा एक दोष आहे असे हल्ली कोणाला वाटतच नाही की काय असा प्रश्न मला काही वेळा पडतो. "त्यांच्या"त असेच लिहितात ते मान्य करा नाहीतर मार खाल असे काही बाष्कळ समर्थन कोणी करेल असे वाटत नाही. कवितेत, लिखाणात पात्रांच्या तोंडी जी बोली भाषा यावी लागते ती तशी लिहिण्यास शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे सूट आहेच. आक्षेप आहे तो भाषा आणि लिपी गांभीर्याने न घेण्यावर. ताई आणि दादांनो, माझ्यामते हा ट्रॅप जास्त धोकादायक आहे!!