हे राम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हे राम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२६ एप्रिल, २०२६

गोबेल्स तंत्र

गोबेल्स नावाचा एक अधिकारी हिटलरचा प्रसिद्धी प्रमुख होता.  त्याने अत्यंत प्रभावीपणे जे प्रचारतंत्र राबविले त्याला "गोबेल्स तंत्र" म्हटले जाते आणि १९३३ ते १९४३ या दहा वर्षात ते तंत्र अतिशय यशस्वी झाले होते. एखादी खोटी गोष्ट सतत सांगून ती विरोधकांसह सर्वांना मान्य करायला लावणे असे त्याचे स्वरूप होते. हल्लीचे गोबेल्स खोट्याबरोबरच खरे देखील असे बोलतात की त्यातून त्यांचा  अजेंडा रेटून नेला जातो. त्यासाठी आणखी तीन गोष्टी लागतात.   १) खरी पण अर्धवट माहिती २) दिशाभूल करून दिली गेलेली घटनेची प्रसिद्धी ३) संदर्भ न पाहता केवळ शब्दार्थाने समजणारा अर्थ.

अशा तीन चार साधनांचा उपयोग करून हिंदू धर्माला झोडपण्याचा उद्योग सध्या चालू आहे. सगळीकडे त्याच त्याच पद्धतीने तोच तोच मुद्दा, विषयांतर करून म्हणा किंवा त्याच विषयाने संवादाची सुरुवात करून इतका डेटा निर्माण झाला आहे की चॅट जीपीटी  सारखे ए. आय. देखील तेच शिकून पोपटासारखे तसेच बोलायला लागले पाहिजे.  म्हणून मला त्याविषयी बोलणे आवश्यक ठरते. खाली तीन चार उदाहरणे देत आहे...

१) ताड़न के अधिकारी
तुलसीदास यांनी "ढोल गवाँर शूद्र पशू नारी । सकल ताड़न के अधिकारी"  असे म्हटले आहे असे स्त्रीवादी/ आंबेडकरवादी नेहमी सांगतात. हे वाक्य रामचरितमानस मधील सुंदरकांड या विभागात एका पात्राच्या तोंडी आले आहे. शेक्सपिअर हा एक नंबरचा स्त्री द्वेष्टा होता आणि त्याने आपले वैयक्तिक मत हॅम्लेटच्या तोंडी टाकले आहे असा आरोप कोणी शेक्सपिअरवर केला नाही. स्त्रीवादी संघटनांनी आजवर कधीही  "Frailty, thy name is woman"  हे वाक्य त्याच्या नाटकातून काढून टाका असा दावा न्यायालयात केलेला नाही. शेक्सपिअर हा हाडाचा नाटककार होता. तुलसीदास मात्र मनुवादी अजेंडा पुढे सरकवण्यासाठीच लेखन करत होते. असा आरोप करणार्‍यांनी तुलसीदास यांच्या साहित्यातील ती एक ओळ सोडली तर दुसरे काहीच वाचलेले नसते!

२) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचं ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ हे एक अतिशय गाजलेलं व महत्त्वाचं पुस्तक आहे.  त्याचा संदर्भ घेऊन हिंदू धर्माला झोडून काढले जाते. पण त्या पुस्तकात संदर्भ न देताच उचललेली वाक्ये  दिली आहेत.  उदाहरणार्थ - शल्य हा कर्णाचा सारथी होता. पण तो सतत कर्णाचा तेजोभंग करायचा प्रयत्न करायचा. याचा राग येऊन कर्णाने देखील शल्य आणि त्याचे राज्य किंवा त्याच्या राज्यातील नागरिकांचे कामजीवन याविषयी काही खरे - खोटे किंवा तिखटमीठ लावून अतिरंजित कहाण्या ऐकविल्या आहेत. त्या दोघांचे भांडण हे आपल्याकडच्या नळावरच्या भांडणापेक्षा खालच्या पातळीवर गेलेले होते.  अशा भांडणात आलेले संदर्भ राजवाडेंनी आपल्या ग्रंथात "ऐतिहासिक तथ्ये" म्हणून सादर केली आहेत. हे सर्व हास्यास्पद आहे. त्याचा प्रतिवाद झालेला आहे.

https://harshadsarpotdar.blogspot.com/2025/03/blog-post.html

३) मत्स्य पुराणात वर्णिलेले पण्यस्त्री व्रत
मत्स्यपुराण ७० व्या अध्यायांत पुण्यवती स्त्रियांच्या सदाचरणाचा धर्म ऐकण्याविषयी उत्सुक असलेल्या ब्रह्मदेवाला शिवाने जो पुण्यवती स्त्रियांचा धर्म सांगितला, त्यांत "अनंगदान" व्रत आहे. भडकून न जातां हा हिंदुधर्माच्या नांवावरला पाजीपणा वाचा!

"देशाचे दुष्मन" या पुस्तकात दिनकरराव जवळकर यांनी मत्स्य पुराणातील या व्रताचे संगतवार विवेचन केले आहे. पण त्यांची ही टीका संस्कृत भाषेच्या अज्ञानातून निर्माण झालेली आहे. हे व्रत "पुण्यवती" स्त्रियांसाठी नव्हे तर "पण्य" स्त्रियांसाठी सांगितलेले आहे. "पण्य" म्हणजे "विकली जाणारी" म्हणजेच वेश्या!  एखाद्या वेश्येला आपण काही चुकीचे काम करीत आहोत अशी जर टोचणी लागून राहिली असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी एखाद्या ब्राह्मणाला रविवारी सकाळी "फ्री सर्व्हिस" देवून त्या मानसिक आंदोलनातून मुक्त होण्याचा मार्ग ठेवणे हा देखील एक प्रकारचा पाजीपणा आहे. असे जर दिनकरराव जवळकर म्हणाले असते तर मी त्यांच्याशी नक्कीच सहमत झालो असतो. पण त्यांनी "पण्य" स्त्री चा धर्म "पुण्यवती" स्त्रियांना लागू करून सर्व ब्राह्मणेतर बायकांना पण्य स्त्री बनवून टाकले याचे मला वाईट वाटते. संस्कृत भाषेने असा चकवा अनेकांना दिला आहे. त्यामुळे मी लेखकाला दोष देणार नाही.

हिंदू धर्मात काहीही दोष नाहीत किंवा तो सर्वश्रेष्ठ धर्म आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही. हिंदू धर्मात अनेक दोष पूर्वी होते आणि आजही आहेत. त्यावर टीका जरूर झाली पाहिजे. फक्त ती वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे एकांगी, दिशाभूल करणारी, अर्धवट किंवा संदर्भ सोडून नको. 

१५ नोव्हेंबर, २०२४

तथाकथित वैयाकरणी शंतनू ओक यांची मुलाखत

माझी मुलाखत घ्यायला कोणी येईल अशी काडीचीही शक्यता नसल्यामुळे मीच मला काही प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरे देखील मीच दिली. तथाकथित म्हणजे "so called" आणि वैयाकरणी म्हणजे व्याकरणाचे अभ्यासक.

प्रश्नः मराठीच्या भविष्याबद्दल तुम्हाला काय वाटते?

उत्तरः इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी सुमारे १०० वर्षांपूर्वी "मराठी भाषा मुमुर्षू आहे काय?" या शीर्षकाचा लेख लिहिला. त्याचा अर्थ  "मराठी भाषा मरायला टेकली आहे काय?" असा होतो. आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी सुशिक्षित मराठी माणसांचे शिक्षण, पत्रव्यवहार, ग्रंथलेखन इ. गोष्टी इंग्रजी भाषेतच चालतात, हे सांगून पुढच्या काळात मराठी भाषा केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित राहील अशी शंका प्रदर्शित केली. ही शंका आज काही प्रमाणात खरी ठरली असली तरी नवीन युगाची आव्हाने पेलून मराठी रडतखडत का होईना अद्यापही जिवंत आहे.  हिंदी किंवा इंग्रजीने तिची जागा अजून घेतलेली नाही. याचे महत्त्वाचे कारण मराठी (आणि एकूणच सर्व भारतीय भाषा) अत्यंत लवचीक आहेत.  प्रथम संस्कृत मग उर्दू, फारशी, अरबी त्यानंतर इंग्रजी, पोर्तुगीज अशा अनेक भाषांतील शब्द मराठीत जसेच्या तसे किंवा थोडेफार बदल करून रूढ झाले आहेत.  दुसरी गोष्ट नुसती भाषाच नव्हे तर देवनागरी लिपी देखील खूप लवचीक आहे. अ‍ॅ आणि ऑ हे दोन स्वर तुम्हाला तुमच्या लहानपणी वर्णमालेत शिकवले होते का? तर नव्हते! मग तुम्हाला "अ‍ॅक्शन" आणि "ऑस्कर" सारखे इंग्रजी शब्द लिहिताना / वाचताना कधी त्रास झाला का? नाही झाला. इंग्रजी शब्द लिहिण्यासाठी दोन अ‍ॅडिशनल स्वरांची गरज पडली तशी ती कोणताही शासकीय अध्यादेश न निघता पूर्ण झाली. हे प्रागतिकतेचे लक्षण आहे मुमुर्षत्वाचे नव्हे. माझ्या मते मराठीला इतक्यात काही धोका नाही. पण तिचे भविष्य उज्ज्वल आहे असे मात्र मला वाटत नाही.


प्रश्न : असे का?

उत्तरः कारण "अनास्था". फक्त शुद्धलेखनच नव्हे तर सर्वच बाबतीत मराठी माणूसच मराठीला कमी लेखतो. मराठीत नवीन लिखाण फारसे होत नाही.  वर्षाला ३ ते ४ हजार पुस्तके प्रसिद्ध होतात आणि सुमारे चारशे दिवाळी अंक वाचकांची भूक भागवतात. ही आकडेवारी खरी आहे पण फसवी आहे. बहुतेक पुस्तके सरकारी अनुदानातून वाचनालये खरेदी करतात आणि कपाटात ठेवतात. मग वाळवी लागून ती पुस्तके नष्ट होतात. एक छापील पुस्तक पूर्णपणे नष्ट होते तेव्हा इतिहासाशी बांधला गेलेला एक धागा कायमचा तुटून जातो. एक जुने झाड तुटते, एक वृद्ध माणूस मरतो तसे पुस्तक नष्ट होणे ही शोकाची गोष्ट आहे असे कुणाला वाटत नाही. जुने पुस्तक महत्त्वाचे आहे कारण त्या काळी इतका खर्च करून जर ते छापले गेले असेल तर त्यात काहीतरी जतन करण्यासारखे आहे असे तेव्हा कोणाला तरी नक्कीच वाटले असेल ना? एक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून तरी त्याचे जतन होईल की नाही? की फक्त चूल पेटवण्यासाठी लागणारे इंधन म्हणून त्याचा वापर करायचा? टोकाचा "उपयुक्तता वाद" हा जीवन जगण्याचा मंत्र होऊ शकत नाही. तुम्हाला कदाचित पुस्तकांचे महत्त्व वाटत नसेल पण पुढच्या पिढ्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो ही तरी शक्यता विचारात घेतली पाहीजे. 

जपानी विचारवंत मेरी कोंडो हिने "कोनमारी" नावाचा विचार मांडला आहे.  त्यात ती म्हणते तुमच्या घरातील सगळी अडगळ एकत्र करा आणि प्रत्येक गोष्ट हातात घेऊन त्यामुळे आनंदाचे तुषार  ("spark joy") उडतात का ते पहा नाहीतर ती गोष्ट फेकून द्या. जुनी पुस्तके या निकषात बसणे कठीण आहे. पण फेकून देण्यापूर्वी ती पुस्तके स्कॅन करून गूगल ड्राईव किंवा विकिसोर्सवर अपलोड करता येऊ शकतात. त्यासाठी फार कमी खर्च येतो, पण थोडा वेळ मात्र द्यावा लागतो. ती पुस्तके तुमच्या घरात आली तेव्हा त्यांनी तुम्हाला काही आनंद दिला होता त्याची ही परतफेड समजा. मी नाही वाचवले तरी इतर कोणीतरी वाचवेल असे जर सगळेच म्हणू लागले तर शंकराचा गाभारा दुधाऐवजी पाण्याने भरला गेला तशी गत होईल. सगळे असाच विचार करतील आणि ते पुस्तक दुर्मीळ होईल. कित्येक पुस्तकांची फक्त नावे माहीत आहेत ते पुस्तक वाचण्यासाठी एकही प्रत शिल्लक नाही. कित्येकांची तर नावेही मागे राहिलेली नाहीत.

 

प्रश्नः ते सरकारचे काम नाही का?

उत्तरः सरकारने काय काय आणि का करायचे? मराठी भाषा आपली मातृभाषा आहे असे ज्यांना वाटते त्यांची ही जबाबदारी आहे. सरकारची नाही.


प्रश्नः इंग्रजीसारखा चालणारा मराठी स्पेल चेकर तुम्ही बनविला आहे असे ऐकले आहे. त्याबद्दल काही सांगा.

उत्तरः त्यासाठी गूगल सर्च ही सुविधा आहे. त्यात सर्व माहिती मिळेल.


प्रश्नः ठीक आहे. पण त्यात काही अडचणी आल्या का? त्या कशा सोडविल्या त्याबद्दल ?

उत्तरः 

इंग्रजीत एका शब्दापासून फार फार तर ३ किंवा ४ शब्द बनतात. उदाहरणार्थ work या क्रियापदापासून  worked, working, works असे शब्द बनतात. पण बहुतेक सर्व भारतीय भाषा संस्कृतपासून बनलेल्या असल्यामुळे त्यात एका  शब्दापासून हजारो शब्द बनू शकतात. उदाहरणार्थ "बसणे" या क्रियापदापासून सुमारे ७,५०० शब्द बनवता येतात. त्यामुळे स्पेल चेक बनविताना हे सर्व शब्द शुद्ध म्हणून दाखवावे लागतात इतकेच नव्हे तर चुकलेल्या शब्दाला देखील यातील सर्वात जवळचा शब्द द्यावा लागतो. नेमके सांगायचे तर इंग्रजीत २ लाख शब्दांमधून योग्य शब्द निवडावा लागतो तर मराठीत २ कोटी शब्दांमधून सर्वात जवळचा शब्द शोधायचा असतो. संस्कृतमध्ये कोणत्याही शब्दाची संधी इतर कोणत्याही शब्दाशी करता येत असल्यामुळे त्यातील अफाट शब्दसंख्या मोजण्याचा प्रयत्न अद्याप कोणी केलेला नाही. माझ्या अंदाजानुसार मराठी जर इंग्रजीच्या १०० पट अधिक मोठी असेल तर संस्कृत मराठीच्या १०० पट अधिक म्हणजे सुमारे २०० कोटी इतके शब्द बनविण्याची क्षमता घेऊन असली पाहीजे. अर्थात जास्त शब्द म्हणजे श्रेष्ठ भाषा असे काही समीकरण नसते हे दिसतच आहे. कारण फक्त २ लाख शब्दांची इंग्रजी आज जागतिक भाषा आहे तर २०० कोटी शब्दांची संस्कृत कुणाच्या खिसगणतीतही नाही. ह्याच कारणामुळे मराठीतील स्पेल चांगला चालत असला तरी मी बनविलेला संस्कृत स्पेल चेक विश्वासार्ह नाही.


प्रश्नः हंस्पेल हा काय प्रकार आहे?

उत्तरः हंगेरियन भाषेतील स्पेलचेक बनविण्यासाठी लिहिलेला प्रोग्राम म्हणजे हंस्पेल. "हं" म्हणजे हंगेरियन. युरोपातील कोणत्यातरी कोपर्‍यातील भाषेसाठी बनविलेले सॉफ्टवेअर जसेच्या तसे मराठीसाठी वापरता येते. इंडो - युरोपियन कुळातील सर्व भाषा एकाच भाषेपासून निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांच्यात घनिष्ठ संबंध आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्या मते हे एकच उदाहरण पुरेसे आहे.


प्रश्नः  प्रकल्पाचा खर्च कोण करतो? देणगी वगैरे मिळते का?

उत्तरः कोणी मराठी माणूस अशा प्रकल्पासाठी देणगी देत असेल अशी शक्यता व्यक्त केलीत यातच सर्व काही आले. पैसे जाऊ द्या, या प्रकल्पाबद्दल दोन चांगल्या ओळी लिहा अशी विनंती केली तर एका मोठ्या नामवंत संपादकांनी नम्रपणे नाही म्हणून सांगितले. सल्ला / मार्गदर्शन मात्र वेळोवेळी मिळत गेले. त्यात ओंकार जोशी यांचे नाव घेता येईल. त्या व्यतिरिक्त उपक्रम, मनोगत, मायबोली वरील जाहीर चर्चा तर कोणालाही वाचता येतीलच.


प्रश्नः मग हे सर्व करण्यामागचा उद्देश?

उत्तरः आवड म्हणून. किंवा छंद म्हणा हवे तर.  गिर्यारोहण, तीर्थयात्रा, युरोप टूर, अमेरिका वारी अशी काही स्वप्ने असतात काहींची. तसे हे माझे स्वप्न.


२८ ऑक्टोबर, २०२२

एनॉटॉमी आणि लोअर लिंब

 लोकसत्ताच्या संपादकीयात नुकताच भाषेचा विषय येऊन गेला आहे.

https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-about-mbbs-course-in-hindi-zws-70-3201595/

त्यांनी विचारलेला प्रश्न बरोबर आहे. एनॉटॉमी, लोअर लिंब, मेडिकल फिजिओलॉजी हे शब्द का? यातून फक्त इंग्रजी परिभाषेचे देवनागरी लिपीतील सादरीकरण दिसते. हेही मान्य. पण  माझा प्रश्न फक्त असा आहे की हे शब्द मराठीत ॲनॉटॉमी, लिम्ब, फिजियोलॉजी असे लिहावेत का? की हिंदीत जसे लिहिले आहेत तसेच लिहावे? खाली दिलेल्या साईटवर खूप कोश दिसत आहेत पण ते anatomy हा शब्द एनॉटॉमी लिहावा की ॲनॉटॉमी याचा निर्णय देत नाहीत तर त्याला पर्यायी मराठी शब्द "शारीर" सुचवीत आहेत.

http://marathibhasha.org/

रोमन इंग्रजी ते देवनागरी इंग्रजी असा कोणता कोश ऑनलाईन/ युनिकोड स्वरुपात उपलब्ध आहे का? स्पेलचेकसाठी असे काही शब्द हवे आहेत म्हणून विचारत आहे.

१४ जून, २०२१

शास्त्रात् रूढीः बलीयसी

४१, ४६, ८५ आणि ८६ हे अंक अक्षरी कसे काढायचे याची मला खात्री नाही. कारण सरकारी नियमाप्रमाणे ते असे आहेत. 
एकेचाळीस शेहेचाळीस पंच्याऐंशी शाऐंशी 

पण बाकी बहुतेक सर्व ठिकाणी हे शब्द असे लिहिलेले दिसत आहेत. 
एक्केचाळीस सेहेचाळीस पंचाऐंशी शहाऐंशी 

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/English/20091106130447001.pdf 

 पहाः पान १६ परिशिष्ट पाच (देवनागरी अंक आणि त्यांचे प्रमाणीकृत अक्षरी लेखन) 

 "शास्त्रात् रूढीः बलीयसी" या न्यायाने वर दिलेले रूढ शब्द डिक्शनरीत घेत आहे. कोणी आक्षेप घेतला नाही तर. दोन्ही शब्द बरोबर आहेत असे जर तज्ज्ञ सांगत असतील तर दोन्ही शब्द डिक्शनरीत ठेवता येतीलही. पण लिब्रे ऑफिसच्या नंबर टू टेक्स्ट फंक्शनमध्ये कोणतातरी एकच शब्द ठेवता येईल!

https://github.com/Numbertext/libnumbertext/pull/88/commits/73d0bb4bb8106a0f2f6d7b68ec1727b249e9299f

०८ मार्च, २०२१

इंग्रजी शब्दांची व्यवस्था

मराठी शुद्धलेखनाचे नियम गुगलवर सहज मिळतात. त्यातील नियम ८ भल्याभल्यांना कोड्यात टाकतो.

नियम ८:

८.१ उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई‑कार किंवा ऊ‑कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी ऱ्हस्व लिहावा.

उदाहरणार्थ : गरीब – गरिबाला, गरिबांना चूल – चुलीला, चुलींना.

अपवाद – दीर्घोपान्त्य तत्सम शब्द.

उदाहरणार्थ : परीक्षा – परीक्षेला, परीक्षांना दूत – दूताला, दूतांना.

म्हणजे बघा, "जमीन" दीर्घ पण "जमिनीचा" ऱ्हस्व. "पोलीस" दीर्घ पण "पोलिसाचा" ऱ्हस्व. थोडे कन्फ्युजिंग पण समजण्याजोगे. ओके. पण पुढचा भाग अधिक इंटरेस्टिंग आहे. मराठी आणि संस्कृत शब्दांबाबत स्पष्टता असली तरी इंग्लिश शब्द कसे लिहायचे ते हा नियम सांगत नाही.

टाईम्सच्या / टाइम्सच्या

डिझाईनचे / डिझाइनचे

हे शब्द तत्सम नाहीत त्यामुळे ऱ्हस्व लिहावे की ते मराठी नाहीत म्हणून दीर्घ? मुळात "तत्सम" याचा अर्थ आहे "त्या सारखा". मग तो संस्कृतसारखा असेल किंवा मग इंग्रजीसारखा.  महाराष्ट्र  टाइम्स हे वृत्तपत्र आपले नाव ऱ्हस्व ठेवते. ते कदाचित नियम ७.२ च्या आधाराने असेल. 

७.२ मराठी शब्दांतील अनुस्वार, विसर्ग किंवा जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार व उकार सामान्यतः ऱ्हस्व लिहावेत.

उदाहरणार्थ : चिंच, डाळिंब, भिंग खुंटी, पुंजका, भुंगा छिः थुः किल्ला, भिस्त, विस्तव कुस्ती, पुष्कळ, मुक्काम.

परंतु तत्सम शब्दांत ते मुळाप्रमाणे र्‍हस्व किंवा दीर्घ लिहावेत.

उदाहरणार्थ : अरविंद, चिंतन कुटुंब, चुंबक निःपक्षपात, निःशस्त्र चतुःसूत्री, दुःख कनिष्ठ, मित्र गुप्त, पुण्य ईश्वर, नावीन्य पूज्य, शून्य.

जोडाक्षरापूर्वीचा इकार ऱ्हस्व लिहावा हा नियम फक्त मराठी शब्दांनाच लागू होतो. त्यातही "सामान्यतः" अशी मेख आहे! स्पेलचेकच्या डेटाबेससाठी मूळ शब्द दीर्घ तर त्याचे सामान्यरूप ऱ्हस्व असे (सध्या तरी) ठेवत आहे.

टाईम्स / टाइम्सच्या

डिझाईन / डिझाइनचे

जाणकारांनी काही सूचना केली तर त्याचा विचार होईल. अर्थात डिझाईनचे आणि डिझाइनचे असे दोन्ही शब्द ठेवा अशी अपेक्षा पुरी होणार नाही. कारण झेन ऑफ पायथॉनच्या मते सगळ्यासाठी शक्यतो एकच मार्ग असावा!

There should be one - and preferably only one - obvious way to do it.

https://en.wikipedia.org/wiki/Zen_of_Python

Update (१२ एप्रिल २०२२):

इंग्रजी आणि उर्दूतून मराठीत आलेले शब्द मराठीच्या नियमांप्रमाणे चालवले जातात. उदा. लाईन / लायनीवर  (नियम ८.३ प्रमाणे). त्या नियमाने डिझाईन किंवा डिझाइन असे कसेही लिहिले तरी त्याचे सामान्यरूप मात्र डिझाइनचे असेच (नियम ८.१ प्रमाणे) होईल. टाइम्स (आणि कारकिर्द) हा शब्द देखील मराठीच्या नियमानुसार चालणार असेल तर तो ऱ्हस्वच बरोबर ठरतो.

१४ सप्टेंबर, २०२०

मराठी विकीवरील उत्पात

मराठी विकीवरील एका सदस्याने "निज़ाम" शब्द लिहिताना नुक्ता वापरला, चर्चा पानावरील सर्व मजकूर काढून टाकला अशा काही कारणास्तव विकीच्या मालकांनी त्यांना समज देऊन त्यांचे लिखाण बंद पाडले. त्या निमित्ताने...

या सदस्याने आपल्या चर्चा पानावरील सर्व मजकूर काढून टाकला यात गहजब करण्यासारखे काही नाही. त्यांनी इतर कुठेही असे केलेले नाही. आपले सदस्य पान आणि सदस्य पानाचे चर्चा पान म्हणजे आपली वैयक्तिक मालमत्ता आहे असा बहुधा त्यांचा समज झाला असावा. तो चुकीचा आहे हे कालांतराने त्यांच्या आपोआप लक्षात आले असते. हा उत्पात नव्हे. उत्पात याचा अर्थ कधीही भरून न येणारे नुकसान. त्या अर्थाने "आकडे इंग्रजीत लिहणे” हा देखील उत्पात नाही. नवशिक्या सदस्यांकडून या व अशा अनेक चुका अपेक्षितच आहेत. त्यातून नवीन आणि जुने असे सर्व सदस्य शिकत जातात. मराठीतील आकडे देवनागरीत न लिहता इंग्रजी पद्धतीने लिहिले तर मराठीचे सुलभीकरण होईल असे एखाद्याला वाटू शकते. विकीच्या धोरणात ते बसत नसल्यास त्याला तसे सांगावे लागेल. सांगून न ऐकल्यास धोरण बदलता येईल का याची चर्चा करावी लागेल. धोरण बदलता येत नसल्यास बॉट लावून इंग्रजी आकडे मराठी करायला कितीसा वेळ लागणार आहे? इंग्रजी विकीवर कशी लगेच ऍक्शन घेतात तशी मराठी विकी घेऊ शकत नाही. आधीच तोळा मासा असलेली मराठी विकी अशाने मरणपंथाला लागेल. 

एका पानावरील इतिहास बदलून असत्य इतिहास लिहिला असा दुसरा आरोप आहे. सत्य हे सापेक्ष असून बहुमत, सत्ता, संपत्ती, अधिकार याच्या जोरावर हवे तसे  वाकवता येते. काही एक सुप्त हेतू मनात ठेवून जाणूनबुजून असत्य लेखन केले असे या बाबतीत तरी म्हणता येणार नाही. लिखाण करणाऱ्यांचे पूर्वग्रह त्यांच्या लिखाणात येणे अगदी साहजिक आहे. आणि म्हणूनच विकीवर "ऐडिट” बटण आहे! तुम्हाला खटकणारे पूर्वग्रह तुम्ही दुरुस्त करू शकता. "आम्हाला काय इतर दुसरे धंदे नाहीत का" असा प्रश्न पडला असेल तर पूर्वग्रहविरहित, बावनकशी सोन्यासारखे निखळ सत्य सांगणारा ब्रिटानिका एनसायक्लोपिडीया आहेच की! विकीला विसरा.

विकीवरील कोणतेही पान कधीच "संपूर्णपणे पूर्ण” होत नाही. कोणतेही पान कधीच "संपूर्णपणे नष्ट” होत नाही. तसेच ते कधीच "संपूर्णपणे सत्य” सांगत नाही. विकी ही कुणी सती-सावित्री असून, आतमध्ये शंकराच्या पूजेत मग्न आहे तेव्हा तिचे पावित्र्य आणि कौमार्य यांचे रक्षण करण्यासाठी हातात नंग्या तलवारी घेऊन दिवस-रात्र दरवाज्याबाहेर खडा पहारा दिला पाहिजे असे नाही. त्याचबरोबर विकी म्हणजे  "मोकळे कुरण” असे समजणे देखील चुकीचे ठरेल. या दोन्ही मधील सुवर्णमध्य काढावा लागेल. जर एका बाजूला झुकावेच लागले तर मोकळ्या कुरणाच्या बाजूने झुकावे लागेल. कारण हा "मोकळेपणा” विकीच्या डी.एन.ए. मध्येच लिहिला आहे. ते काही व्यंग नाही. त्यातूनही तो जर दोष मानला तर तो विकीचा जन्मजात दोष म्हणावा लागेल. त्यावर काही उपाय नाही.

१७ मे, २०२०

पर-सवर्णाचे सोवळे ओवळे

अनुस्वार द्यावा की देऊ नये?

याचा निर्णय शुद्धलेखन नियमात सुरवातीलाच दिलेला आहे. (नियम १.१ व नियम १.५)

फक्त स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. ज्या शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो. किंवा तो उच्चारलादेखील जात नाही. अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये. जुन्या साहित्यात अनुस्वाराचा विपुल उपयोग केलेला आढळेल. आताच्या जमान्यात असे नाकात बोलले जात नाही, तसेच लिहिलेही जात नाही.

उदाहरणार्थ:

अनुस्वार द्यावाः गुलकंद, चिंच, तंटा, आंबा
अनुस्वार देऊ नयेः हंसणे, धांवणे, जेव्हां, कोठें, कधीं, कांही


पर-सवर्ण पद्धतीने अनुस्वार दिलेला चालेल का?

याचा निर्णय देखील नियमात सुरवातीलाच दिलेला आहे. (नियम १.२ व नियम १.३) पण या नियमाचा अर्थ नीट न लावला गेल्यामुळे फार गोंधळ निर्माण झाला आहे. तर नियम असे सांगतो की -

तत्सम म्हणजे संस्कृतमधून मराठीत आलेल्या शब्दांना पर-सवर्ण पद्धतीचा अनुस्वार द्यायला "विकल्पाने” हरकत नाही.

यात तीन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

१) ही सूट संस्कृतमधून मराठीत आलेल्या शब्दांनाच आहे. प्युअर मराठी शब्द जसे संप, आंबा, मंदिर, दंगा हे अनुस्वारानेच लिहायचे आहेत. आई आपल्या मुलाला जसे रंग, रूप देते तसेच कधी कधी ब्लड प्रेशर, डायबिटीस देखील देते तसे पर-सवर्ण ही संस्कृतची "लिगसी” मराठी भाषेला मिळाली आहे. ती सांभाळण्याचे टेंशन घेऊ नका. आधीच जोडाक्षरे लिहताना आमची हालत होते. त्यात अनुस्वाराने भागणारे काम जोडाक्षराने का लिहायचे? कोणता शब्द संस्कृतातून आला आहे आणि कोणता ९६ कुळी मराठी आहे याची कल्पना आमच्या तीर्थरूपांना देखील नाही, तर आम्हाला कुठून असणार? नियमानुसार 'अंतर्गत' शब्द 'अन्तर्गत' असा लिहिला तर चालेल. पण 'संबंधित' शब्द 'सम्बन्धित' असा लिहता येणार नाही. कारण काय तर 'अंतर्गत' संस्कृत तर 'संबंधित' मराठी शब्द आहे. काय सांगता? हे कसे ओळखले बुवा? बुरखा घातलेल्या बाईचे वय, सौंदर्य काही जाणकार सांगू शकतात. पण आम्ही कशातलेच जाणकार नसल्यामुळे बाई किंवा शब्द ओळखू शकत नाही. आता तो आमचाच प्रॉब्लेम आहे हे मान्य. पण त्यासाठी तत्सम व तद्भव शब्दांचे वेगवेगळे शब्दकोश तरी उपलब्ध आहेत का? तर उत्तर नाही. किंवा कोणत्या शब्दकोशात तशी काही खूण आहे का? १०० / २०० वर्षांपूर्वीच्या एखाद्या शब्दकोशात तशी सोय असेल कदाचित पण तो शब्दकोश आता "आऊट ऑफ प्रिंट" झाल्यामुळे बघायला देखील मिळणार नाही!

२) दुसरी गोष्ट म्हणजे "हरकत नाही” या शब्दाने काय सूचित होते? त्याचा अर्थ अनुस्वार देणेच अपेक्षित आहे पण एखाद्या डुढ्ढाचार्याने पर-सवर्णाचे सोवळे पाळले तर आम्ही "हरकत” घेणार नाही.

३) तिसरी गोष्टः

विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही. यातील विकल्पाने याचा अर्थ काय? विकल्प या शब्दाचा अर्थ इथे "एकापेक्षां अधिक रूपांचा किंवा नियमांचा स्वीकार" हा आहे. पण त्याबरोबरच विकल्प शब्दाचा मोल्सवर्थने लावलेला अर्थ म्हणजे respecting difference of opinion असा आहे. म्हणजे भिन्नमताचा आदर करा. पण म्हणून मूळ नियमाला म्हणजे अनुस्वाराला विसरून जा असे होत नाही.

नियम असेही सांगतो की अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे. लोकं सरसकट न किंवा म वापरतात ते चुकीचे आहे. ‘त' वर्गासाठी 'न’ तर प साठी म वापरले पाहिजे. त वर्ग म्हणजे त, थ, द ध न उदाहरणः पंडित=पण्डित, अंतर्गत=अन्तर्गत, अंबुज=अम्बुज.

फांद्यांचा हा शब्द फान्द्‍यान्चा असा लिहणे अशुद्ध आहे. फार तर तो फान्द्‍याञ्चा असा लिहता येईल कारण नियमाप्रमाणे द ला न तर च ला ञ जोडावा लागेल. आता तुम्हीच सांगा की तुम्हाला फांद्यांचा वाचायला आवडेल की फान्द्‍याञ्चा ? मुळात फांदी हा शब्द संस्कृत नसून मराठी आहे त्यामुळे त्याला पर-सवर्ण वापरायची सूटच नाही! आता झाला का वांदा (की वान्दा?) तर मूळ मुद्दा असा आहे की पर-सवर्णाच्या नादात जोडाक्षरे वाढतात, ती बेढब दिसतात. लिहायला अवघड जातात. अनुस्वाराची बिंदी वर लावली की खाली त वर्ग आहे की प वर्ग याची चिंता करावी लागत नाही. तसेच तत्सम की तद्भव याचाही विचार करावा लागत नाही.

पर-सवर्ण नीट विचार करून वापरला नाही तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.

उदाहरणार्थ:

वेदांत=वेदांमध्ये, वेदान्त= तत्वज्ञान,
देहांत=शरीरांमध्ये, देहान्त= मृत्यू.

या विषयाला एक तांत्रिक बाजू देखील आहे. युनिकोडमध्ये (गूगलमध्ये) तेंडुलकर आणि तेण्डुलकर तसेच तेन्डुलकर वेगवेगळ्या इंडेक्सखाली नोंद होतात. कुणी तेंडुलकर म्हणून शोधले तर पर-सवर्ण पद्धतीने लिहिलेला लेख मिळणार नाही.

खाली दिलेले सर्व शब्द मराठी आहेत. सबब त्यांना अनुस्वाराची बिंदी लावावी. पर-सवर्णाची फॅशन तिकडे हिंदीत करा फार तर, इकडे नको!

सन्त अम्बादास मन्दिर मण्डळ, शेन्दूर पारम्पारिक सौन्दर्यासाठी बान्धल्यानन्तर यशवन्तराव स्वातन्त्र्यसैनिकान्ना

_____

इंग्रजी शब्द लिहिताना देखील अनुस्वारयुक्त शब्द लिहिणेच बरोबर आहे. पर-सवर्ण पद्धतीने लिहू नयेत.

१) "ब्रँडी" = ब ् र ँ ड ी (३ मुळाक्षरे + ३ स्वर) - ७२ हजार रिझल्ट

२) "ब्रॅंडी" = ब  ् र ॅ ं ड ी (३ मुळाक्षरे + ४ स्वर) - १६ हजार रिझल्ट

३) "ब्रॅण्डी"  = ब ् र ॅ ण ् ड ी (४ मुळाक्षरे + ४ स्वर) - २२२ रिझल्ट

४) "ब्रॅन्डी" = ब ् र ॅ न ् ड ी (४ मुळाक्षरे + ४ स्वर) - ७ हजार रिझल्ट 

०९ एप्रिल, २०२०

लॉकडाऊनच्या निमित्ताने

सध्या लोकांकडे भरपूर मोकळा वेळ आहे, तेव्हा खाली दिलेल्या समस्या या खरोखरच्या समस्या आहेत हे निदान मान्य करण्याकरता थोडा वेळ कोणाला काढता येईल का?

१)  गर्दीचा सोस
२) थुंकण्याचा रोग
३) स्वच्छतेचे महत्त्व
४) प्रदूषणाचा राक्षस
५) ध्वनी प्रदूषणाची समस्या
६) रांगेची शिस्त
७) व्यसनाचा विळखा
८) लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार

१)  गर्दीचा सोस
"अंत्यसंस्कारांचे कार्यक्रम"  या लेखात डॉ. सुधीर देवरे म्हणतात...

सुख असो की दु:ख. लग्न असो की मृत्यू. कार्यक्रम भरगच्च हवाच. खूप गर्दी हवी कार्यक्रमाला. माणसाला गर्दीशिवाय सुख साजरं करता येत नाही की दु:ख. जेवढी गर्दी तेवढा जसा मोठा आनंद; तशी जेवढी गर्दी, तेवढं प्रचंड मोठं दु:खं. माणसाला गर्दी आवडते. दु:खात सुध्दा आपल्या आजूबाजूला प्रचंड गर्दी हवीच. गर्दीने दु:खाची सुध्दा प्रतिष्ठा वाढते असा आपला समज होतोय का?

http://sudhirdeore29.blogspot.com/2019/10/blog-post.html

२) थुंकण्याचा रोग
थुंकू नये याचा भारतीय अर्थ थुंकून ये असा होतो असे सचिन वाडी म्हणतात...

तर मित्रांनो, मी (आणि आपण पण) रोज आपल्या आजूबाजूला थुंकणाऱ्या व्यक्तींचे थवे च्या थवे (कळप म्हणा हव तर) बघतो. अगदी मनापासून थुंकतात हे लोक. यांना काही वेळ, काळ, जागा याचं भान ठेवण्याची गरज नसते. हे आपल्याच विश्वात असतात . ट्राफिक सिग्नल असोत, दवाखाने असोत, ऑफिसेस च्या इमारती असोत का त्या इमारतीमधील लिफ्ट्स किंवा भिंती असोत; आम्ही आपल्या बापदादांची जागा आहे असे समजून एकदम बेभान होवून थुंकणार.

https://sachinwadi.wordpress.com

३) स्वच्छतेचे महत्त्व
स्वच्छ भारत अभियान आणि आपण या लेखात निलेश म्हणतात...

आपण सगळे आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. आपला पैसा, आपला वेळ वाया जात आहे. आपल्या नद्या या सांडपाणी वाहून नेणारी गटारे बनल्या आहेत. कचर्‍याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत.

https://www.misalpav.com/node/29008

त्यावर आलेली पहिलीच (मासलेवाईक) प्रतिक्रिया म्हणजेः सुंदर निंबध. शुद्धलेखनासाठी पाच मार्क एकस्ट्रा

इतर काही प्रतिक्रिया अशाः

गाडगेबाबा थकले सांगून.
नागरिकशास्त्राची पुस्तकंसुद्धा कामी येयीनात.
हजारेंच्या अण्णांनीही प्रयत्न केलेच.
आता मोदी.
चालायचंच.

लोक फक्त आपल्या स्वतःच्या रहात्या घराला घर समजतात, शहराला/ गावाला/ देशाला 'आपले घर' समजत नाहीत, हा खरा प्रॉब्लेम आहे. लोकांमध्ये एकमेकांमधली दरी कमी होत नाही आणि नागरिक विरुद्ध सरकार असा एक विनाकारण बसलेला तिढा सुटत नाही, तोपर्यंत लोक स्वच्छतेच्या बाबतीत बेपर्वा रहाणार हे देखील एक कारण आहेच.

४) प्रदूषणाचा राक्षस
थुंकण्याची तुलना श्वसनाशी करणारे सारंग दर्शने म्हणतात…

सर्वसामान्य भारतीय नागरिकांना थुंकू नका, असे सांगितले तर ‘श्वसन करू नका’ असे सांगितल्यावर जशी एखाद्याची जीवघेणी घुसमट होईल, तशी घुसमट सामान्य भारतीय नागरिकाची होईल. रस्त्यात थुंकू नका किंवा रेल्वेच्या डब्यातून प्लॅस्टिकची पिशवी बाहेर टाकू नका अथवा सार्वजनिक ठिकाणी हातातला कचरा बेलाशक फेकून देऊ नका, हे नियम आणि निकष योग्यच आहेत. आवश्यकही आहेत.

https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/athatho/swachh-bharat-abhiyan-competition/

५) ध्वनी प्रदूषणाची समस्या
एक गलबलून टाकणारा अनुभव सांगताना चंद्रशेखर म्हणतात…

पुण्यात नागरिक शास्त्र जाणणारे, शिकलेले लोक रहातात असा माझा कालपर्यंत भ्रम होता. काल रात्रीच्या दोन तासात तो दूर झाला. पुणे ही अनेक जंगली टोळीवाल्यांची मिळून बनलेली वस्ती आहे हे लक्षात आले. यापैकी प्रत्येक टोळीची स्वत:ची वागण्याची तर्‍हा आहे. यामुळे इतर लोकांना कितीही त्रास झाला तरी या जंगली टोळीला त्याची पर्वा असण्याचे काहीच कारण नाही. त्या लोकांनी स्वत:चे बघून घ्यावे.

http://mr.upakram.org/node/2621

६) रांगेची शिस्त
शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे? असा प्रश्न विचारणारे नागोराव येवतीकर म्हणतात...

शाळा तर सर्वांनीच शिकलेली असते मग शाळेत शिकलेली शिस्त कुठे गेली? असा प्रश्नदेखील मनात येतो. शाळेतल्या कोणत्याच बाबीचा परिणाम प्रत्यक्षात समाजात जीवन जगताना दिसत नसेल तर या शिक्षणाचा फायदा तरी काय? शिक्षण हे फक्त नोकरीसाठीच आहे काय? मुलांना पुस्तकी ज्ञान देताना त्यांना मूल्यशिक्षण देण्याचे पार विसरून चाललो आहोत

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/saamana-epaper-saam/lekh+shaletil+rangechi+shist+jate+kuthe-newsid-99436965

७) व्यसनाचा विळखा
व्यसनाबद्दलचा आपला स्वानुभव सांगताना तुषार नातू म्हणतात...

मी पूर्णपणे ब्राऊन शुगर च्या आहारी गेल्यावर माझी भूक मंदावली होती , वजन कमी होत चालले होते , तसेच आता ब्राऊन शुगर साठी लागणारे पैसे जमवणे देखील कठीण होत चालले होते. त्यामुळे घरात चोऱ्या करणे, बाहेर उधारी करणे, ओळखीच्या लोकांकडे उसने पैसे मागणे असे प्रकार सुरू झाले होते.

http://tusharnatu2013.blogspot.com/2013/03/blog-post_1623.html

८) लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार
लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीतील लेखक म्हणतात...

दर चार मुलींपैकी एका मुलीला आणि दर सात मुलग्यांपैकी एका मुलग्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागलेलं असतं. अशी आकडेवारी बाहेर आली की, एक प्रतिक्रिया नेहमीच समोर येते- ‘‘हे असले प्रकार होत असतील पाश्चात्त्यांकडे. आमची भारतीय मूल्यव्यवस्था फार चोख आहे!’’

https://www.loksatta.com/chaturang-news/we-must-speak-5598/ 

२९ जानेवारी, २०२०

नाबर की नंबर?

गुगलने मशीन लर्निंगचा वापर करून सर्च रिझल्ट दाखवायला सुरुवात केली, त्याला आता फार नाही पण एक-दोनच महिने झाले असतील.

https://www.blog.google/products/search/search-language-understanding-bert/

काही बाबतीत रिझल्टमध्ये सुधारणा झाली असली तरी इतर बऱ्याच बाबतीत आणि विशेषतः देवनागरी सर्चची क्वालिटी घसरलेली दिसते.  आज मी "मंगेश नाबर” या व्यक्तीची माहिती गुगलून पाहिली तर "मंगेश" आणि "नंबर"  हे दोन शब्द असलेली पाने पहिल्या पानावर दिसत आहेत. बहुतेक गुगलने "नाबर” या शब्दाला बदलून "नंबर” केले असावे!

१२ जानेवारी, २०२०

स्पर्धापरीक्षेचा खरा धोका

राजन गवस यांचा "सुत्तडगुत्तड : स्पर्धापरीक्षेची लष्करअळी” हा लेख वाचण्यासारखाः
https://www.loksatta.com/chaturang-news/armyworm-of-the-competition-exam-abn-97-2020627/

लेखाचा सारांश असाः
नोकऱ्याच नसतील, असलेल्या वशिल्याशिवाय मिळतच नसतील, तर शिकायचं कशाला, अशी मानसिकता तयार होत असतानाच यूपीएससी, एमपीएससीची लष्करअळी कोणीतरी गावात आणून सोडली. जागा कमी, परीक्षा देणाऱ्यांची संख्या कैक लाखांत. एक परीक्षा, दोन परीक्षा करत करत तिशी उंबऱ्यावर येऊन ठेपली आणि समोर सगळा अंधारच दिसायला लागला.. आईबाप कंगाल झाले. उमेदीची वर्षे मातीत गेली. या भयंकर साथीच्या अळीनं त्यांची आयुष्यंच बरबाद केली. याला जबाबदार कोण? हजारात एक होत असेल अधिकारी पण या नऊशे नव्याण्णवांचे काय?

हे वास्तव नक्कीच चिंताजनक आहे. पण माझ्यामते खरी समस्या वेगळी आणि अधिक गंभीर आहे. स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली जो अभ्यास करून घेतला जातो त्याचा बहुतांश भाग हा "माहिती" या स्वरूपाचा असतो. म्हणजे अमुक एका नेत्याचे निधन कोणत्या वर्षी झाले? अमुक एक शासन पुरस्कार कोणाला मिळाला?  त्यातही विद्यार्थ्याला जातीयवादी बनविणारे कित्येक प्रश्न असतात. उदा. अमुक एक जात ओबीसी वर्गात मोडते का? अमुक एक जात तमूक एका जातीच्या वरची की खालची (असा प्रश्न डायरेक्ट नव्हे तर अप्रत्यक्षरीत्या विचारलेला) सध्या मार्केटमध्ये  मागणी असलेले अभ्यासक्रम म्हणजे "डेटा सायन्स”, "मशिन लर्निंग”, “आर्टिफिशियल इंटेलिजन्स" यांची त्यांना गंधवार्ताही असत नाही. जातीयवादी आणि कंपूबाजी याचा सराव झाला की कोणत्यातरी राजकीय / सामाजिक  पक्षात आपोआप प्रवेश होतो आणि जीवनाची दिशाही बदलते. ही दशा मात्र खात्रीने अधोगतीकडे घेऊन जाते!

०९ डिसेंबर, २०१९

नियमानुसार काम!

"मी चहा प्यायला" हे प्रमाणभाषेतले वाक्य उदाहरण म्हणून घेऊ. जर "प्यायला" हा शब्द "पाय्ला" असा लिहिला तर तो शब्द अशुद्ध ठरतो. त्याखाली लाल रेघ येते आणि योग्य शब्द म्हणजे "प्यायला" राईट क्लिकवर दिसतो. इथपर्यंत तुमचं आमचं जमलं. आता पुढचं पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या!
"मी चहा प्यायला" हे प्रमाणभाषेतले वाक्य, तर "मी चाय पिली" हे बोली भाषेतले वाक्य. दोन्ही शुद्धलेखनाच्या दृष्टीने शुद्धच आहेत. स्पेलचेकमध्ये "पिली" या शब्दाखाली लाल रेघ येत नाही. असे का? "बसणे" या क्रियापदावरून ज्या  नियमाने "बसली" हे रूप बनते त्याच नियमाने "पिणे" वरून "पिली" बनते. स्पेलचेकर शब्दाचे लिंग तपासत नाही. त्यामुळे "चाय पिली" किंवा "चाय पिला" दोन्ही शुद्धच! प्रमाणभाषेत हे बसत नाही ही गोष्ट मान्य. पण त्याला काय करणार? "शिश्ठ"  लोकांना मान्य नसेल तर हा स्पेलचेकर "शिष्टमान्य" नाही असे फार तर म्हणता येईल. अर्थात मी बोली भाषेत लिहितो असे म्हणत कोणी "मी चाय पीली" असे लिहिले तर पीली शब्दाखाली लाल रेघ येईल. दीर्घ "पी" बदलून ह्रस्व करावा लागेल. हंस्पेल नियमांच्या बाबतीत नो काँप्रोमाईज!

०३ नोव्हेंबर, २०१९

कशाकशाचे सुलभीकरण?

"बालभारतीपुरस्कृत अभिनव मराठी संख्यावाचन पद्धतीबद्दल काही शंका"  हा सलील कुळकर्णींचा अमृतमंथन ब्लॉगवरील लेख नुकताच वाचनात आला.

या धोरणामुळे मराठीचे सुलभीकरण होत असेल तर त्याला माझा विरोध असण्याचे कारण नाही. पण हे सुलभीकरण फक्त संख्या वाचनापुरतेच मर्यादित असणार आहे की पुढे पुढे सर्वच क्षेत्रात त्याचा संचार होणार आहे हे देखील स्पष्ट होऊ द्या.  इंग्रजीत नाते संबंध देखील फार सुलभ पद्धतीने सांगितले जातात. "आँटी" म्हणजे काकू, मावशी किंवा आत्या कोणीही असू शकते.  चायनीज भाषेत मात्र वडिलांच्या मोठ्या भावाला एक शब्द तर वडिलांच्या लहान भावाला दुसरा शब्द आहे. आपल्यासारखे फक्त काका किंवा अंकल म्हणून ते पुरे पडत नाही. त्यांना ही नाते सुलभीकरणाची प्रक्रिया समजावून सांगायला कोणी तयार होईल का? माझी आई फोन वर देखील "नंडेची सासू" वगैरे शब्द वापरते. संभाषण पुढे जाते म्हणजे पलिकडची जी कोण असेल तिला ते नाते समजले असा होतो. माझ्याबरोबर बोलताना मात्र तिला फार जपून (सुलभीकृत) भाषेत बोलावे  लागते. कारण "नणंद" म्हणजे नक्की कोण असा माझा प्रश्न  असणार हे तिला माहीत असते. सुलभीकृत भाषेत बोलावे असा अत्याग्रह धरला तर संवादच थांबतो असा माझा तरी अनुभव आहे. तेव्हा बालभारतीने ती शक्यता देखील विचारात घ्यावी. गुजरात राज्याच्या विकासाचे मॉडेल सगळीकडे चालेल असे समजणे शहाणपणाचे नाही तसेच एका भाषेतील सुलभता दुसरीकडे कॉपी-पेस्ट करून समस्या सुटत नाही, उलट जटील बनते कारण प्रत्येक भाषेला स्वतःचा असा इतिहास, संस्कृती आणि गरजा असतात व त्या पूर्ण करणारे शब्द हवे असतात. 

२२ मे, २०१९

चतुरंग पुरवणीतील महत्त्वाचे लेख

राजन गवस यांचा आवर्जून वाचावा असा लोकसत्तेतील चतुरंग पुरवणीतील लेख (सुत्तडगुत्तड : मुक्त लेक)
https://www.loksatta.com/chaturang-news/suttadguttad-article-about-author-rajan-gavas-8-1891591/

यातील काही भाग फार महत्त्वाचा…
सावित्रीच्या लेकी महाराष्ट्रभर कर्तृत्व गाजवत आहेत. याबाबत भरभरून बोललं, वाचलं, लिहिलं जातं. पण हे सर्व होत असताना त्यांच्या आरोग्याबाबत, मानसिकतेबाबत कोणीच काही ध्यानात घ्यायला तयार नाही. हा खरा चिंतेचा प्रश्न आहे. पालक, शाळा, समाज सारेच मुलींच्या आरोग्याबाबत काही विचार करत आहेत याचे कुठं काही तपशील येतात असे चित्र नाही. तिनं गल्लीत खेळायचं नाही. घरात खेळायचं नाही. शाळेत तर खेळायला जागाच नाही. अशा वातावरणात पोरीच्या आरोग्याचं होणार तरी काय?
ते खेळ, ती गाणी, ते वाढणं, रांधणं टाकून द्यावं वाटत असेल, तर टाकून द्या. झिम्माफुगडी कालबाह्य वाटत असेल तर खेळू नये. पण त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था आपण काही निर्माण केली का? नवं संगोपनशास्त्र विकसित केलं का? याचं उत्तर नकारार्थीच येतं. त्यांच्या संगोपनाबाबत घरातील पालकांनी आणि शाळेतल्या शिक्षकांनी स्वतःचे परंपरागत दृष्टिकोन बदलायला पाहिजेत. जेव्हा तुम्ही जुने खेळ सहज टाकून देता तेव्हा जुने दृष्टिकोन नको का टाकून द्यायला. मुलगी म्हणजे परक्या घरचं धन. बाईच्या जातीनं असं करून कसं चालेल. बाई म्हणजे काचेचं भांडं. आमच्या घरची अशी रीत, तशी रीत. हे सगळं बाजूस सारल्याशिवाय मुलीचं संगोपन कसं होईल नीट.
_____

नीरजा यांचा विचार करायला लावणारा  लोकसत्तेतील चतुरंग पुरवणीतील लेख (तळ ढवळताना : डिस्कनेक्ट होण्याच्या काळात..)
https://www.loksatta.com/chaturang-news/tal-dawaltana-article-by-neerja-9-1891601/
यातील काही भाग फार महत्त्वाचा…

 ‘व्हॉट्स अ‍ॅप’मुळे सकाळच्या ‘गुड मॉर्निग’नं दिवसाची सुरुवात व्हायला लागली आणि रात्री ‘शुभरात्री’ म्हणत झोपायला लागलो. फार पूर्वी कधी तरी इंजिन सोडून यार्डात गेलेले डबे पुन्हा एकदा जोडले गेले आणि आमची ट्रेन एका छानशा सफरीला निघाली. पण ही सफर वाटली होती तेवढी प्रसन्न नाही राहिली.  वादाच्या ठिणग्या पडायला लागल्या. काहींनी ग्रुप सोडला, काही ग्रुपवर राहूनही कायमचे मुके झाले तर काही नित्यनेमाने एक आन्हिक म्हणून प्रत्येक वाराबरोबर बदलणाऱ्या देवदेवतांच्या प्रतिमा, कधी साईबाबा तर कधी स्वामी समर्थ मग त्याच्या जोडीला स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, भगतसिंग, क्वचित कधी तरी जोतीबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, नाही तर थेट नाना पाटेकर, विश्वास नांगरे पाटील वगैरेच्या नावावर खपवल्या गेलेल्या संस्कारांचं भरघोस पीक, सुविचारांची उधळण, कधी ‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’ म्हणत जुन्या दिवसांच्या काढलेल्या आठवणी, वेगवेगळ्या दिवसांच्या, सणावाराच्या शुभेच्छा, बायकोच्या (कथित) हुकूमशाहीवरचे विनोद, आणि जोडीला ‘मेरा भारत महान’च्या घोषणा!
आज इतिहास जाणून घेण्यासाठी खोल आणि विस्तृत पट उलगडून दाखविणारी पुस्तकं वाचण्याची गरज असते हे वेळ नसलेली आणि वाचनाची सवयच नसलेली माणसं विसरून गेलेली आहेत. आता केवळ सीमेवरच सैनिक लढताहेत असं नाही. तर प्रत्येक घराची रणभूमी झाली आहे. अलीकडे तर अनेक ‘फेसबुक’ व ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुपवर युद्धसदृश स्थिती आहे. फुलापानांनी आणि सुंदर सुविचारांनी भरलेला ‘व्हॉट्स अ‍ॅप’चा अवकाश हळूहळू हिंसक रंगांनी भरायला लागला. समाजमाध्यमांमुळे सोपं झालं आहे कनेक्ट होणं एकमेकांशी. पण मनानं डिस्कनेक्ट होत चाललो आहोत कायमचे, त्याचं काय करायचं राव! 

०९ नोव्हेंबर, २०१४

से नो टू जंक

आजच्या लोकसत्ता - लोकरंग पुरवणीतील वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांचा आहारावरचा लेख फारच छान.

http://www.loksatta.com/lokrang-news/to-stop-acidity-1039776/?nopagi=1

त्यातील काही महत्त्वाची वाक्ये अशी:
आजची बाल आणि युवा पिढी यांचा आहार पोषक नाही हेच खरं आहे. चॉकलेट्स, वेफर्स, आइस्क्रीम, पाव, बेकरीचे म्हणजे मद्याचे पदार्थ, शीतपेये, पाणीपुरी-शेवपुरी असे चाट पदार्थ, बर्गर, विविध चवींचे सॉस, मिओनीज, न्यूडल्स या सगळ्या पदार्थामध्ये शरीराला वापरता येतील असे पोषक घटक नगण्य असतात. यातले काही पदार्थ तर नैसर्गिक नाहीतच, कृत्रिम आहेत. त्यामुळे त्यांचं काय करायचं हे शरीराला कळतच नाही. त्यातलाच काही भाग ते नाइलाजानं ठेवून घेतात, (रमीच्या डावात हवी ती पानं येत नसतील तर आपण नाही का आलेली निरुपयोगी पानं ठेवून घेतो..) साठवतात आणि वजन वाढू लागतं.

मुलांच्या लहानपणापासूनच पालकांनी जागरूक राहायला नको का? लाड म्हणून, आम्हाला मिळालं नाही म्हणून, सगळं खाण्याची सवय हवी म्हणून, जवळ पैसे आहेत म्हणून, मुलांना आवडतं म्हणून - अशी तद्दन भंकस कारणं पुढे करून या कचऱ्याची/ विषाची चटक मुलांना कोण लावतं? आई-बाप झाल्यावरही आपल्याला जर आहाराबाबत योग्य-अयोग्य ठरवता येत नसेल, तर बिचाऱ्या मुलांना इतक्या लहान वयात सांगितल्याबरोबर ते कळेल आणि वळेल अशी अपेक्षा आपण कशी काय करू शकतो? मग यावर उपाय काय? तर या पदार्थांना उत्तम पर्याय असे घरगुती, ताजे, पोषक आणि चविष्ट पदार्थ सगळ्या मातांनी ते बनवले पाहिजेत.

सायलीसारख्या मुलींच्या अग्नीची वाट लावणारा मुख्य घटक म्हणजे व्यायामाचा अभाव. 'मार्कांच्या स्पर्धेत उतरवलेल्या आपल्या पाल्यानं अभ्यासाशिवाय इतर कुठलेही 'फालतू' उद्योग (व्यायाम, घरकाम, स्वतःची कामं, खेळ, चालत शाळेत जाणं) केलेले आजच्या महत्त्वाकांक्षी पालकांना अजिबात खपत नाही.

औषधं, पंचकर्म याद्वारे इलाज करता येतात. पण ते खूप वेळखाऊ असतात आणि रुग्ण ते गांभीर्यानं घेत नाहीत. लहानपणापासून योग्य आहार ठेवला तर कित्येक आजारांपासून आपल्या मुलांना दूर ठेवता येऊ शकतं. आरोग्याच्या बाबतीत नेहमीच 'तहान लागण्यापूर्वी विहीर खणणे' इष्ट. 
_____

खरोखर डोळ्यात अंजन घालणारा लेख आहे हा.
मुळातूनच सगळा वाचायला हवा असा.

जंक फुड खाण्यापूर्वी मी माझीच अशी समजूत करून घेत असे की "कधीतरी खायला काय हरकत आहे? आपण काय रोज थोडीच खातो ह्या गोष्टी?" पण आता हिशोब करतो तेव्हा लक्षात येते की जंक फुडचे हजारो प्रकार. एकच ईश्वर पण त्याची खूप नावे, तसा काहीसा हा प्रकार. वर्षातून एक, दोनदाच खायचे म्हटले तरी कित्येक वर्ष पुरतील इतक्या व्हरायटीने सगळे मॉल ओथंबून वाहताहेत. यातून बाहेर पडायचा एकच उपाय, "से नो टू जंक फूड" गाई म्हशींसकट सगळं प्राणी जगत आपलं अन्न ओळखतं आणि बाकीच्या गोष्टींना तोंड लावत नाही. आपण मात्र पुढे येईल ते पोटात ढकलतो! आहार हाताबाहेर जाण्यास आपले संस्कारही कारणीभूत आहेत. यातील मुख्य नऊ:

१) पानात काहीही टाकायचं नाही.
२) सगळं पचलं पाहिजे, नसेल पचत तर सवय करायची.
३) रोज नाही, पण कधीतरी खायला काय हरकत आहे?
४) शिपीभर अन्न पातेल्यात उरता कामा नये. केलेलं सगळं संपलं पाहिजे.
५) तो बघ. तुझ्या एवढाच आहे. पण त्याचे खाण्यापिण्याचे काही नखरे नाहीत. एकदम आदर्श मुलगा !
६) आपल्यात (आपल्या जातीत) हे खात नाहीत किंवा हा पदार्थ असाच करतात.
७) असली थेरं इथे चालणार नाहीत. खाण्यापिण्यावर असा खर्च केला असता तर आमचा संसार झाला असता का?
८) पालेभाजी धुवा, निवडा, चिरा म्हणजे खूप व्याप. पालेभाजीला श्रम आणि वेळ जास्त लागतो. त्यापेक्षा वांगं, बटाटा, भेंडी अशा फळभाज्या बर्‍या पडतात करायला. त्यालाही वेळ नसेल तर नाक्यावर मिळतात हल्ली सगळ्या भाज्या, रेडिमेड. ४० रुपये प्लेट म्हणजे थोड्या महाग पडतात, पण वेळ (त्यापेक्षा श्रम) वाचतात. ते महत्त्वाचे.
९) आज मिळतंय ते खाऊन घे. उद्या कदाचित हे देखील मिळणार नाही.

काही दुकानांमध्ये "कृपया इन शब्दोंका प्रयोग मत किजीये" अशी विनंती करणारा एक फलक असतो. त्यात "पहचानता नहीं क्या? , पैसा कल देता हूं, लिख लेना" अशी वाक्ये असतात. तसा घरात एक बोर्ड बनवायला हवा. वर दिलेली ९ वाक्ये उच्चारू नयेत असा!

०३ जून, २०१३

बुद्धिवर ज्ञानाचा अंकुश!

मनोगतावर स्त्रियांच्या संशयी स्वभावावर एकाने (स्वानुभवावर आधारित?) लेख लिहिला आहे.

हिडिंबा आणि मेनका !

यात लेखकाच्या बायकोने भीम आणि विश्वामित्रचे उदाहरण देऊन लेखकाला कोणत्याही वयाच्या स्त्रीपासून लांब ठेवलेले दिसते. त्यांनी दिलेले दाखले अगदी बिनतोड आहेत आणि त्यांचा महाभारत व पुराणांचा अभ्यासही गाढा दिसतो. पण लेखकाने त्यांना उत्तर म्हणून लक्ष्मणाचे उदाहरण का दिले नाही? इतिहासात हिडिंबा आणि मेनका आहे तशीच सीताही आहे की!
विषयांतर होईल म्हणून तिथे प्रतिसाद न देता इथे माझे मत लिहितो. रामायणातील एक सुंदर प्रश्नोत्तर हे या संशय पिशाच्चावरचा उतारा आहे. लक्ष्मणाला विचारण्यात येते...
अग्निकुण्डसमा नारी घृतकुण्डसमः पुमान| पार्श्वे स्थिता सुन्दरी चेत् कस्य नोच्चलते मनः॥
अग्नि जवळ आला की तूप वितळते तशी अग्निकुंडासारखी सुंदरी समोर असताना कुणाचे मन विचलित होत नाही?

त्यावर दिलेले लक्ष्मणाचे उत्तर पाहा:
मनो धावति सर्वत्र मदोन्मत्तगजेन्द्रवत्‌| ज्ञानांकुशसमा बुद्धिस्तस्य नोच्चलते मनः॥
मन मदोन्मत्त हत्तीसारखे धावते पण ज्याच्या बुद्धिवर ज्ञानाचा अंकुश आहे त्याचे मन विचलित होत नाही.

तात्पर्य: सगळ्याच स्त्रिया "तशा" नसतात. सगळेच पुरूष "तसे" नसतात. स्त्री पुरुषांच्या नात्यात वैषयिक नात्यापलिकडे खूप काही असते जे दोन भिन्नलिंगांच्या सहजीवनाला उपयुक्त असते. काही वेळा स्त्रियांच्या नजरेने एखाद्या विषयाकडे पाहता येते त्यामुळे आधी न दिसलेले कंगोरे दिसू लागतात. "कायम संशय" हा वैवाहिकच नव्हे तर कोणत्याही नात्यात धोकादायक ठरू शकतो!

१२ एप्रिल, २०११

वर्ल्ड कपच्या निमित्ताने...

ही चर्चा उद्बोधक आहे, आणि माझा प्रतिसाद त्यातील एका प्रतिसादाला उद्देशून आहे. तो विषयाशी संबंधित नाही. पुष्कळशा पसरटपणे माझे म्हणणे मांडायचे होते म्हणून उपक्रमावर न लिहीता ब्लॉगवर लिहीत आहे.

http://mr.upakram.org/node/3231#comment-55603

रोझा पार्कने जेव्हा स्वतः उठून बसमधील आपली जागा गोर्‍याला देण्यास नकार दिला तेंव्हा बहुतांशी लोकांनी "आहे हे असे आहे, इथे रहायचे असेल तर रहा. नाहीतर आम्ही काही निमंत्रण दिलेले नाही अमेरिकेचे" अशा अर्थाची काहीतरी बडबड केलीच.

http://en.wikipedia.org/wiki/Rosa_Parks

बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला तेंव्हाही लोकांनी विविध दाखले, परंपरा याचा उहापोह केला होता. पण शेवटी सत्य, समानता आणि विकास या त्रयीकडे जायचे की परंपरा आणि आगम प्रमाणाचा अतिरेक करायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते.

बर्‍याचदा एखादी गोष्ट इतकी आंगवळणी पडलेली असते की तिचे अस्तित्वच जाणवत नाही. अन्याय, अतिरेक हा देखील असाच सवयीचा होऊ शकतो. आपल्या अंगाला येणार्‍या घामट वासाची जाणीव जशी घरच्यांनी किंवा जवळच्या व्यक्तिंनी सांगितल्याशिवाय लक्षात येत नाही, सवयीचा भाग झाल्यामुळे. तशा खूप गोष्टी आपल्याला आपोआप दिसेनाशा होतात.

सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिकवायला सुरूवात केली तेव्हा समाजाची प्रतिक्रिया काय होती? सती जाणे, विधवांचे केशवपन हे सर्व स्टँडर्ड समजून पाळले जात होते. ज्यांना ते मान्य नसेल अशांना हिमालयात निघून जायचा सल्ला दिला जायचा. (आणि काहींनी तो पाळलाही!)

ज्या पू. ल. देशपांड्यांचे उदाहरण आपण दिले आहे, त्यांनी देखील आणिबाणीला विरोध केला होता. कॉग्रेसला पाडण्यासाठी ठिकठिकाणी प्रचार केला होता. "विदूषक" अशी हेटाळणी त्यांच्या वाट्याला आली आणि निवडणुकीनंतर सत्ता हे आपले ध्येय नाही असे जाहीर करत "परत विदूषकाच्या भुमिके"त असा लेख लिहीता झाले.

अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला पुलंना सहन झाला नाही, ते आपल्या परीने लढले. चंद्रशेखर यांना ध्वनिप्रदुषणाचा प्रश्न महत्त्वाचा वाटला, त्यांनी तो संयमित शब्दात मांडला. कुणाच्याही भावना न दुखावता आपली तक्रार समाजापुढे ठेवली, कारण कदाचित बहुमताविरुद्ध खूप मोठा संघर्ष करणे (कोर्टात/ पोलिसात जाणे वगैरे) त्यांना शक्य नसेल किंवा अन्य काही कारण असेल.

गोठ्यात राहून बैलाच्या मुताची घाण येते अशी तक्रार करणारी माणसे मला फार महत्त्वाची वाटतात. कारण त्याचा अर्थ त्यांना अजुन त्याची सवय झालेली नाही. सुवास आणि दुर्गंध यातील फरक ओळखण्याइतपत त्यांची घ्राणेंद्रिये काम करत आहेत आणि "घाण येतेय" अशी तक्रार करण्याइतपत तरी धैर्य त्यांच्यात शिल्लक आहे.

माणसाचं कंडिशनींग एकदा झालं की तो पोपटासारखा ऐकलेले बोलू लागतो. वाचलेले घडाघडा म्हणून दाखवतो, त्यातून फार तर त्याची बुद्धीमत्ता दिसते. त्याचा अर्थ तो बरोबर बोलत आहे असा होत नाही. आगम प्रमाणाचा अतिरेक हा प्रत्यक्ष प्रमाणाच्या अतिरेकापेक्षा जास्त घातक आहे. व्यभिचारी स्त्रीला दगडाने ठेचून मारणे यात मुस्लीम देशांना काही वावगं वाटत नाही. हे आगम प्रमाणाच्या अतिरेकाचे एक उदाहरण आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Stoning

जगातील कोणत्याही देशात अशी शिक्षा (कायद्याने) दिली जात नाही. पण "शरियत कायदा" या एका शब्दाने सर्व समीकरणे बदलून जातात आणि अचानक त्यातील क्रौर्य, निर्दयता दिसेनाशी होते.

ज्ञानेश्वरांनी दाखविलेला विवेकाचा मार्ग आणि पातंजलिने ठेवलेला संयमाचा आदर्श यापासून न ढळण्यातच खरी "समजदारी" है!

२७ मार्च, २०११

इतिहासाचे ओझे

इतिहास मग तो १ महिन्यापूर्वीचा असो किंवा ५ हजार वर्षांचा. तो आपल्याला काही ना काही शिकवत असतो. ही शिकवणी घ्यायची आणि भविष्याला भिडायचं असं अभिप्रेत असते, त्या इतिहासाचे कलेवर राजा विक्रमादित्याप्रमाणे आपल्या पाठीवर घेऊन नको तिकडे जायचे नसते. मला काय म्हणायचे आहे ते उदाहरणाने स्पष्ट करतो.

हरियाणात असे एक गाव आहे जिथे आल्यावर म्हणतात की श्रावण बाळाची मती फिरली आणि त्याने आईवडिलांकडे काशी यात्रेला घेऊन जायचे पैसे मागितले. तेव्हापासून "सो कॉल्ड" शाप हा गाव भोगतो आहे आणि कोणताही बुवा बाबा तिथे जाऊन बायकापोरांना ही गोष्ट सांगून रडवतो आणि जमेल तेवढी माया जमा करून जातो.

ही गोष्ट खरी की खोटी कोणाला माहीत? वादापुरती खरी मानली तरी तो त्या मातीचा दोष कसा मानता येईल? इमोशनल ब्लॉकमेलींगची एक से एक उदाहरणे हिंदू धर्मात मौजूद आहेत आणि त्याविषयी ब्र काढावासा कोणाला वाटत नाही. भावना दुखावणे हा फार हळवा प्रकार असतो आणि त्याचे परिणाम गंभीर स्वरूपाचे होऊ शकतात याची सर्वांनाच कल्पना असते.
_____

भटक्या जातीच्या हालाचे वर्णन करणारे एक पुस्तक मी २५ वर्षांपूर्वी वाचले होते. आता नाव विसरलो पण त्यातील मजकूर नाही. यात त्या तांड्याचा मुखीया लेखकाला सरकारी मदत नाकारण्याचे कारण सांगताना सांगतो "श्रीकृष्णाने आम्हाला तुम्ही भटकत राहा कुठेही स्थिर होऊ नका असा आदेश दिला आहे, तो मोडणे आम्हाला शक्य नाही."

आता यात खर्‍या खोट्याची शहानिशा कशी करणार? समजा खरे असेल, तरी तो आदेश आपद्धर्म म्हणून असेल. कृष्णाने स्वतःच्या जीवनात अशा काही गोष्टी (उदा. मथुरेतून पळून जाणे) अपवाद म्हणून केल्या होत्याच. आज तो कायदा समजून वागणे कितपत शहाणपणाचे आहे?

महाराष्ट्रातील एका अग्रगण्य मंदीरात लहान मुलींचे खुशाल कृष्णाशी लग्न लावून दिले जाते. मुलांचेही लावून दिले जाते. देवदासी फक्त मुलीच नाही, मुलेही बनतात म्हणे. आणि त्यांच्या जटा कापून टाकायला त्यांच्यातलाच एखादा पुढे आला तर तो होतो जातीबाहेर.

जाती-बहिष्कृत: जातीवरून आठवले. हिंदू धर्मातील विचारवंत, ख्रिश्चन धर्माशी तुलना करताना सांगतात, त्यांच्यात वेगळा विचार करणार्‍याला जाळून मारण्यात आलं, आमच्यात असलं काही नाही झालं. झालं ना सिद्ध? अहो कुठलं काय? आमच्याकडे जाळून मारण्यापेक्षा जास्त वाईट हत्यार होतं ना! जातीतून उठवणे. ज्ञानेश्वरांसारख्या सिद्ध पुरुषाला आत्महत्येकडे प्रवृत्त करणारा हा जातबाहेर प्रकार काय होता हे इतिहासाच्या अभ्यासातून कळते.

इतिहासाच्या अभ्यासातून मी खूप शिकलो. पण ते ओझे होईल असे वाटले की मी पुढे जात नाही. अभ्यास म्हणूनही नाही. कदाचित वयाचा परिणाम असेल. इतिहासाबरोबरच थकलेले शरीरही खूप काही शिकवते. नाही का?

०६ मार्च, २०११

काळ आला आणि वेळही

सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते वंदिनस्ताः कथाः
सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ॥

ती सुंदर नगरी, तो ताकदवान राजा, त्याचे विश्वासू सरदार, त्याच्या आश्रयाने राहणारी विद्वान लोकांची सभा , चंद्राप्रमाणे सुंदर चेहऱ्याच्या स्त्रिया , उदंड असा राजपुत्रांचा समूह , स्तुती गाणारे देशी/ विदेशी भाट आणि त्या भाटांनी गायलेल्या त्या उत्तमोत्तम स्तुती हे सर्व गेले कुठे? वेळ बदलली. सद्दी संपली. वर्तमानाला इतिहासाच्या पानात ढकलून सतत पुढे जाणार्‍या काळाला नमस्कार करण्यावाचून आपल्या हातात काय आहे? सध्या जगात जे चालू आहे त्याला काळाचा आणखी एक महिमा असेच म्हणता येईल.

१३ ऑगस्ट, २०१०

जटिल प्रश्न

एका डॉक्टरनेच हा प्रश्न विचारला आहे की, गर्भ नाकारण्याचा स्त्रीचा हक्क जसा समाजाने मान्य केला आहे, तसा (टेक्नोलॉजी वापरून) गर्भवती होण्याचा हक्क मान्य केला जाणार आहे की नाही?

http://doctorandpatient.blogspot.com/2010/08/why-are-young-fertile-women-doing-ivf.html


याचे उत्तर देणे फार कठीण आहे. मागे असाच एक मुद्दा पेपरात वाचला होता. त्याचेही उत्तर मी अजून शोधतो आहे. तंत्रज्ञान जस जसे प्रगत होत आहे तसे नैतिक - अनैतिकतेच्या कल्पनाही बदलतील, बदलाव्या लागतील बहुतेक!

प्रश्न असा आहे की, इंदिरा गांधी वा किरण बेदी न होताही सर्वसामान्य मुलगी म्हणून जन्माला येण्याचा आणि जगण्याचा मुलीला अधिकार आहे की नाही? कुणासाठीही उपयुक्त न ठरता केवळ जगण्याचा (मुक्या जनावराला) हक्क आहे की नाही?

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5928677.cms

१२ जून, २०१०

दमलेल्या बाबाची दुसरी बाजू

दमलेला बाबा सगळ्यांना मनसोक्त रडवतोय. युट्युबवर पाहा.
http://www.youtube.com/watch?v=4Q4XggDMETI

सहसा माझ्या डोळ्यात कधी पाणी येत नाही. पण हा व्हिडीओ पाहाताना आले.

डोळे पुसल्यावर थोडा मेंदू हलवला आणि दमलेल्या बाबाची दुसरी बाजू समोर आली. बाबाला २-३ वर्षांची छोटी मुलगी आहे म्हणजे वय तिशीच्या आसपास असणार. या वयात हार्ट ट्रबल, पाठदुखी, कंबरदुखी अशा छोट्या मोठ्या आजारांनी बाबा सतत का त्रस्त असतो? कॉलेजमध्ये असताना गंमत म्हणून लागलेली सिगरेटची सवय अजुनही चालूच? कधीतरी पार्टीत 'घ्यावीच लागते' म्हणून सुरू झालेली ड्रिंक्स आता कधी-मधी घरात कोणी नसताना चोरून पिताना बाबाला आठवते का आपली चिमुरडी? डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम होतो का कधी? तेरड्याचा रंग तीन दिवस? निदान योगातरी करायला हवा असे कधीतरी एकदा म्हटले की योगा 'होत' नाही. तो 'करावा' लागतो! थोडा पगार जास्त मिळतो म्हणून नोकरी बदलली, आता नवीन नोकरीत स्थिरस्थावर होण्यासाठी जास्त काम. बायको, मुलं कमी पैशात, कमी खर्चात राहायला तयार असताना लोन काढून ब्लॉक घेताना बाबाने नक्की काय हिशोब केला होता त्याचे त्याला माहीत. आई वडिलांशी पडत नसेल तर सरळ वेगळे होईन असा तोरा दाखवायचा तर घ्यावीच लागते जागा लांब, शहराबाहेर. मग लोकलचा प्रवास घाम गाळत करावा लागला तर त्याला बाबाच कारणीभूत आहे.

बाबा दमलाय हे खरे, पण त्याला जबाबदार कोण?