wikipedia लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
wikipedia लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२७ सप्टेंबर, २०२५

विकीमिडीया फाउंडेशनचे भारतातील पैसे

गेल्या ६ ते ७ वर्षांत सुमारे आठ कोटी रुपये विकीमिडीया फाउंडेशनने भारतात पाठविले.  Centre for Internet and Society (India) या संस्थेच्या वेबसाईटवर हे आकडे कोणालाही पाहता येतील. 

https://cis-india.org/about/reports

मोदी सरकारने कायदा करून परदेशातून येणार्‍या पैशाचा ओघ उघड करण्याची सक्ती केली म्हणून आज आपण हे आकडे पाहू शकतो. २०१९ सालापूर्वी देखील काही पैसे त्यांनी पाठवले आहेत पण त्याची स्वतंत्र नोंद नाही.

2019 April - June 8844962
2019 Oct - Dec 2147512
2019 Oct - Dec 1044750
2020 Jan - March 5291569
2020 July - Sep 9290535
2021 July - Sep 10258483
2021 July - Sep 3794716
2022 Jan - March 4396493
2022 July - Sep 2280016
2023 April - June 4996699
2023 July - Sep 10416927
2024 Jan - March 7037034
2024 April - June 10228197

हे आकडे फक्त सप्टेंबर २०२४ पर्यंतचे आहेत.  गेल्या एक वर्षातील जमेचे आकडे  अद्याप वेबसाईटवर दिले गेलेले दिसत नाहीत. ज्या संस्थेकडे विकीचे पैसे जमा झाले ती संस्था म्हणजे वर उल्लेख केलेली CIS ही संस्थाच  १ मे २०२५ पासून बंद पडली आहे. तसे त्यांच्याच वेबसाईटवर मुख्य पानावर लिहिलेले आहे. त्याचा अर्थ गेल्या एक वर्षात किती पैसे विकीकडून आले ते समजणे आता अशक्य नाही पण अवघड आहे. मोझिला (फायरफॉक्स) या संस्थेने देखील २ कोटीची देणगी शैक्षणिक कामासाठी दिलेली दिसत आहे. स्वतः तोट्यात असताना हा प्रपंच त्यांनी का केला ते कळायला मार्ग नाही.  परदेशातील इतर काही संस्थांनी देखील पाच - पन्नास कोटी रुपये दिलेले असतील पण तो ह्या लेखाचा विषय नाही.

ह्या ८ ते १० कोटींचा अपहार झाला आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही. माझा त्या संस्थेच्या संचालकांवर आणि विकीपीडिया साठी झटणार्‍या टीमवर पूर्ण विश्वास आहे. प्रश्न असा आहे इतका पैसा खर्च केल्यावरही मराठी/ हिंदी किंवा दक्षिण भारतातील इतर विकीपीडिया / विकीसोर्स यांची स्थिती अशी का आहे? बहुतेक सर्व स्वयंसेवक विकीसाठी आपला वेळ मोफत देतात असे सांगण्यात येते, ते खरेच तसे आहे का? कॉन्फरन्स खर्च, प्रवास भत्ता,  संगणक खरेदी अशा गोष्टी विकीसाठी कितपत फायदेशीर ठरल्या आहेत त्याचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याची त्यांची तयारी आहे का? विकीवर प्रेम करणार्‍या जगभरातील देणगीदारांनी दिलेले हे पैसे आहेत त्यामुळे त्याविषयी बोलण्याचा मला नक्कीच अधिकार आहे. कारण विकीच्या दृष्टीने १ कोटी किंवा एक रुपया देणारा देणगीदार दोन्ही एकाच मापाचे आहेत. सामान्य माणसाचा आवाज हाच विकीपीडियाचा आवाज आहे. माझे योगदान नगण्य असले तरी मी प्रश्न तर नक्कीच विचारू शकतो.


१० नोव्हेंबर, २०२१

विकी म्हणजे काय?

विकी नक्की काय आहे या विषयी बऱ्याच लोकांचा गैरसमज झालेला दिसतो. उदाहरण द्यायचे झाले तर मराठी विकीवरील सदस्य_चर्चा:ज हे पान पाहू शकता. हे सदस्य अत्यंत अनुभवी असून त्यांनी एका लेखातील काही विशिष्ट वर्ग काढून टाकले. संदेश हिवाळे यांनी स्पष्टीकरण मागितले की "या लेखातून तुम्ही कोणतेही स्पष्टीकरण न देता "वर्ग:दलित लेखक, वर्ग:दलित कार्यकर्ते, वर्ग:भारतीय बौद्ध, वर्ग:आंबेडकरवादी" हे चार वर्ग हटवले;  हे चारही वर्ग मराठी विकिपीडिया खेरीज इंग्लिश विकिपीडियासह अनेक विकिपीडियांमध्येही उपलब्ध आहेत." त्यावर यांनी सांगितले की... "विकीवरच काय पण इतरत्र कुठेही कुठलाही जातवादी उल्लेख असू नये या मताचा मी आहे. तसे उल्लेख करत राहिलो तर जातिअंताच्या चळवळीचे काय भविष्य असेल?" विकिपीडिया हे जातिअंताच्या चळवळीचे साधन आहे असे यांना कुणी सांगितले?

मराठी विकीवर मुखपृष्ठावर रामदास स्वामींनी केलेला उपदेश विकीचे अधिकृत धोरण असल्यासारखे वापरले आहे. “आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन.” यातील पहिला अर्धा भाग विकीला चपखल लागू पडतो. पण नंतरचा अर्धा भाग विकीच्या तत्त्वात अजिबात बसत नाही.  “शहाणे करोनी सोडावे” यात जो जबरदस्तीचा भाग आहे तो विकीला कधीच मान्य नव्हता. विकिपीडिया आपल्यासमोर फक्त काही माहिती ठेवते त्याच्या सत्यासत्यतेविषयी किंवा निष्पक्षतेविषयी कसलीही जबाबदारी घेत नाही.  आई जसे औषध घेतल्याशिवाय मुलाला सोडत नाही तसे काही विकी करत नाही. 

काही विचारवंत शासनावर दबाव आणण्यासाठी विकीचा वापर करावा असे लेख लिहून जाहीरपणे सांगतात. उद्या नक्षलवादी कार्यकर्तेदेखील विकीचा वापर आपल्या संघटनेच्या प्रचारासाठी करतील, काय सांगावे?

०८ नोव्हेंबर, २०२१

गाळलेल्या जागा भरा!

काही वेळा जुन्या पुस्तकातील दोन – चार शब्द पुसले गेलेले असतात. अशी पुस्तके स्कॅन केल्यावर असे शब्द काय असतील हे शोधणे कठीण होऊन बसते. 

https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Arth_shastrachi_multatve_cropped.pdf/81

दोन शब्दांमधील गाळलेले शब्द शोधून काढण्यासाठी ही क्वेरी वापरता येते.

# /root/.cargo/bin/rg  -No "(दरवर्षी (\w+ ){3}पेठ)" mr_dedup.txt

याचा अर्थ दरवर्षी या शब्दानंतर पुसले गेलेले ३ शब्द शोधायचे आहेत. पण त्यानंतर येणारा शब्द हा "पेठ” असा असला पाहिजे. या निकषात बसणाऱ्या दोन ओळी मिळाल्या...

संस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे...

वृद्ध आबासाहेबांनाही या मुलाच्या विलक्षण बुद्धिमत्तेबद्दल कौतुक होतं. दरवर्षी त्यांचा टांगा नारायण पेठेतल्या त्या जिन्याखालच्या खोलीसमोर थांबे - ज्ञानाची उपासना करणार्‍या या मुलाला गणेशोत्सवाच्या जेवणाचं समक्ष आमंत्रण करण्यासाठी.

"भरवली जाणारी ग्राहक" किंवा "त्यांचा टांगा नारायण" असे दोन पर्याय  मिळतात त्यातील. योग्य पर्याय संदर्भाने निवडता येतो. 

यासाठी ऑस्कर नावाचा पब्लिक डेटा वापरला आहे. 

https://oscar-public.huma-num.fr/shuff-dedup/mr/

आणि ग्रेप क्वेरी न वापरता रिपग्रेप कमांड वापरली कारण त्यात युनिकोड सपोर्ट आहे. रस्ट ही एक पायथॉन सारखी  प्रोग्रॅमिंग लँग्वेज असून ती देखील यासाठी आवश्यक आहे.

१४ सप्टेंबर, २०२०

मराठी विकीवरील उत्पात

मराठी विकीवरील एका सदस्याने "निज़ाम" शब्द लिहिताना नुक्ता वापरला, चर्चा पानावरील सर्व मजकूर काढून टाकला अशा काही कारणास्तव विकीच्या मालकांनी त्यांना समज देऊन त्यांचे लिखाण बंद पाडले. त्या निमित्ताने...

या सदस्याने आपल्या चर्चा पानावरील सर्व मजकूर काढून टाकला यात गहजब करण्यासारखे काही नाही. त्यांनी इतर कुठेही असे केलेले नाही. आपले सदस्य पान आणि सदस्य पानाचे चर्चा पान म्हणजे आपली वैयक्तिक मालमत्ता आहे असा बहुधा त्यांचा समज झाला असावा. तो चुकीचा आहे हे कालांतराने त्यांच्या आपोआप लक्षात आले असते. हा उत्पात नव्हे. उत्पात याचा अर्थ कधीही भरून न येणारे नुकसान. त्या अर्थाने "आकडे इंग्रजीत लिहणे” हा देखील उत्पात नाही. नवशिक्या सदस्यांकडून या व अशा अनेक चुका अपेक्षितच आहेत. त्यातून नवीन आणि जुने असे सर्व सदस्य शिकत जातात. मराठीतील आकडे देवनागरीत न लिहता इंग्रजी पद्धतीने लिहिले तर मराठीचे सुलभीकरण होईल असे एखाद्याला वाटू शकते. विकीच्या धोरणात ते बसत नसल्यास त्याला तसे सांगावे लागेल. सांगून न ऐकल्यास धोरण बदलता येईल का याची चर्चा करावी लागेल. धोरण बदलता येत नसल्यास बॉट लावून इंग्रजी आकडे मराठी करायला कितीसा वेळ लागणार आहे? इंग्रजी विकीवर कशी लगेच ऍक्शन घेतात तशी मराठी विकी घेऊ शकत नाही. आधीच तोळा मासा असलेली मराठी विकी अशाने मरणपंथाला लागेल. 

एका पानावरील इतिहास बदलून असत्य इतिहास लिहिला असा दुसरा आरोप आहे. सत्य हे सापेक्ष असून बहुमत, सत्ता, संपत्ती, अधिकार याच्या जोरावर हवे तसे  वाकवता येते. काही एक सुप्त हेतू मनात ठेवून जाणूनबुजून असत्य लेखन केले असे या बाबतीत तरी म्हणता येणार नाही. लिखाण करणाऱ्यांचे पूर्वग्रह त्यांच्या लिखाणात येणे अगदी साहजिक आहे. आणि म्हणूनच विकीवर "ऐडिट” बटण आहे! तुम्हाला खटकणारे पूर्वग्रह तुम्ही दुरुस्त करू शकता. "आम्हाला काय इतर दुसरे धंदे नाहीत का" असा प्रश्न पडला असेल तर पूर्वग्रहविरहित, बावनकशी सोन्यासारखे निखळ सत्य सांगणारा ब्रिटानिका एनसायक्लोपिडीया आहेच की! विकीला विसरा.

विकीवरील कोणतेही पान कधीच "संपूर्णपणे पूर्ण” होत नाही. कोणतेही पान कधीच "संपूर्णपणे नष्ट” होत नाही. तसेच ते कधीच "संपूर्णपणे सत्य” सांगत नाही. विकी ही कुणी सती-सावित्री असून, आतमध्ये शंकराच्या पूजेत मग्न आहे तेव्हा तिचे पावित्र्य आणि कौमार्य यांचे रक्षण करण्यासाठी हातात नंग्या तलवारी घेऊन दिवस-रात्र दरवाज्याबाहेर खडा पहारा दिला पाहिजे असे नाही. त्याचबरोबर विकी म्हणजे  "मोकळे कुरण” असे समजणे देखील चुकीचे ठरेल. या दोन्ही मधील सुवर्णमध्य काढावा लागेल. जर एका बाजूला झुकावेच लागले तर मोकळ्या कुरणाच्या बाजूने झुकावे लागेल. कारण हा "मोकळेपणा” विकीच्या डी.एन.ए. मध्येच लिहिला आहे. ते काही व्यंग नाही. त्यातूनही तो जर दोष मानला तर तो विकीचा जन्मजात दोष म्हणावा लागेल. त्यावर काही उपाय नाही.