१२ जून, २०१०

दमलेल्या बाबाची दुसरी बाजू

दमलेला बाबा सगळ्यांना मनसोक्त रडवतोय. युट्युबवर पाहा.
http://www.youtube.com/watch?v=4Q4XggDMETI

सहसा माझ्या डोळ्यात कधी पाणी येत नाही. पण हा व्हिडीओ पाहाताना आले.

डोळे पुसल्यावर थोडा मेंदू हलवला आणि दमलेल्या बाबाची दुसरी बाजू समोर आली. बाबाला २-३ वर्षांची छोटी मुलगी आहे म्हणजे वय तिशीच्या आसपास असणार. या वयात हार्ट ट्रबल, पाठदुखी, कंबरदुखी अशा छोट्या मोठ्या आजारांनी बाबा सतत का त्रस्त असतो? कॉलेजमध्ये असताना गंमत म्हणून लागलेली सिगरेटची सवय अजुनही चालूच? कधीतरी पार्टीत 'घ्यावीच लागते' म्हणून सुरू झालेली ड्रिंक्स आता कधी-मधी घरात कोणी नसताना चोरून पिताना बाबाला आठवते का आपली चिमुरडी? डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम होतो का कधी? तेरड्याचा रंग तीन दिवस? निदान योगातरी करायला हवा असे कधीतरी एकदा म्हटले की योगा 'होत' नाही. तो 'करावा' लागतो! थोडा पगार जास्त मिळतो म्हणून नोकरी बदलली, आता नवीन नोकरीत स्थिरस्थावर होण्यासाठी जास्त काम. बायको, मुलं कमी पैशात, कमी खर्चात राहायला तयार असताना लोन काढून ब्लॉक घेताना बाबाने नक्की काय हिशोब केला होता त्याचे त्याला माहीत. आई वडिलांशी पडत नसेल तर सरळ वेगळे होईन असा तोरा दाखवायचा तर घ्यावीच लागते जागा लांब, शहराबाहेर. मग लोकलचा प्रवास घाम गाळत करावा लागला तर त्याला बाबाच कारणीभूत आहे.

बाबा दमलाय हे खरे, पण त्याला जबाबदार कोण?