मराठी शुद्धलेखनाचे नियम गुगलवर सहज मिळतात. त्यातील नियम ८ भल्याभल्यांना कोड्यात टाकतो.
नियम ८:
८.१ उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई‑कार किंवा ऊ‑कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी ऱ्हस्व लिहावा.
उदाहरणार्थ : गरीब – गरिबाला, गरिबांना चूल – चुलीला, चुलींना.
अपवाद – दीर्घोपान्त्य तत्सम शब्द.
उदाहरणार्थ : परीक्षा – परीक्षेला, परीक्षांना दूत – दूताला, दूतांना.
म्हणजे बघा, "जमीन" दीर्घ पण "जमिनीचा" ऱ्हस्व. "पोलीस" दीर्घ पण "पोलिसाचा" ऱ्हस्व. थोडे कन्फ्युजिंग पण समजण्याजोगे. ओके. पण पुढचा भाग अधिक इंटरेस्टिंग आहे. मराठी आणि संस्कृत शब्दांबाबत स्पष्टता असली तरी इंग्लिश शब्द कसे लिहायचे ते हा नियम सांगत नाही.
टाईम्सच्या / टाइम्सच्या
डिझाईनचे / डिझाइनचे
हे शब्द तत्सम नाहीत त्यामुळे ऱ्हस्व लिहावे की ते मराठी नाहीत म्हणून दीर्घ? मुळात "तत्सम" याचा अर्थ आहे "त्या सारखा". मग तो संस्कृतसारखा असेल किंवा मग इंग्रजीसारखा. महाराष्ट्र टाइम्स हे वृत्तपत्र आपले नाव ऱ्हस्व ठेवते. ते कदाचित नियम ७.२ च्या आधाराने असेल.
७.२ मराठी शब्दांतील अनुस्वार, विसर्ग किंवा जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार व उकार सामान्यतः ऱ्हस्व लिहावेत.
उदाहरणार्थ : चिंच, डाळिंब, भिंग खुंटी, पुंजका, भुंगा छिः थुः किल्ला, भिस्त, विस्तव कुस्ती, पुष्कळ, मुक्काम.
परंतु तत्सम शब्दांत ते मुळाप्रमाणे र्हस्व किंवा दीर्घ लिहावेत.
उदाहरणार्थ : अरविंद, चिंतन कुटुंब, चुंबक निःपक्षपात, निःशस्त्र चतुःसूत्री, दुःख कनिष्ठ, मित्र गुप्त, पुण्य ईश्वर, नावीन्य पूज्य, शून्य.
जोडाक्षरापूर्वीचा इकार ऱ्हस्व लिहावा हा नियम फक्त मराठी शब्दांनाच लागू होतो. त्यातही "सामान्यतः" अशी मेख आहे! स्पेलचेकच्या डेटाबेससाठी मूळ शब्द दीर्घ तर त्याचे सामान्यरूप ऱ्हस्व असे (सध्या तरी) ठेवत आहे.
टाईम्स / टाइम्सच्या
डिझाईन / डिझाइनचे
जाणकारांनी काही सूचना केली तर त्याचा विचार होईल. अर्थात डिझाईनचे आणि डिझाइनचे असे दोन्ही शब्द ठेवा अशी अपेक्षा पुरी होणार नाही. कारण झेन ऑफ पायथॉनच्या मते सगळ्यासाठी शक्यतो एकच मार्ग असावा!
There should be one - and preferably only one - obvious way to do it.
https://en.wikipedia.org/wiki/Zen_of_Python
Update (१२ एप्रिल २०२२):
इंग्रजी आणि उर्दूतून मराठीत आलेले शब्द मराठीच्या नियमांप्रमाणे चालवले जातात. उदा. लाईन / लायनीवर (नियम ८.३ प्रमाणे). त्या नियमाने डिझाईन किंवा डिझाइन असे कसेही लिहिले तरी त्याचे सामान्यरूप मात्र डिझाइनचे असेच (नियम ८.१ प्रमाणे) होईल. टाइम्स (आणि कारकिर्द) हा शब्द देखील मराठीच्या नियमानुसार चालणार असेल तर तो ऱ्हस्वच बरोबर ठरतो.