२२ मे, २०१९

चतुरंग पुरवणीतील महत्त्वाचे लेख

राजन गवस यांचा आवर्जून वाचावा असा लोकसत्तेतील चतुरंग पुरवणीतील लेख (सुत्तडगुत्तड : मुक्त लेक)
https://www.loksatta.com/chaturang-news/suttadguttad-article-about-author-rajan-gavas-8-1891591/

यातील काही भाग फार महत्त्वाचा…
सावित्रीच्या लेकी महाराष्ट्रभर कर्तृत्व गाजवत आहेत. याबाबत भरभरून बोललं, वाचलं, लिहिलं जातं. पण हे सर्व होत असताना त्यांच्या आरोग्याबाबत, मानसिकतेबाबत कोणीच काही ध्यानात घ्यायला तयार नाही. हा खरा चिंतेचा प्रश्न आहे. पालक, शाळा, समाज सारेच मुलींच्या आरोग्याबाबत काही विचार करत आहेत याचे कुठं काही तपशील येतात असे चित्र नाही. तिनं गल्लीत खेळायचं नाही. घरात खेळायचं नाही. शाळेत तर खेळायला जागाच नाही. अशा वातावरणात पोरीच्या आरोग्याचं होणार तरी काय?
ते खेळ, ती गाणी, ते वाढणं, रांधणं टाकून द्यावं वाटत असेल, तर टाकून द्या. झिम्माफुगडी कालबाह्य वाटत असेल तर खेळू नये. पण त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था आपण काही निर्माण केली का? नवं संगोपनशास्त्र विकसित केलं का? याचं उत्तर नकारार्थीच येतं. त्यांच्या संगोपनाबाबत घरातील पालकांनी आणि शाळेतल्या शिक्षकांनी स्वतःचे परंपरागत दृष्टिकोन बदलायला पाहिजेत. जेव्हा तुम्ही जुने खेळ सहज टाकून देता तेव्हा जुने दृष्टिकोन नको का टाकून द्यायला. मुलगी म्हणजे परक्या घरचं धन. बाईच्या जातीनं असं करून कसं चालेल. बाई म्हणजे काचेचं भांडं. आमच्या घरची अशी रीत, तशी रीत. हे सगळं बाजूस सारल्याशिवाय मुलीचं संगोपन कसं होईल नीट.
_____

नीरजा यांचा विचार करायला लावणारा  लोकसत्तेतील चतुरंग पुरवणीतील लेख (तळ ढवळताना : डिस्कनेक्ट होण्याच्या काळात..)
https://www.loksatta.com/chaturang-news/tal-dawaltana-article-by-neerja-9-1891601/
यातील काही भाग फार महत्त्वाचा…

 ‘व्हॉट्स अ‍ॅप’मुळे सकाळच्या ‘गुड मॉर्निग’नं दिवसाची सुरुवात व्हायला लागली आणि रात्री ‘शुभरात्री’ म्हणत झोपायला लागलो. फार पूर्वी कधी तरी इंजिन सोडून यार्डात गेलेले डबे पुन्हा एकदा जोडले गेले आणि आमची ट्रेन एका छानशा सफरीला निघाली. पण ही सफर वाटली होती तेवढी प्रसन्न नाही राहिली.  वादाच्या ठिणग्या पडायला लागल्या. काहींनी ग्रुप सोडला, काही ग्रुपवर राहूनही कायमचे मुके झाले तर काही नित्यनेमाने एक आन्हिक म्हणून प्रत्येक वाराबरोबर बदलणाऱ्या देवदेवतांच्या प्रतिमा, कधी साईबाबा तर कधी स्वामी समर्थ मग त्याच्या जोडीला स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, भगतसिंग, क्वचित कधी तरी जोतीबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, नाही तर थेट नाना पाटेकर, विश्वास नांगरे पाटील वगैरेच्या नावावर खपवल्या गेलेल्या संस्कारांचं भरघोस पीक, सुविचारांची उधळण, कधी ‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’ म्हणत जुन्या दिवसांच्या काढलेल्या आठवणी, वेगवेगळ्या दिवसांच्या, सणावाराच्या शुभेच्छा, बायकोच्या (कथित) हुकूमशाहीवरचे विनोद, आणि जोडीला ‘मेरा भारत महान’च्या घोषणा!
आज इतिहास जाणून घेण्यासाठी खोल आणि विस्तृत पट उलगडून दाखविणारी पुस्तकं वाचण्याची गरज असते हे वेळ नसलेली आणि वाचनाची सवयच नसलेली माणसं विसरून गेलेली आहेत. आता केवळ सीमेवरच सैनिक लढताहेत असं नाही. तर प्रत्येक घराची रणभूमी झाली आहे. अलीकडे तर अनेक ‘फेसबुक’ व ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुपवर युद्धसदृश स्थिती आहे. फुलापानांनी आणि सुंदर सुविचारांनी भरलेला ‘व्हॉट्स अ‍ॅप’चा अवकाश हळूहळू हिंसक रंगांनी भरायला लागला. समाजमाध्यमांमुळे सोपं झालं आहे कनेक्ट होणं एकमेकांशी. पण मनानं डिस्कनेक्ट होत चाललो आहोत कायमचे, त्याचं काय करायचं राव!