input method लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
input method लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१४ जानेवारी, २०२६

ब्राह्मी लिपी आणि शून्याचा शोध

 कित्येक युरोपियन विद्वानांनी असा ग्रह करून घेतला आहे की हिंदू सुरवातीला लिहिणे जाणतच नसत,  त्यांनी हेही ठरविले की हिंदूंची प्राचीन लिपि (ब्राह्मी) ही हिंदूंनी तयार केली नसून त्यांनी ती इतरांकडून घेतली.  तीदेखील साधारण दोन हजार वर्षांपूर्वी. त्या आधी सर्व साहित्य मौखिक परंपरेने जतन होत असे. असे मानण्याचे कारण की कार्बन डेटिंग पद्धतीने शास्त्रमान्य पुरावा फक्त दोन हजार वर्षांपर्यंतचा मिळत आहे. त्या आधीचे काहीच शीलालेख वगैरे मिळत नाहीत. आता याला काय उत्तर देणार? मला माझ्या ४ ते ५ पिढ्यांपर्यंतच्या आजोबा - पणजोबांची नावे माहीत आहेत. त्या आधीच्या पूर्वजांची नावे मला माहीत नाहीत म्हणजे त्या आधी मला कोणी पूर्वजच नव्हते असा त्याचा अर्थ होतो का? 

माझा युक्तिवाद बालिश समजून सोडून देऊ.  कदाचित भारताचा अभिमान असल्यामुळे मी असे बोलत असेन. पण रायबहादुर पंडित गौरीशंकर हीराचंद ओझा यांनी लिहिलेल्या "प्राचीन भारतीय लिपिमाला" या पुस्तकाच्या प्रस्तावनेची सुरुवातच पहा त्यांनी कशी केली आहे...

 

प्राचीन काळी संस्कृति, सभ्यता व विद्येच्या क्षेत्रांत आर्यांनी अत्युच्च स्थान प्राप्त केले होते. आर्य संस्कृतीचे मूळ स्थानही आशिया खंड असून येथून सर्व जगात धर्म, विद्या, सभ्यता, संस्कृति वगैरेंचा प्रकाश पसरलेला आहे. आशिया खंडातील भारतीय, इराणी व असीरियन लोक आणि आफ्रिका खंडातील इजिप्शियन लोक हे खूपच उन्नतावस्थेला पोचले होते, पण काळाच्या प्रवाहात कोणाचीही स्थिति नेहमीच सारखी राहू शकत नाही. अनेक राज्यक्रांत्या होत होत अखेर इराण, असीरिया आणि इजिप्त हे देश आपल्या प्राचीन वाङ्मयापासून वेगळे पडले आणि त्यांचे वंशज आपल्या संस्कृतीला दुरावले. पण भारतातील आर्यांनी मात्र अनेक संकटे सोसूनही आपल्या प्राचीन सभ्यतेला आणि संस्कृतीला भूषणावह असे आपले बरेचसे प्राचीन वाङ्मय सांभाळून ठेवले. त्यामुळे जगाचे लोक आज विद्येच्या बाबतीत भारताचे कमी-अधिक प्रमाणात ऋणी आहेत.

त्यानंतर त्यांनी असे म्हटले आहे...

मानवाने आपल्या बुद्धीचा उपयोग करून सर्वात मोठी अशी जी दोन कामे करून ठेवली आहेत, ती म्हणजे भारताची ब्राह्मी लिपि व अर्वाचीन नागरी अंक व त्यांचा विकास. जगातील अत्यंत पुढारलेल्या लोकांच्या लिप्या या विसाव्या शतकातही अजून तशाच मागासलेल्या आहेत. ध्वनि व त्यांची सूचक-चिन्हे (अक्षरे) यांत मेळच नाही, त्यामुळे एकाच चिन्हाने अनेक ध्वनि प्रकट होतात, तर एकाच ध्वनीसाठी अनेक चिन्हे वापरली जातात. अक्षरांचा क्रमही शास्त्रीय असा मुळीच नाही. काही ठिकाणी तर अजूनही वर्णात्मक अक्षराऐवजी चित्रात्मक अक्षरेच वापरली जातात. मानवजातीला मिळालेल्या ज्ञानाच्या प्रारंभिक अवस्थेतून अजून त्या लिप्या मुळीच बाहेर आलेल्या नाहीत. पण भारताची लिपि ही हजारो वर्षांपूर्वीही इतक्या उच्च पदाला पोचली होती की जगातील एकही लिपि अजून तिच्या बरोबरीने श्रेष्ठतेत पुढे येऊ शकली नाही. फोनोग्राफचे ध्वनि व त्यांच्या तबकडीवरील चिन्हांचे जसे संबंध आहेत, नेमके तसेच संबंध या लिपीतील ध्वनि व लिखित अक्षरे यांच्यात आहेत. प्रत्येक आर्य ध्वनीसाठी वेगवेगळी चिन्हे असल्यामुळे आपण जसे बोलतो, तसेच नेमके यात लिहिले जाते व जसे लिहितो, तसेच बोलले जाते. संपूर्ण वर्णक्रम शास्त्रीय पद्धतीने ठरवून टाकला गेला आहे. इतके सौकर्य इतर कोणत्याही लिपीत नाही.


 जगाची अंक-विद्या प्राचीन काळात प्रारंभिक अवस्थेतच होती. कधी वेगवेगळ्या अंकांसाठी अक्षरेच लिहिली जात होती, तर कधी एकम्‌ची १ ते ९ पर्यंतची ९ चिन्हे, दहम्ची १० ते ९० पर्यंतची दुसरी ९ चिन्हे आणि शतम् व सहस्राचीही अशीच वेगवेगळी चिन्हे होती. आणि या २० चिन्हांनी फक्त एक लक्षापेक्षा कमीच संख्या मोजली जाऊ शकत असे. त्यामुळे अभिप्रेत असलेली संख्या फक्त त्या त्या  चिन्हांनी कळत असे. भारतातही अंकांचा हाच प्राचीन क्रम चालू होता, पण अशा क्लिष्ट अंकक्रमाने गणित विद्येत प्रगति करून घेणे अशक्य होते. म्हणून येथील लोकांनी अर्वाचीन अंकक्रम शोधून काढला. १ ते ९ पर्यंतचे ९ अंक आणि रिक्त स्थळ-सूचक 'शून्य' अशा १० चिन्हांनी आज संपूर्ण अंक-विद्येचे काम भागते. हा अंक क्रमही जगाने भारतापासूनच घेतला. अर्वाचीन काळात गणित विद्येची किंवा तिच्याशी संबंधित इतर शास्त्रांची जी प्रगति होऊ शकली, तीही या अंकक्रमामुळेच.

भारताच्या आर्यांची बुद्धि व विद्या किती प्रगत अवस्थेप्रत पोचली होती, याचे अनुमान वरील दोनच गोष्टींवरून केले जाऊ शकते. याच दोन विषयांसंबंधाने व त्यांच्या वेळोवेळच्या रूपांतरासंबंधाने माहिती व त्याचे विवेचन या पुस्तकात दिले आहे.

यानंतर ब्राह्मी लिपीची उत्पत्ती या लेखात ते म्हणतात...

पुढे चीनमध्येही संस्कृत-प्राकृतचे अध्ययन होऊ लागले. वेळोवेळी तेथील अनेक विद्वानांनी चिनी भाषेत बौद्ध धर्मासंबंधी अनेक ग्रंथांची निर्मिती स्वतः केली. त्यांत भारतासंबंधीही अनेक प्राचीन गोष्टी लिहिलेल्या आहेत. इ. स. ६६८ मध्ये बौद्ध विश्वकोष (फा युअन चु लिन्) तयार झाला. त्यात 'ललितविस्तर' यात म्हटल्याप्रमाणे ६४ लिप्यांची नावे दिली आहेत व पहिले नांव 'ब्राह्मी'चे आणि दुसरे खरोष्ठीचे (किअ-लु-से-टो क-लु-से-टो खरो-स-ट = खरोष्ठ) आहे. खरोष्ठी लिपीचा तपशील देताना असे म्हटले आहे की चिनी भाषेत या शब्दाचा अर्थ 'गाढवाचे ओष्ठ' असा होतो." त्या पुस्तकात निरनिराळ्या लिप्यांचे जे वर्णन दिले आहे, त्यांत म्हटले आहे की 'लेखनकलेचा शोध तीन दैवी शक्तीने संपन्न अशा आचार्यांनी केला असून त्या सर्वात प्रसिद्ध असे आचार्य 'ब्रह्मा' आहेत व त्यांची लिपि (ब्राह्मी) ही डावीकडून उजवीकडे वाचली जाते. दुसरे आचार्य किअ-लु (किअ-लु-से-टो = खरोष्ठचे संक्षिप्त रूप) आहेत व त्यांची लिपि उजवीकडून डावीकडे वाचली जाते. सर्वात कमी महत्त्वाचे आचार्य 'त्सं-की' आहेत. यांची (चिनी) लिपि ही वरून खाली, अशी वाचली जाते. ब्रह्मा व खरोष्ठ हे भारतात झाले आणि त्सं की चीनमध्ये. ब्रह्मा व खरोष्ठ यांना आपापल्या लिप्या देवलोकातून मिळाल्या आणि त्सं-की यांनी आपली लिपि पक्षी इत्यादींच्या पावलांच्या चिन्हावरून बनविली.    (रिपोर्ट ऑन एन्शंट एन्स्क्रीप्शन्स ऑफ सीलोन -  मॅक्समूलर Page 24) https://dn790003.ca.archive.org/0/items/ancientinscripti01mluoft/ancientinscripti01mluoft.pdf

जी लिपि डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, तिचे प्राचीन नांव 'ब्राह्मी' असून जी लिपि उजवीकडून डावीकडे लिहिली जाते, तिचे नांव खरोष्ठी होते, हे या चिनी पुस्तकाच्या लेखावरून स्पष्ट होते. ब्राह्मी लिपि या देशाची स्वतंत्र व सार्वदेशिक अशी लिपि असल्यामुळेच जैन व बौद्ध ग्रंथही त्यातच लिहिले जाऊ लागले व म्हणूनच त्यांनी लिप्यांच्या नामावलीत तिचे नाव सर्वप्रथम दिले.

ब्राह्मी लिपी आणि शून्याचा शोध लावल्यावर पुढे करण्यासारखे काहीच न उरल्यामुळे भारतातील नंतरच्या पिढ्या झोपी गेल्या का? असा प्रश्न मला विचारला तर मात्र माझ्याकडे काही उत्तर नाही!


१७ जुलै, २०२४

डिक्शनरीतील इंग्रजी शब्द

डिक्शनरीतील इंग्रजी शब्दांच्या लिखाणातील अनुस्वार (काही ठिकाणी) परसवर्ण पद्धतीने लिहिला आहे. उदा.


बाँड बॉण्ड
क्रॉंक्रीट कॉन्क्रीट
काँस्टेबल कॉन्स्टेबल
काँट्रिब्युशन कॉन्ट्रिब्युशन
फाँट फॉण्ट
लाँच लॉन्च

स्टँप स्टॅम्प
कँप कॅम्प
कँसर कॅन्सर
हँडसेट हॅण्डसेट

कंस्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन
प्रिंसिपल प्रिन्सिपल
रेसिडेंट रेसिडेन्ट

०९ नोव्हेंबर, २०२३

गूगल प्ले स्टोअर अ‍ॅप

कोणत्याही इमेजमधील मराठी मजकूर google lens या अ‍ॅपद्वारे वर्ड किंवा इतरत्र कॉपी-पेस्ट करता येतो. कसा ते या व्हिडिओमध्ये फार छान सांगितले आहे.

https://youtube.com/shorts/1xNNUJfNtmM?si=k_ZoplgUqEd5zY5N
 
गुगल लेन्समधून कॉपी केलेला संपूर्ण मराठी मजकूर  marathi spell check या अ‍ॅपमध्ये पेस्ट करून स्पेल चेक घेता येतो. त्यामध्ये मूळ लेखातील शुद्धलेखनाच्या चुका आणि गुगल लेन्सने तो मजकूर वाचताना केलेल्या चुका अशा दोन्ही प्रकारच्या चुका दाखविल्या जातात. त्यांचा विचार करून वर्डमधील फाईल अधिक निर्दोष बनविता येईल. मजकूर जर खूपच मोठा (७-८ पानांहून अधिक) असेल तर दोन मिनिटांपेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो.

प्ले स्टोअरवर marathi spell check असा शोध घेतला तर हे अ‍ॅप सहज मिळू शकते.  पण कोणाला लिंक हवीच असेल तर

https://play.google.com/store/apps/details?id=com.myapp.marathispellcheckandsanskritsandhi

ही सुविधा आवडली तर अ‍ॅप स्टोअरवर स्टार देऊन लाईक करा, शेअर करा आणि शक्य असल्यास स्पॉन्सर करा !

_____

"google lens" आणि "marathi spell check" ही दोन्ही ॲप ज्यांनी अवश्य वापरावी अशी उदाहरणे...

१) डी. टी. पी. ची कामे करणार्‍यांना स्पेल चेकचे तंत्र आणि मंत्र शिकत बसायला वेळ नसतो ही गोष्ट खरी आहे.  पण स्क्रिनवरील मजकुराचा एक फोटू काढून या ॲपद्वारे स्पेल चेक करायला तरी जमेल की नाही? वृत्तपत्रात येणारी आपली जाहिरात लाखो लोकं वाचत असतात याचे भान ठेवावे. कोणाचीच तक्रार नाही मग कशाला ही मगजमारी अशी भूमिका घेऊ नये. कारण तक्रार नाही म्हणजे सगळे आलबेल आहे असे नव्हे.  नागरिक हा शब्द कधी कधी "नागरीक" असा लिहिला तर काय मोठासा फरक पडतो? मोठासा नाही पण छोटासा तर फरक नक्कीच पडतो. भातात एखाद-दुसराच खडा निघाला तरी जेवणाचा बेरंग होऊ शकतो. जाहिरातीच्या किंवा बॅनरच्या डिझाईनच्या बाबतीत जितका काटेकोरपणा दाखविता त्याच्या १ टक्का तरी भाषेच्या बाबतीत दाखवायला काय हरकत आहे?

२) हे ॲप वापरून विद्यार्थी आपले निबंध स्वतःच तपासू शकतील. मात्र त्यासाठी  त्यांना आपले अक्षर सुधारावे लागेल. मी "दिवाळी" असे लिहिले तर गूगलने "विवाळी" असे वाचले. त्याचा अर्थ मला "द" या अक्षरावर मेहनत घ्यावी लागेल असे दिसते.  गूगलचे आर्टिफिशिअल इंटलिजन्स आणि मशीन लर्निंगचे मॉडेल जिथे माझे अक्षर नीट वाचू शकत नाही तिथे ते नुसत्या संदर्भाने वाचणार्‍या शिक्षकांबद्दल थोडा आदर मी दाखवायला हवा.  सुवाच्य अक्षर आणि जमेल तितके निर्दोष लेखन वाटते तितके कठीण नाही. 

३) वरिष्ठ अधिकार्‍यांनी मराठी कागदावर सही करण्यापूर्वी एकदा ते पान गूगलच्या नजरेखालून घालावे. त्यानंतर स्पेल चेक करून चटकन नजरेत भरणारी / अर्थाचा अनर्थ करणारी एखादी चूक झाली आहे का ते पाहावे.  यात कदाचित दोन चार मिनिटे जातील पण भाषेसाठी आपण इतकेही करू शकत नाही का?

४) "प्रतिलिपी" सारख्या ॲपमध्ये लेखन करणार्‍या लेखकांनी तर स्पेल चेक वापरणे  अत्यावश्यक आहे.  वाचक जर पैसे देऊन आपले लेखन वाचणार असतील तर ते अधिकाधिक निर्दोष व्हावे यासाठी प्रयत्न करणे हे लेखकाचे कर्तव्य आहे.  केवळ उत्तम कथेच्या जोरावर प्रतिलिपीचे वाचक पैसे देतील असे मला वाटत नाही.

१४ डिसेंबर, २०२२

ऍटोकरेक्ट वापरून कठीण शब्द / जोडाक्षरे

नेहमी लागणारे कठीण शब्द (इंग्रजी भाषेच्या) ऍटोकरेक्ट लिस्टमध्ये टाकून ठेवता येतात. उदा.

:klp: क्लृप्ती

:krd: कुऱ्हाड

आता मला जेव्हा "क्लृप्ती" हा शब्द लिहायचा असेल तेव्हा फक्त  :klp: असे लिहून स्पेस दिली की काम झाले!

०३ डिसेंबर, २०२२

वापरात नसलेले शब्द

जे शब्द स्पेलचेकच्या डेटाबेसमध्ये नाही घेतले तरी चालतील अशा सुमारे पाच हजार शब्दांची यादी तयार केली आहे.

https://github.com/shantanuo/Spell-Checker/blob/master/exclude_words.txt

शब्दकोशात असले तरी हे शब्द वापरात नाहीत म्हणून स्पेलचेकमधूनही काढले आहेत. वापरात आहेत की नाही हे ठरविण्याचा एकमेव निकष म्हणजे गूगलमध्ये तो शब्द किती वेळा आला आहे ते पाहिले. ० ते १०० अशा स्केलमध्ये शून्य ते तीस / चाळीस पर्यंतची मजल गाठू न शकलेले हे शब्द काढले तर डेटाबेसचा आकार लहान ठेवता येईल असे मला वाटते.

२८ ऑक्टोबर, २०२२

एनॉटॉमी आणि लोअर लिंब

 लोकसत्ताच्या संपादकीयात नुकताच भाषेचा विषय येऊन गेला आहे.

https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-about-mbbs-course-in-hindi-zws-70-3201595/

त्यांनी विचारलेला प्रश्न बरोबर आहे. एनॉटॉमी, लोअर लिंब, मेडिकल फिजिओलॉजी हे शब्द का? यातून फक्त इंग्रजी परिभाषेचे देवनागरी लिपीतील सादरीकरण दिसते. हेही मान्य. पण  माझा प्रश्न फक्त असा आहे की हे शब्द मराठीत ॲनॉटॉमी, लिम्ब, फिजियोलॉजी असे लिहावेत का? की हिंदीत जसे लिहिले आहेत तसेच लिहावे? खाली दिलेल्या साईटवर खूप कोश दिसत आहेत पण ते anatomy हा शब्द एनॉटॉमी लिहावा की ॲनॉटॉमी याचा निर्णय देत नाहीत तर त्याला पर्यायी मराठी शब्द "शारीर" सुचवीत आहेत.

http://marathibhasha.org/

रोमन इंग्रजी ते देवनागरी इंग्रजी असा कोणता कोश ऑनलाईन/ युनिकोड स्वरुपात उपलब्ध आहे का? स्पेलचेकसाठी असे काही शब्द हवे आहेत म्हणून विचारत आहे.

१३ सप्टेंबर, २०२२

अफिक्स फाईलमधील बदल

 "घराना घरानो घरानी"  या तीन शब्दांना अनुक्रमे "घरांना घरांनो घरांनी" अशी सुचवणी येणे अपेक्षित आहे. पण  अगदी वेगळेच शब्द राईट क्लिकवर दिसतात.  त्यासाठी  रिप्लेसमेंट टॅगमध्ये ही नोंद केली.

REP ाना ांना
REP ानो ांनो
REP ानी ांनी

खाली दिलेले रफार चुकीचे असून ते विसर्गाने दाखवायला हवे. म्हणून ते देखील अफिक्स फाईलच्या रिप्लेसमेंट टॅगमध्ये टाकले.

REP र्क ःक
REP र्ख ःख
REP र्च ःच
REP र्छ ःछ
REP र्ट ःट
REP र्ठ ःठ
REP र्त ःत
REP र्थ ःथ
REP र्प ःप
REP र्फ ःफ
REP र्श ःश
REP र्ष ःष
REP र्स ःस

SQL Query:

select regexp_extract(word, 'ः.')   as mychar , count(*) as cnt 
from oscar2_sorted 
where word like '%ः%' 
group by regexp_extract(word, 'ः.')  

०३ सप्टेंबर, २०२२

इंग्रजी शब्द मराठीत (भाग ५)

युनिकोडच्या दृष्टीने योग्य शब्द कसा काढायचा ते खाली दिले आहे.

कॅप
['क', 'ॅ', 'प']

कँप
बरोबर - ['क', 'ँ', 'प']
चूक - ['क', 'ॅ', 'ं', 'प']\

कॉस्ट
['क', 'ॉ', 'स', '्', 'ट']\

काँग्रेस
बरोबर - ['क', 'ा', 'ँ', 'ग', '्', 'र', 'े', 'स']
चूक - ['क', 'ॉ', 'ं', 'ग', '्', 'र', 'े', 'स']

व्याकरणाच्या दृष्टीने पाहिले तर अनुस्वार वेगळा देणेच बरोबर ठरते. म्हणजे आपण 'भोंगा' शब्दात ओवर अनुस्वार देतो तर 'भिंत' शब्दात इवर अनुस्वार देतो तसा ॅ आणि ॉ वर अनुस्वार द्यायला हवा. पण या बाबतीत युनिकोडने व्याकरणाशी फारकत घेतली आहे. चंद्रकोर आणि अनुस्वार मिळून एकच एक असे चंद्रबिंदू नावाचे ँ चिन्ह देऊन युनिकोडने एक बाईट वाचवला आहे असे दिसते.

कँप शब्द कॅंप असा लिहिला तर एक बाईट जास्त खर्च होईलच पण त्याबरोबरच बहुतेक सर्व फाँटमध्ये अनुस्वार चुकीच्या जागी दिसेल. ते अक्षर तुटल्यासारखेच प्रिंटदेखील होईल आणि वाचायला त्रास होईल. म्हणून काँग्रेस शब्द कॉंग्रेस असा लिहू नये.

२७ ऑगस्ट, २०२२

इंग्रजी शब्द मराठीत (भाग ४)

नॉव्हेल या शब्दाचे अनेकवचनी रूप "नॉव्हेल्सचा" असे होऊ शकते खाली दिलेल्या नियमानुसार.

SFX S Y 3
SFX S 0 ्स/ac .
SFX S ग ग्ज ग
SFX S 0 ेस/ac [सशज]

त्यासाठी नॉव्हेल/S अशी नोंद डिक्शनरीमध्ये करावी लागते. "बस" किंवा "वेज" या शब्दांची अनेकवचने रूपे बस्सचा किंवा वेज्सचा अशी न होता बसेसचा आणि वेजेसचा अशी होतात. तर बॅग या शब्दाचे अनेकवचन बॅग्स या बरोबरच बॅग्ज असेही होते. त्या सर्वांची सोय वरील नियमात केली आहे. डिक्शनरीतील नोंदी अशा दिसायला हव्यात.

नॉव्हेल/S
बस/S
वेज/S
बॅग/S

२५ ऑगस्ट, २०२२

विशेष नामांची व्यवस्था

आनंद/k अशी नोंद डिक्शनरीत आहे. त्यावरून आनंदाची, आनंदाने असे शब्द बनतील. पण हा शब्द भाववाचक नामाबरोबरच विशेष नाम म्हणूनदेखील वापरला जातो.  उदाहरणार्थ आनंद हे एखाद्या व्यक्तीचे नाव देखील असू शकते. अशा वेळी आपण "आनंदची बायको" असे म्हणतो.  सध्या "आनंदची" हा शब्द स्पेलचेकर चुकीचा म्हणून दाखवत आहे. जर आनंद/Aac अशी नोंद केली तर तो शब्ददेखील डिक्शनरीत जमा होईल. दोन्ही शब्द मिळून  आनंद/Aack अशी नोंद करता येईल. पण तसे करण्याचे मी टाळले आहे. कोणती विशेष नामे डिक्शनरीत घ्यायची ते नक्की करावे लागेल. आनंद हा शब्द विशेष नाम म्हणून फार कमी प्रमाणात वापरला जातो. गांधी, मोदी, अडानी, अंबानी हे शब्द आता विशेषनामे म्हणून नव्हे तर सत्ता/ संपत्ती यांना प्रतिशब्द म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जातात. म्हणून ते शब्द घेता येतील. इतर शब्दांच्या बाबत काटेकोरपणे विचार करावा लागेल.

०९ ऑगस्ट, २०२२

इंग्रजी शब्द मराठीत (भाग ३)

इंग्रजी ऍ चा मराठीत आ (क्वचित ए इ) असा बदल होतो. तसेच जोडाक्षरातील "ह"चा उच्चार होत नाही. उदा.

लॅबॉरेटरी / लॅब्रोटरी

मॅट्रीक / म्याट्रिक

ड्रॉवर / ड्रावर 

डिव्होर्स / डिवोर्स 

नेचरोपॅथी / नॅचरोपथी

न्युट्रॅलिटी / नुट्रलिटी

पॉवर / पावर

सँटाक्लॉज / सांताक्लॉज

ट्रॅफिक / ट्राफिक

सायकॅट्रिस्ट / सायकियाट्रिस्ट

डिमॉलिशन / डिमोलेशन

कोव्हॅक्सीन / कोवॅक्सीन 

कॉलेस्ट्रॉल / कोलेस्ट्रोल

कॅथॉलिक / कॅथलिक 

डिव्हिडंट / डिविडेंट

डिझ्नी / डिझनी

डिलिव्हरी / डिलिवरी

०८ ऑगस्ट, २०२२

इंग्रजी शब्द मराठीत (भाग २)

tragedy हा शब्द तीन प्रकारे लिहिता येतो.  १) ट्रॅजडी २) ट्रॅजिडी ३) ट्रॅजेडी 

त्यातील पहिला पर्याय ऑक्सफर्डसंमत असल्यामुळे विकीपीडियावर तो वापरता येईल कारण तो ज्ञानकोश असून पूर्णपणे नियमाने चालणे अपेक्षितच आहे.

पण स्पेल चेकसाठी तो पर्याय उपयोगी नाही. इथे "शास्त्रात रुढी बलियसी" हा न्याय वापरावा लागतो. त्यामुळे दुसरा पर्याय ट्रॅजिडी योग्य वाटतो. कारण गूगलमध्ये तो शब्द तिसऱ्या शब्दापेक्षा दसपट जास्त वेळा वापरला गेला आहे. पण गूगलमध्ये हिंदी पानांवरदेखील हा शब्द दिसतो. त्यामुळे कदाचित हिंदी स्पेलचेकसाठी दुसरा पर्याय योग्य होईल. मराठी स्पेलचेकसाठी मात्र तिसरा पर्याय घेतला पाहिजे कारण 'चा’, 'ची', 'चे' सारखे विभक्ती प्रत्यय आणि 'मध्ये’, 'पेक्षा’, 'वर’, 'वरून’, 'कडे' यासारखी अव्यये तिसऱ्या शब्दात वापरलेली दिसतात, दुसऱ्या शब्दात त्यांचा वापर फार कमी झालेला दिसून येईल. उदा. "ट्रॅजिडीकडे" या शब्दासाठी गूगलमध्ये एकही पान दिसत नाही तर "ट्रॅजेडीकडे" या शब्दासाठी चार-पाच पाने दिसतात.

तेव्हा "ट्रॅजेडी" मराठी स्पेलचेकमध्ये,  "ट्रॅजिडी" हिंदी स्पेलचेकमध्ये तर "ट्रॅजडी" मराठी / हिंदी विकीपीडियावर अशी मांडणी करावी लागेल असे वाटते.

_____

खाली दिलेल्या शब्दात अर्ध्या "न" चा उच्चार स्प्ष्ट होतो आणि तो काही पर-सवर्ण पद्धतीने काढलेला अनुस्वार नाही तेव्हा हे शब्द पहिल्या पर्यायाप्रमाणे लिहायचे आहेत.

ट्रेन्ड ट्रेंड
ट्रान्स्लेटर ट्रान्सलेटर ट्रांसलेटर
ट्रॅन्सप्लॅंट ट्रान्स्प्लान्ट ट्रान्स्प्लांट ट्रान्सप्लांट ट्रांसप्लांट
लॅन्सेट लँसेट
कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रक्टर कॉण्ट्रॅक्टर कॉण्ट्रक्टर कॉंट्रॅक्टर

इतर काही शब्दः

ट्रम्प ट्रंप
ट्रीटमेंट ट्रिटमेन्ट ट्रिटमेण्ट ट्रिटमेंट

_____

शास्त्राप्रमाणे "टेक्स्चर" तर रुढ शब्द आहे "टेक्श्चर". म्हणून हे दोन्ही शब्द स्पेल चेकच्या डेटाबेसमध्ये घेतले. असे शब्द अपवादात्मक असावेत.


०५ ऑगस्ट, २०२२

इंग्रजी शब्द मराठीत (भाग १)

 "टेक्नॉलॉजीचा" हा शब्द खाली दिलेल्या २० – २५ प्रकारे लिहिला जात आहे असे दिसते. त्यातील एकच पद्धत नक्की करून ती वापरणे सर्वांच्या फायद्याचे ठरेल.  

टॅक्नॉलॉजीचा
टेक्नलॉजीचा
टेक्ऩॉलॉजीचा
टेक्नालाजीचा
टेक्नालॉजिचा
टेक्नालॉजीचा
टेक्नॉंलॉजीचा
टेक्नॉलजीचा
टेक्नॉलाजीचा
टेक्नॉलीजीचा
टेक्नॉलॉगीचा
टेक्नॉलॉचीचा
टेक्नॉलॉजिचा
टेक्नॉलोजीचा
टेक्नोलॉजिचा
टेक्नोलोजीचा
टेक्‍नॉलॉजीचा
टेक्‍नोलॉजिचा
टेक्नोलाॅजीचा
टेक्‍नोलॉजीचा
टेक्नोलॉजीचा
टेक्नाॅलाॅजीचा
टेक्नॉलॉजीचा

यातील शेवटचे दोन शब्द दिसायला सारखे दिसले तरी युनिकोडच्या नियमानुसार ते वेगवेगळे आहेत. नोटपॅडमध्ये कॉपी-पेस्ट केल्यावर त्यातील वेगळेपण लगेच समजत आहे. स्पेलचेकमध्ये शेवटचा "टेक्नॉलॉजीचा" हा शब्द बरोबर दिसत असून इतर शब्द चुकीचे दाखवत आहे. ते बहुधा बरोबर असावे.  उच्चाराप्रमाणे लेखन, जोडाक्षरांचे वैकल्पिक लेखन, युनिकोडच्या नियमाप्रमाणे लेखन, परभाषेतील शब्दांना मराठीचे नियम लावून केलेले लेखन अशा सर्व कसोट्यांची परीक्षा घेणारा हा शब्द आहे!  ऑक्सफर्डमध्ये पाहिले तर हा शब्द खरा म्हणजे "टेक्नॉलजीचा" असा लिहावा लागेल. तसा तो कोणीच लिहीत नाही हे गूगलमध्येच शोधले तर स्पष्ट दिसत आहे. तेव्हा शास्त्रापेक्षा रूढी बलिष्ठ या न्यायाने "टेक्नॉलॉजी" हा शब्द डिक्शनरीत घेत आहे. कुणाचा आक्षेप असेल तर ते इथे लिहितीलच.  असाच दुसरा शब्द आहे टेक्स्चर texture.

१४ जुलै, २०२२

हंस्पेलची कंजुसी

 मी जर "कंजूषी" असा शब्द टाईप केला तर मला "कंजुसी" अशी सुचवणी मिळत नाही. कारण मूळ शब्दात दोन ठिकाणी बदल करावे लागत आहेत. हा हंस्पेलमधील दोष असून तो सुरवातीपासून तसाच आहे!

इंग्रजीतही testimont या शब्दाला  "testament" किंवा desimination या शब्दाला  "dissemination" असा शब्द सुचविला जात नाही. यासाठी साउंडेक्स पद्धतीचा अवलंब करावा असे हंस्पेलच्या कर्त्यांनी म्हटले आहे पण ते नेमके कसे करायचे ते सांगितलेले नाही.

https://bugzilla.mozilla.org/show_bug.cgi?id=519214

गुगलने क्रोमसाठी हंस्पेलमध्ये बरेच बदल केले आहेत. त्यामुळे त्यांचे सगळे ठीक चालले आहे असे दिसते!

१० जून, २०२२

भाषा बदलतेय नव्हे तर बदलली आहे!

भाषासूत्र या सदरात वैशाली पेंडसे-कार्लेकर यांनी "भाषा बदलतेय" या लेखात नियम १३ चा विस्तार करून त्यानं, इकडं, इथं, आतलं, मधलं अशा शिरोबिंदूयुक्त शदांचा प्रमाण भाषेत स्वीकार करावा असे सुचविले आहे. तसेच, बदलते आहे- बदलतेय, गेली आहे- गेलीय- गेलेय, बोलतो आहे- बोलतोय अशा प्रकारची संधिसाधू क्रियापदेदेखील नियमानुसार आपलीशी करावी असे म्हटले आहे.

loksatta.com/navneet/marathi-language-learning-changes-in-marathi-language-types-of-marathi-sentences-zws-70-2965010/

स्पेलचेकच्या डेटाबेसमध्ये हे शब्द अगदी सुरवातीपासून म्हणजे सुमारे १५ वर्षांपासून जमा आहेत. या शब्दांचा आम्ही कधीच स्वीकार केला आहे!

२६ एप्रिल, २०२२

नामाचे लिंग सर्वनामाला

खाली दिलेल्या वाक्यात "असलेली" बरोबर आहे का "असलेले" बरोबर आहे?

१) बेल्हे जुन्नर तालुक्यातील एक मोठी बाजार पेठ असलेली मोठ्ठ गाव आहे. 

२) बेल्हे जुन्नर तालुक्यातील एक मोठी बाजार पेठ असलेले मोठ्ठ गाव आहे. 

माझ्यामते क्रमांक २ बरोबर आहे. त्याचे कारण यस्मिन शेख यांच्या लेखात वाचता येईल.

https://www.loksatta.com/navneet/gender-in-marathi-nouns-marathi-language-learning-zws-70-2831275/

ही दोन वाक्ये वाचा :

(१) 'वृद्धांना कधी कधी वाटते, की वार्धक्य किंवा दीर्घायुष्य हे परमेश्वराची कृपा नसून अवकृपा आहे.'

(२) 'मवाल्यांनी त्या सुंदर मुलीला इतका त्रास दिला, की सौंदर्य हे वर नसून शाप आहे असे तिला वाटू लागले.'

या दोन्ही वाक्यांत एक चूक आहे, 'हे' हा शब्द. या दोन्ही वाक्यांत 'हे' हे सर्वनाम, नपुसकिलगी, एकवचनी आहे. वास्तविक पहिल्या वाक्यात हे सर्वनाम 'वार्धक्य' किंवा 'दीर्घायुष्य' या नपुसकिलगी नामाचे नसून 'कृपा','अवकृपा' या स्त्रीलिंगी एकवचनी नामांचे आहे. तसेच, दुसऱ्या वाक्यात 'हे' हे नपुसकिलगी सर्वनाम 'सौंदर्य' या नपुसकिलगी, एकवचनी नामाचे नसून ते 'शाप' 'वर' या (पुल्लिंगी) नामांचे आहे. हे शब्द – नामे, पुल्लिंगी, एकवचनी आहेत, त्यामुळे ही वाक्ये अशीच योग्य आहेत. 

(१) 'वृद्धांना कधी कधी वाटते, की वार्धक्य किंवा दीर्घायुष्य ही परमेश्वराची कृपा नसून अवकृपा आहे.' 

(२) मवाल्यांनी त्या सुंदर मुलीला इतका त्रास दिला, की सौंदर्य हा वर नसून शाप आहे असे तिला वाटू लागले.

या संदर्भात लोकमान्य टिळकांचे एक अत्यंत प्रसिद्ध वचन येथे उद्धृत करावेसे वाटते. – 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.' 'हा', 'तो' ही पुल्लिंगी सर्वनामे 'स्वराज्य' या नपुसकिलगी नामाची नसून, 'हक्क' या पुल्लिंगी नामासाठी आहेत.

अलीकडेच 'लोकसत्ता'त छापलेले हे वाक्य पाहा – 'मुंबई पोलीस प्रशासनाने काढलेला आदेश हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाठपुराव्याचे यश आहे' असे परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. 'हे' हे सर्वनाम (नपुसकिलगी एकवचनी) 'आदेश' या पुिल्लगी नामाचे नसून 'यश' या नपुसकिलगी नामाचे आहे, हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल.

०९ एप्रिल, २०२२

कारकिर्द की कारकीर्द?

अरूण फडके यांच्या मार्गदर्शनाखाली बनलेल्या "शुद्धलेखन ठेवा खिशात" या ॲपमध्ये हे स्पष्टीकरण मिळाले.

बरोबरः उर्फ, कारकिर्द, शागिर्द, सुपुर्द

चूकः ऊर्फ, कारकीर्द,शागीर्द, सुपूर्द

उर्फ, कारकिर्द, शागिर्द, सुपुत्र हे मराठीतले तद्भव शब्द आहेत. त्यामुळे ह्यांमधले इकार-उकार मराठीच्या ऱ्हस्व-दीर्घ नियमांनुसार लिहिले जातील. परंतु ह्या चारही शब्दांमध्ये रफारयुक्त अ-कारान्त जोडाक्षर आहे. त्यामुळे ह्या शब्दांना दोन नियम लागू होतात.

१) अ-कारान्तापूर्वीचा इकार उकार दीर्घ असतो.

२) जोडाक्षरापूर्वीचा इकार-उकार ऱ्हस्व असतो.

हे दोन नियम परस्परविरुद्ध इकार-उकार दाखवतात. त्यामुळे आता अ-कारान्त जोडाक्षर असलेले इतर मराठी शब्द ह्या दोन नियमांपैकी कोणत्या नियमाने चालतात हे पहावे लागेल. ते शब्द असे - कुट्ट, खिन्न, खुट्ट, गुच्छ, ठुस्स, डिम्म ढिम्म, डु ढुस्स, फुस्स, भिल्ल, भिस्त, मिट्ट, शिस्त, सुस्त, हुश्श हे सारे शब्द जोडाक्षरापूर्वीचा एकार इकार - उकार ऱ्हस्व असतो ह्या नियमाने चालताना दिसतात. त्यामुळे ह्याच नियमानुसार उर्फ, कारकिर्द, शागिर्द, सुपुर्द असेच लेखन बरोबर ठरते.


२८ जानेवारी, २०२२

युबंटूसाठी गमभन

खाली दिलेली कमांड युबंटूच्या कमांड प्रॉम्टवर कॉपी-पेस्ट करा. त्यानंतर आवश्यकता भासल्यास  reboot  कमांडने कंप्युटर पुन्हा सुरू करा. 

sudo add-apt-repository ppa:gamabhana-team/gamabhana

sudo apt-get update

sudo apt install gamabhana

आनुषंगिकच्या निमित्ताने

आनुषंगिक हा शब्द १६ प्रकारांनी लिहिता येतो. म्हणजे खाली दिलेले बाकीचे १५ प्रकार चुकीचे आहेत.

अनुशंगिक
अनुशंगीक
अनुषंगिक
अनुषंगीक
अनूशंगिक
अनूशंगीक
अनूषंगिक
अनूषंगीक
आनुशंगिक
आनुशंगीक
आनुषंगीक
आनूशंगिक
आनूशंगीक
आनूषंगिक
आनूषंगीक

हे शब्द तयार करण्यासाठी पायथॉनची ही स्क्रिप्ट वापरली.

mylist = [["अ", "आ"], ["नु", "नू"], ["शं", "षं"], ["गि", "गी"], ["क"]]
import itertools
for i in itertools.product(*mylist):
    print("".join(i))

तसेच ऐतिहासिक हा शब्द देखील अनेक प्रकारे लिहिता येतो.

_____

x = ['बि', 'बी']
y = ['भ', 'भि', 'भी']
z = ['त्स', 'स्त']

for x1 in x:
    for y1 in y:
        for z1 in z:
            print(x1+y1+z1)

_____

Use this code to generate more words with replacements.

replacements = {'ि':'ी', 'ी':'ि', 'ु':'ू', 'ू':'ु'}

with open('dicts/mr_IN_eng.dic') as f:
    for x in f:
        subs = [{_x,replacements.get(_x,_x)} for _x in x]
        for s in itertools.product(*subs):
            print ("".join(s))

१६ एप्रिल, २०२१

नेहमी चुकणारे काही शब्द

 जालावर लिहिताना बरेच लोक ऱ्ह्स्वान्त शब्द टाईप करताना दिसतात. उदा.

 

सुरु  करु तेलुगु  असु चालु 

संगति सदाहि इत्यादि नाहि


ऱ्ह्स्व उ आणि ऱ्ह्स्व इ शब्दाच्या शेवटी (पूर्णविराम किंवा स्पेसच्या आधी) आल्यास जावा स्क्रिप्ट वापरून एक प्रॉम्प्ट द्यावा व नंतरच मजकूर सबमिट करता येईल अशी व्यवस्था वेब ऍडमिनने केली तरी बऱ्याच चुका टळतील.


तसेच नेहमी चुकणारे असे काही शब्द ऍटोकरेक्टने सुधारता येतील.

ज्यास्त  गरदी स्वत विषाणुंचीच  जंतुंची  माहित अजुन नविन आणी महत्व म्हणुन देखिल माहीती