गोबेल्स नावाचा एक अधिकारी हिटलरचा प्रसिद्धी प्रमुख होता. त्याने अत्यंत प्रभावीपणे जे प्रचारतंत्र राबविले त्याला "गोबेल्स तंत्र" म्हटले जाते आणि १९३३ ते १९४३ या दहा वर्षात ते तंत्र अतिशय यशस्वी झाले होते. एखादी खोटी गोष्ट सतत सांगून ती विरोधकांसह सर्वांना मान्य करायला लावणे असे त्याचे स्वरूप होते. हल्लीचे गोबेल्स खोट्याबरोबरच खरे देखील असे बोलतात की त्यातून त्यांचा अजेंडा रेटून नेला जातो. त्यासाठी आणखी तीन गोष्टी लागतात. १) खरी पण अर्धवट माहिती २) दिशाभूल करून दिली गेलेली घटनेची प्रसिद्धी ३) संदर्भ न पाहता केवळ शब्दार्थाने समजणारा अर्थ.
अशा तीन चार साधनांचा उपयोग करून हिंदू धर्माला झोडपण्याचा उद्योग सध्या चालू आहे. सगळीकडे त्याच त्याच पद्धतीने तोच तोच मुद्दा, विषयांतर करून म्हणा किंवा त्याच विषयाने संवादाची सुरुवात करून इतका डेटा निर्माण झाला आहे की चॅट जीपीटी सारखे ए. आय. देखील तेच शिकून पोपटासारखे तसेच बोलायला लागले पाहिजे. म्हणून मला त्याविषयी बोलणे आवश्यक ठरते. खाली तीन चार उदाहरणे देत आहे...
१) ताड़न के अधिकारी
तुलसीदास यांनी "ढोल गवाँर शूद्र पशू नारी । सकल ताड़न के अधिकारी" असे म्हटले आहे असे स्त्रीवादी/ आंबेडकरवादी नेहमी सांगतात. हे वाक्य रामचरितमानस मधील सुंदरकांड या विभागात एका पात्राच्या तोंडी आले आहे. शेक्सपिअर हा एक नंबरचा स्त्री द्वेष्टा होता आणि त्याने आपले वैयक्तिक मत हॅम्लेटच्या तोंडी टाकले आहे असा आरोप कोणी शेक्सपिअरवर केला नाही. स्त्रीवादी संघटनांनी आजवर कधीही "Frailty, thy name is woman" हे वाक्य त्याच्या नाटकातून काढून टाका असा दावा न्यायालयात केलेला नाही. शेक्सपिअर हा हाडाचा नाटककार होता. तुलसीदास मात्र मनुवादी अजेंडा पुढे सरकवण्यासाठीच लेखन करत होते. असा आरोप करणार्यांनी तुलसीदास यांच्या साहित्यातील ती एक ओळ सोडली तर दुसरे काहीच वाचलेले नसते!
२) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचं ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ हे एक अतिशय गाजलेलं व महत्त्वाचं पुस्तक आहे. त्याचा संदर्भ घेऊन हिंदू धर्माला झोडून काढले जाते. पण त्या पुस्तकात संदर्भ न देताच उचललेली वाक्ये दिली आहेत. उदाहरणार्थ - शल्य हा कर्णाचा सारथी होता. पण तो सतत कर्णाचा तेजोभंग करायचा प्रयत्न करायचा. याचा राग येऊन कर्णाने देखील शल्य आणि त्याचे राज्य किंवा त्याच्या राज्यातील नागरिकांचे कामजीवन याविषयी काही खरे - खोटे किंवा तिखटमीठ लावून अतिरंजित कहाण्या ऐकविल्या आहेत. त्या दोघांचे भांडण हे आपल्याकडच्या नळावरच्या भांडणापेक्षा खालच्या पातळीवर गेलेले होते. अशा भांडणात आलेले संदर्भ राजवाडेंनी आपल्या ग्रंथात "ऐतिहासिक तथ्ये" म्हणून सादर केली आहेत. हे सर्व हास्यास्पद आहे. त्याचा प्रतिवाद झालेला आहे.
https://harshadsarpotdar.blogspot.com/2025/03/blog-post.html
३) मत्स्य पुराणात वर्णिलेले पण्यस्त्री व्रत
मत्स्यपुराण ७० व्या अध्यायांत पुण्यवती स्त्रियांच्या सदाचरणाचा धर्म ऐकण्याविषयी उत्सुक असलेल्या ब्रह्मदेवाला शिवाने जो पुण्यवती स्त्रियांचा धर्म सांगितला, त्यांत "अनंगदान" व्रत आहे. भडकून न जातां हा हिंदुधर्माच्या नांवावरला पाजीपणा वाचा!
"देशाचे दुष्मन" या पुस्तकात दिनकरराव जवळकर यांनी मत्स्य पुराणातील या व्रताचे संगतवार विवेचन केले आहे. पण त्यांची ही टीका संस्कृत भाषेच्या अज्ञानातून निर्माण झालेली आहे. हे व्रत "पुण्यवती" स्त्रियांसाठी नव्हे तर "पण्य" स्त्रियांसाठी सांगितलेले आहे. "पण्य" म्हणजे "विकली जाणारी" म्हणजेच वेश्या! एखाद्या वेश्येला आपण काही चुकीचे काम करीत आहोत अशी जर टोचणी लागून राहिली असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी एखाद्या ब्राह्मणाला रविवारी सकाळी "फ्री सर्व्हिस" देवून त्या मानसिक आंदोलनातून मुक्त होण्याचा मार्ग ठेवणे हा देखील एक प्रकारचा पाजीपणा आहे. असे जर दिनकरराव जवळकर म्हणाले असते तर मी त्यांच्याशी नक्कीच सहमत झालो असतो. पण त्यांनी "पण्य" स्त्री चा धर्म "पुण्यवती" स्त्रियांना लागू करून सर्व ब्राह्मणेतर बायकांना पण्य स्त्री बनवून टाकले याचे मला वाईट वाटते. संस्कृत भाषेने असा चकवा अनेकांना दिला आहे. त्यामुळे मी लेखकाला दोष देणार नाही.
हिंदू धर्मात काहीही दोष नाहीत किंवा तो सर्वश्रेष्ठ धर्म आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही. हिंदू धर्मात अनेक दोष पूर्वी होते आणि आजही आहेत. त्यावर टीका जरूर झाली पाहिजे. फक्त ती वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे एकांगी, दिशाभूल करणारी, अर्धवट किंवा संदर्भ सोडून नको.