कोणत्याही इमेजमधील मराठी मजकूर google lens या अॅपद्वारे वर्ड किंवा इतरत्र कॉपी-पेस्ट करता येतो. कसा ते या व्हिडिओमध्ये फार छान सांगितले आहे.
https://youtube.com/shorts/1xNNUJfNtmM?si=k_ZoplgUqEd5zY5N
गुगल लेन्समधून कॉपी केलेला संपूर्ण मराठी मजकूर marathi spell check या अॅपमध्ये पेस्ट करून स्पेल चेक घेता येतो. त्यामध्ये मूळ लेखातील शुद्धलेखनाच्या चुका आणि गुगल लेन्सने तो मजकूर वाचताना केलेल्या चुका अशा दोन्ही प्रकारच्या चुका दाखविल्या जातात. त्यांचा विचार करून वर्डमधील फाईल अधिक निर्दोष बनविता येईल. मजकूर जर खूपच मोठा (७-८ पानांहून अधिक) असेल तर दोन मिनिटांपेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो.
प्ले स्टोअरवर marathi spell check असा शोध घेतला तर हे अॅप सहज मिळू शकते. पण कोणाला लिंक हवीच असेल तर
https://play.google.com/store/apps/details?id=com.myapp.marathispellcheckandsanskritsandhi
ही सुविधा आवडली तर अॅप स्टोअरवर स्टार देऊन लाईक करा, शेअर करा आणि शक्य असल्यास स्पॉन्सर करा !
_____
"google lens" आणि "marathi spell check" ही दोन्ही ॲप ज्यांनी अवश्य वापरावी अशी उदाहरणे...
१) डी. टी. पी. ची कामे करणार्यांना स्पेल चेकचे तंत्र आणि मंत्र शिकत बसायला वेळ नसतो ही गोष्ट खरी आहे. पण स्क्रिनवरील मजकुराचा एक फोटू काढून या ॲपद्वारे स्पेल चेक करायला तरी जमेल की नाही? वृत्तपत्रात येणारी आपली जाहिरात लाखो लोकं वाचत असतात याचे भान ठेवावे. कोणाचीच तक्रार नाही मग कशाला ही मगजमारी अशी भूमिका घेऊ नये. कारण तक्रार नाही म्हणजे सगळे आलबेल आहे असे नव्हे. नागरिक हा शब्द कधी कधी "नागरीक" असा लिहिला तर काय मोठासा फरक पडतो? मोठासा नाही पण छोटासा तर फरक नक्कीच पडतो. भातात एखाद-दुसराच खडा निघाला तरी जेवणाचा बेरंग होऊ शकतो. जाहिरातीच्या किंवा बॅनरच्या डिझाईनच्या बाबतीत जितका काटेकोरपणा दाखविता त्याच्या १ टक्का तरी भाषेच्या बाबतीत दाखवायला काय हरकत आहे?
२) हे ॲप वापरून विद्यार्थी आपले निबंध स्वतःच तपासू शकतील. मात्र त्यासाठी त्यांना आपले अक्षर सुधारावे लागेल. मी "दिवाळी" असे लिहिले तर गूगलने "विवाळी" असे वाचले. त्याचा अर्थ मला "द" या अक्षरावर मेहनत घ्यावी लागेल असे दिसते. गूगलचे आर्टिफिशिअल इंटलिजन्स आणि मशीन लर्निंगचे मॉडेल जिथे माझे अक्षर नीट वाचू शकत नाही तिथे ते नुसत्या संदर्भाने वाचणार्या शिक्षकांबद्दल थोडा आदर मी दाखवायला हवा. सुवाच्य अक्षर आणि जमेल तितके निर्दोष लेखन वाटते तितके कठीण नाही.
३) वरिष्ठ अधिकार्यांनी मराठी कागदावर सही करण्यापूर्वी एकदा ते पान गूगलच्या नजरेखालून घालावे. त्यानंतर स्पेल चेक करून चटकन नजरेत भरणारी / अर्थाचा अनर्थ करणारी एखादी चूक झाली आहे का ते पाहावे. यात कदाचित दोन चार मिनिटे जातील पण भाषेसाठी आपण इतकेही करू शकत नाही का?
४) "प्रतिलिपी" सारख्या ॲपमध्ये लेखन करणार्या लेखकांनी तर स्पेल चेक वापरणे अत्यावश्यक आहे. वाचक जर पैसे देऊन आपले लेखन वाचणार असतील तर ते अधिकाधिक निर्दोष व्हावे यासाठी प्रयत्न करणे हे लेखकाचे कर्तव्य आहे. केवळ उत्तम कथेच्या जोरावर प्रतिलिपीचे वाचक पैसे देतील असे मला वाटत नाही.