१४ जानेवारी, २०२६

ब्राह्मी लिपी आणि शून्याचा शोध

 कित्येक युरोपियन विद्वानांनी असा ग्रह करून घेतला आहे की हिंदू सुरवातीला लिहिणे जाणतच नसत,  त्यांनी हेही ठरविले की हिंदूंची प्राचीन लिपि (ब्राह्मी) ही हिंदूंनी तयार केली नसून त्यांनी ती इतरांकडून घेतली.  तीदेखील साधारण दोन हजार वर्षांपूर्वी. त्या आधी सर्व साहित्य मौखिक परंपरेने जतन होत असे. असे मानण्याचे कारण की कार्बन डेटिंग पद्धतीने शास्त्रमान्य पुरावा फक्त दोन हजार वर्षांपर्यंतचा मिळत आहे. त्या आधीचे काहीच शीलालेख वगैरे मिळत नाहीत. आता याला काय उत्तर देणार? मला माझ्या ४ ते ५ पिढ्यांपर्यंतच्या आजोबा - पणजोबांची नावे माहीत आहेत. त्या आधीच्या पूर्वजांची नावे मला माहीत नाहीत म्हणजे त्या आधी मला कोणी पूर्वजच नव्हते असा त्याचा अर्थ होतो का? 

माझा युक्तिवाद बालिश समजून सोडून देऊ.  कदाचित भारताचा अभिमान असल्यामुळे मी असे बोलत असेन. पण रायबहादुर पंडित गौरीशंकर हीराचंद ओझा यांनी लिहिलेल्या "प्राचीन भारतीय लिपिमाला" या पुस्तकाच्या प्रस्तावनेची सुरुवातच पहा त्यांनी कशी केली आहे...

 

प्राचीन काळी संस्कृति, सभ्यता व विद्येच्या क्षेत्रांत आर्यांनी अत्युच्च स्थान प्राप्त केले होते. आर्य संस्कृतीचे मूळ स्थानही आशिया खंड असून येथून सर्व जगात धर्म, विद्या, सभ्यता, संस्कृति वगैरेंचा प्रकाश पसरलेला आहे. आशिया खंडातील भारतीय, इराणी व असीरियन लोक आणि आफ्रिका खंडातील इजिप्शियन लोक हे खूपच उन्नतावस्थेला पोचले होते, पण काळाच्या प्रवाहात कोणाचीही स्थिति नेहमीच सारखी राहू शकत नाही. अनेक राज्यक्रांत्या होत होत अखेर इराण, असीरिया आणि इजिप्त हे देश आपल्या प्राचीन वाङ्मयापासून वेगळे पडले आणि त्यांचे वंशज आपल्या संस्कृतीला दुरावले. पण भारतातील आर्यांनी मात्र अनेक संकटे सोसूनही आपल्या प्राचीन सभ्यतेला आणि संस्कृतीला भूषणावह असे आपले बरेचसे प्राचीन वाङ्मय सांभाळून ठेवले. त्यामुळे जगाचे लोक आज विद्येच्या बाबतीत भारताचे कमी-अधिक प्रमाणात ऋणी आहेत.

त्यानंतर त्यांनी असे म्हटले आहे...

मानवाने आपल्या बुद्धीचा उपयोग करून सर्वात मोठी अशी जी दोन कामे करून ठेवली आहेत, ती म्हणजे भारताची ब्राह्मी लिपि व अर्वाचीन नागरी अंक व त्यांचा विकास. जगातील अत्यंत पुढारलेल्या लोकांच्या लिप्या या विसाव्या शतकातही अजून तशाच मागासलेल्या आहेत. ध्वनि व त्यांची सूचक-चिन्हे (अक्षरे) यांत मेळच नाही, त्यामुळे एकाच चिन्हाने अनेक ध्वनि प्रकट होतात, तर एकाच ध्वनीसाठी अनेक चिन्हे वापरली जातात. अक्षरांचा क्रमही शास्त्रीय असा मुळीच नाही. काही ठिकाणी तर अजूनही वर्णात्मक अक्षराऐवजी चित्रात्मक अक्षरेच वापरली जातात. मानवजातीला मिळालेल्या ज्ञानाच्या प्रारंभिक अवस्थेतून अजून त्या लिप्या मुळीच बाहेर आलेल्या नाहीत. पण भारताची लिपि ही हजारो वर्षांपूर्वीही इतक्या उच्च पदाला पोचली होती की जगातील एकही लिपि अजून तिच्या बरोबरीने श्रेष्ठतेत पुढे येऊ शकली नाही. फोनोग्राफचे ध्वनि व त्यांच्या तबकडीवरील चिन्हांचे जसे संबंध आहेत, नेमके तसेच संबंध या लिपीतील ध्वनि व लिखित अक्षरे यांच्यात आहेत. प्रत्येक आर्य ध्वनीसाठी वेगवेगळी चिन्हे असल्यामुळे आपण जसे बोलतो, तसेच नेमके यात लिहिले जाते व जसे लिहितो, तसेच बोलले जाते. संपूर्ण वर्णक्रम शास्त्रीय पद्धतीने ठरवून टाकला गेला आहे. इतके सौकर्य इतर कोणत्याही लिपीत नाही.


 जगाची अंक-विद्या प्राचीन काळात प्रारंभिक अवस्थेतच होती. कधी वेगवेगळ्या अंकांसाठी अक्षरेच लिहिली जात होती, तर कधी एकम्‌ची १ ते ९ पर्यंतची ९ चिन्हे, दहम्ची १० ते ९० पर्यंतची दुसरी ९ चिन्हे आणि शतम् व सहस्राचीही अशीच वेगवेगळी चिन्हे होती. आणि या २० चिन्हांनी फक्त एक लक्षापेक्षा कमीच संख्या मोजली जाऊ शकत असे. त्यामुळे अभिप्रेत असलेली संख्या फक्त त्या त्या  चिन्हांनी कळत असे. भारतातही अंकांचा हाच प्राचीन क्रम चालू होता, पण अशा क्लिष्ट अंकक्रमाने गणित विद्येत प्रगति करून घेणे अशक्य होते. म्हणून येथील लोकांनी अर्वाचीन अंकक्रम शोधून काढला. १ ते ९ पर्यंतचे ९ अंक आणि रिक्त स्थळ-सूचक 'शून्य' अशा १० चिन्हांनी आज संपूर्ण अंक-विद्येचे काम भागते. हा अंक क्रमही जगाने भारतापासूनच घेतला. अर्वाचीन काळात गणित विद्येची किंवा तिच्याशी संबंधित इतर शास्त्रांची जी प्रगति होऊ शकली, तीही या अंकक्रमामुळेच.

भारताच्या आर्यांची बुद्धि व विद्या किती प्रगत अवस्थेप्रत पोचली होती, याचे अनुमान वरील दोनच गोष्टींवरून केले जाऊ शकते. याच दोन विषयांसंबंधाने व त्यांच्या वेळोवेळच्या रूपांतरासंबंधाने माहिती व त्याचे विवेचन या पुस्तकात दिले आहे.

यानंतर ब्राह्मी लिपीची उत्पत्ती या लेखात ते म्हणतात...

पुढे चीनमध्येही संस्कृत-प्राकृतचे अध्ययन होऊ लागले. वेळोवेळी तेथील अनेक विद्वानांनी चिनी भाषेत बौद्ध धर्मासंबंधी अनेक ग्रंथांची निर्मिती स्वतः केली. त्यांत भारतासंबंधीही अनेक प्राचीन गोष्टी लिहिलेल्या आहेत. इ. स. ६६८ मध्ये बौद्ध विश्वकोष (फा युअन चु लिन्) तयार झाला. त्यात 'ललितविस्तर' यात म्हटल्याप्रमाणे ६४ लिप्यांची नावे दिली आहेत व पहिले नांव 'ब्राह्मी'चे आणि दुसरे खरोष्ठीचे (किअ-लु-से-टो क-लु-से-टो खरो-स-ट = खरोष्ठ) आहे. खरोष्ठी लिपीचा तपशील देताना असे म्हटले आहे की चिनी भाषेत या शब्दाचा अर्थ 'गाढवाचे ओष्ठ' असा होतो." त्या पुस्तकात निरनिराळ्या लिप्यांचे जे वर्णन दिले आहे, त्यांत म्हटले आहे की 'लेखनकलेचा शोध तीन दैवी शक्तीने संपन्न अशा आचार्यांनी केला असून त्या सर्वात प्रसिद्ध असे आचार्य 'ब्रह्मा' आहेत व त्यांची लिपि (ब्राह्मी) ही डावीकडून उजवीकडे वाचली जाते. दुसरे आचार्य किअ-लु (किअ-लु-से-टो = खरोष्ठचे संक्षिप्त रूप) आहेत व त्यांची लिपि उजवीकडून डावीकडे वाचली जाते. सर्वात कमी महत्त्वाचे आचार्य 'त्सं-की' आहेत. यांची (चिनी) लिपि ही वरून खाली, अशी वाचली जाते. ब्रह्मा व खरोष्ठ हे भारतात झाले आणि त्सं की चीनमध्ये. ब्रह्मा व खरोष्ठ यांना आपापल्या लिप्या देवलोकातून मिळाल्या आणि त्सं-की यांनी आपली लिपि पक्षी इत्यादींच्या पावलांच्या चिन्हावरून बनविली.    (रिपोर्ट ऑन एन्शंट एन्स्क्रीप्शन्स ऑफ सीलोन -  मॅक्समूलर Page 24) https://dn790003.ca.archive.org/0/items/ancientinscripti01mluoft/ancientinscripti01mluoft.pdf

जी लिपि डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, तिचे प्राचीन नांव 'ब्राह्मी' असून जी लिपि उजवीकडून डावीकडे लिहिली जाते, तिचे नांव खरोष्ठी होते, हे या चिनी पुस्तकाच्या लेखावरून स्पष्ट होते. ब्राह्मी लिपि या देशाची स्वतंत्र व सार्वदेशिक अशी लिपि असल्यामुळेच जैन व बौद्ध ग्रंथही त्यातच लिहिले जाऊ लागले व म्हणूनच त्यांनी लिप्यांच्या नामावलीत तिचे नाव सर्वप्रथम दिले.

ब्राह्मी लिपी आणि शून्याचा शोध लावल्यावर पुढे करण्यासारखे काहीच न उरल्यामुळे भारतातील नंतरच्या पिढ्या झोपी गेल्या का? असा प्रश्न मला विचारला तर मात्र माझ्याकडे काही उत्तर नाही!