०४ नोव्हेंबर, २०२०

चिन्ह की चिह्न

"चिन्ह" आणि "चिह्न" यापैकी कोणता शब्द योग्य आहे? मराठी विकिपीडियामध्ये चिह्न शब्द वापरला जातो परंतु मराठी व्याकरणाच्या पुस्तकात (लेखक: मो.रा. वाळंबे व बाळासाहेब शिंदे) मात्र चिन्ह हाच शब्द आढळतो. कृपया, स्पष्टीकरण द्यावे.

संस्कृत-हिंदीत ण्ह, (न्हाणीघरातला) न्ह, (म्हशीतला) म्ह, ल्ह, (पोऱ्यातला) ऱ्य, (कऱ्हाडमधला) ऱ्ह ही अक्षरे नाहीत. त्यांऐवजी ह्ण, ह्न, ह्म, ह्ल, ह्र ही अक्षरे वापरली जातात. (ऱ्य ला संस्कृत-हिंदी पर्याय नाहीत!) 'ह'चा उच्चार आधी करून मग ण, न, म, ल र यांचा उच्चार करणे मराठी माणसाच्या जिभेला जमत नाही. म्हणून मराठीत ब्राह्मणऐवजी ब्राम्हण, चिह्नऐवजी चिन्ह, उह्लासऐवजी उल्हास, ह्रासऐवजी ऱ्हास असे लिखाण आणि उच्चारण होते. ह्य (ह्+य)चा उच्चार मराठी माणूस य्ह असा करतो, कारण अस्सल संस्कृत ह्य उच्चारणे त्याला जमत नाही.

संस्कृत-हिंदीत ह्न, ह्म आदी अक्षरे ही जोडाक्षरे आहेत, त्यामुळे शब्दात त्यांच्यापैकी एखादे आल्यास आधीच्या अक्षरावर आघात होतो. मराठीत न्ह-म्ह-व्य आदी अक्षरे आल्यास आधीच्या अक्षरावर आघात होत नाही, म्हणून ही जोडाक्षरे नाहीत असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे मराठीत चिन्ह बरोबर, हिंदी-संस्कृतात चिह्न.

https://tinyurl.com/y3atvmjm

Note: मराठी डिक्शनरी सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने दोन्ही शब्द "चिन्ह” आणि "चिह्न” घेतले आहेत.

२८ सप्टेंबर, २०२०

स आणि त

काही शब्दांना "स” आणि "त” हे विभक्ती प्रत्यय लागत नाहीत. उदा आइसक्रीम, फर्निचर कोशात अशा शब्दांपुढे (-स, -त X) अशी नोंद असते. असे सर्व शब्द वेगळे काढावे लागतील.

_____

खाली दिलेली पाच संग्रहवाचक शब्दयोगी अव्यये आहेत. 
च, ही, पण, देखील, सुद्धा 
ही अव्यये थेट मूळ शब्दाला लावली जातात. इतर अव्यये मात्र मूळ शब्दाच्या सामान्यरुपाला लावली जातात.  म्हणजे 

देवदेखील देवापेक्षा मोठा नाही.

या वाक्यात "देखील” हे अव्यय लावताना "देव” शब्दाचे सामान्यरूप झालेले नाही. पण ‘पेक्षा’ लावताना "देव” शब्दाचे सामान्यरूप "देवा” वापरले आहे. वर वर पाहता सामान्य वाटणाऱ्या या फरकाने हंस्पेल डिक्शनरीच्या अफिक्स फाईलमधे मात्र काही मोठे बदल करावे लागतील. Z हा टॅग आता असा दिसेल.

SFX Z Y 5
SFX Z 0 च .
SFX Z 0 ही .
SFX Z 0 देखील .
SFX Z 0 पण .
SFX Z 0 सुद्धा .

“च”, "ही” ही दोन अव्यये A टॅगमधून काढावी लागतील. कारण  तो टॅग सामान्यरूपाला लावला जातो. मूळ शब्दाला नाही.

१४ सप्टेंबर, २०२०

मराठी विकीवरील उत्पात

मराठी विकीवरील एका सदस्याने "निज़ाम" शब्द लिहिताना नुक्ता वापरला, चर्चा पानावरील सर्व मजकूर काढून टाकला अशा काही कारणास्तव विकीच्या मालकांनी त्यांना समज देऊन त्यांचे लिखाण बंद पाडले. त्या निमित्ताने...

या सदस्याने आपल्या चर्चा पानावरील सर्व मजकूर काढून टाकला यात गहजब करण्यासारखे काही नाही. त्यांनी इतर कुठेही असे केलेले नाही. आपले सदस्य पान आणि सदस्य पानाचे चर्चा पान म्हणजे आपली वैयक्तिक मालमत्ता आहे असा बहुधा त्यांचा समज झाला असावा. तो चुकीचा आहे हे कालांतराने त्यांच्या आपोआप लक्षात आले असते. हा उत्पात नव्हे. उत्पात याचा अर्थ कधीही भरून न येणारे नुकसान. त्या अर्थाने "आकडे इंग्रजीत लिहणे” हा देखील उत्पात नाही. नवशिक्या सदस्यांकडून या व अशा अनेक चुका अपेक्षितच आहेत. त्यातून नवीन आणि जुने असे सर्व सदस्य शिकत जातात. मराठीतील आकडे देवनागरीत न लिहता इंग्रजी पद्धतीने लिहिले तर मराठीचे सुलभीकरण होईल असे एखाद्याला वाटू शकते. विकीच्या धोरणात ते बसत नसल्यास त्याला तसे सांगावे लागेल. सांगून न ऐकल्यास धोरण बदलता येईल का याची चर्चा करावी लागेल. धोरण बदलता येत नसल्यास बॉट लावून इंग्रजी आकडे मराठी करायला कितीसा वेळ लागणार आहे? इंग्रजी विकीवर कशी लगेच ऍक्शन घेतात तशी मराठी विकी घेऊ शकत नाही. आधीच तोळा मासा असलेली मराठी विकी अशाने मरणपंथाला लागेल. 

एका पानावरील इतिहास बदलून असत्य इतिहास लिहिला असा दुसरा आरोप आहे. सत्य हे सापेक्ष असून बहुमत, सत्ता, संपत्ती, अधिकार याच्या जोरावर हवे तसे  वाकवता येते. काही एक सुप्त हेतू मनात ठेवून जाणूनबुजून असत्य लेखन केले असे या बाबतीत तरी म्हणता येणार नाही. लिखाण करणाऱ्यांचे पूर्वग्रह त्यांच्या लिखाणात येणे अगदी साहजिक आहे. आणि म्हणूनच विकीवर "ऐडिट” बटण आहे! तुम्हाला खटकणारे पूर्वग्रह तुम्ही दुरुस्त करू शकता. "आम्हाला काय इतर दुसरे धंदे नाहीत का" असा प्रश्न पडला असेल तर पूर्वग्रहविरहित, बावनकशी सोन्यासारखे निखळ सत्य सांगणारा ब्रिटानिका एनसायक्लोपिडीया आहेच की! विकीला विसरा.

विकीवरील कोणतेही पान कधीच "संपूर्णपणे पूर्ण” होत नाही. कोणतेही पान कधीच "संपूर्णपणे नष्ट” होत नाही. तसेच ते कधीच "संपूर्णपणे सत्य” सांगत नाही. विकी ही कुणी सती-सावित्री असून, आतमध्ये शंकराच्या पूजेत मग्न आहे तेव्हा तिचे पावित्र्य आणि कौमार्य यांचे रक्षण करण्यासाठी हातात नंग्या तलवारी घेऊन दिवस-रात्र दरवाज्याबाहेर खडा पहारा दिला पाहिजे असे नाही. त्याचबरोबर विकी म्हणजे  "मोकळे कुरण” असे समजणे देखील चुकीचे ठरेल. या दोन्ही मधील सुवर्णमध्य काढावा लागेल. जर एका बाजूला झुकावेच लागले तर मोकळ्या कुरणाच्या बाजूने झुकावे लागेल. कारण हा "मोकळेपणा” विकीच्या डी.एन.ए. मध्येच लिहिला आहे. ते काही व्यंग नाही. त्यातूनही तो जर दोष मानला तर तो विकीचा जन्मजात दोष म्हणावा लागेल. त्यावर काही उपाय नाही.

१७ मे, २०२०

पर-सवर्णाचे सोवळे ओवळे

अनुस्वार द्यावा की देऊ नये?

याचा निर्णय शुद्धलेखन नियमात सुरवातीलाच दिलेला आहे. (नियम १.१ व नियम १.५)

फक्त स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. ज्या शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो. किंवा तो उच्चारलादेखील जात नाही. अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये. जुन्या साहित्यात अनुस्वाराचा विपुल उपयोग केलेला आढळेल. आताच्या जमान्यात असे नाकात बोलले जात नाही, तसेच लिहिलेही जात नाही.

उदाहरणार्थ:

अनुस्वार द्यावाः गुलकंद, चिंच, तंटा, आंबा
अनुस्वार देऊ नयेः हंसणे, धांवणे, जेव्हां, कोठें, कधीं, कांही


पर-सवर्ण पद्धतीने अनुस्वार दिलेला चालेल का?

याचा निर्णय देखील नियमात सुरवातीलाच दिलेला आहे. (नियम १.२ व नियम १.३) पण या नियमाचा अर्थ नीट न लावला गेल्यामुळे फार गोंधळ निर्माण झाला आहे. तर नियम असे सांगतो की -

तत्सम म्हणजे संस्कृतमधून मराठीत आलेल्या शब्दांना पर-सवर्ण पद्धतीचा अनुस्वार द्यायला "विकल्पाने” हरकत नाही.

यात तीन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

१) ही सूट संस्कृतमधून मराठीत आलेल्या शब्दांनाच आहे. प्युअर मराठी शब्द जसे संप, आंबा, मंदिर, दंगा हे अनुस्वारानेच लिहायचे आहेत. आई आपल्या मुलाला जसे रंग, रूप देते तसेच कधी कधी ब्लड प्रेशर, डायबिटीस देखील देते तसे पर-सवर्ण ही संस्कृतची "लिगसी” मराठी भाषेला मिळाली आहे. ती सांभाळण्याचे टेंशन घेऊ नका. आधीच जोडाक्षरे लिहताना आमची हालत होते. त्यात अनुस्वाराने भागणारे काम जोडाक्षराने का लिहायचे? कोणता शब्द संस्कृतातून आला आहे आणि कोणता ९६ कुळी मराठी आहे याची कल्पना आमच्या तीर्थरूपांना देखील नाही, तर आम्हाला कुठून असणार? नियमानुसार 'अंतर्गत' शब्द 'अन्तर्गत' असा लिहिला तर चालेल. पण 'संबंधित' शब्द 'सम्बन्धित' असा लिहता येणार नाही. कारण काय तर 'अंतर्गत' संस्कृत तर 'संबंधित' मराठी शब्द आहे. काय सांगता? हे कसे ओळखले बुवा? बुरखा घातलेल्या बाईचे वय, सौंदर्य काही जाणकार सांगू शकतात. पण आम्ही कशातलेच जाणकार नसल्यामुळे बाई किंवा शब्द ओळखू शकत नाही. आता तो आमचाच प्रॉब्लेम आहे हे मान्य. पण त्यासाठी तत्सम व तद्भव शब्दांचे वेगवेगळे शब्दकोश तरी उपलब्ध आहेत का? तर उत्तर नाही. किंवा कोणत्या शब्दकोशात तशी काही खूण आहे का? १०० / २०० वर्षांपूर्वीच्या एखाद्या शब्दकोशात तशी सोय असेल कदाचित पण तो शब्दकोश आता "आऊट ऑफ प्रिंट" झाल्यामुळे बघायला देखील मिळणार नाही!

२) दुसरी गोष्ट म्हणजे "हरकत नाही” या शब्दाने काय सूचित होते? त्याचा अर्थ अनुस्वार देणेच अपेक्षित आहे पण एखाद्या डुढ्ढाचार्याने पर-सवर्णाचे सोवळे पाळले तर आम्ही "हरकत” घेणार नाही.

३) तिसरी गोष्टः

विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही. यातील विकल्पाने याचा अर्थ काय? विकल्प या शब्दाचा अर्थ इथे "एकापेक्षां अधिक रूपांचा किंवा नियमांचा स्वीकार" हा आहे. पण त्याबरोबरच विकल्प शब्दाचा मोल्सवर्थने लावलेला अर्थ म्हणजे respecting difference of opinion असा आहे. म्हणजे भिन्नमताचा आदर करा. पण म्हणून मूळ नियमाला म्हणजे अनुस्वाराला विसरून जा असे होत नाही.

नियम असेही सांगतो की अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे. लोकं सरसकट न किंवा म वापरतात ते चुकीचे आहे. ‘त' वर्गासाठी 'न’ तर प साठी म वापरले पाहिजे. त वर्ग म्हणजे त, थ, द ध न उदाहरणः पंडित=पण्डित, अंतर्गत=अन्तर्गत, अंबुज=अम्बुज.

फांद्यांचा हा शब्द फान्द्‍यान्चा असा लिहणे अशुद्ध आहे. फार तर तो फान्द्‍याञ्चा असा लिहता येईल कारण नियमाप्रमाणे द ला न तर च ला ञ जोडावा लागेल. आता तुम्हीच सांगा की तुम्हाला फांद्यांचा वाचायला आवडेल की फान्द्‍याञ्चा ? मुळात फांदी हा शब्द संस्कृत नसून मराठी आहे त्यामुळे त्याला पर-सवर्ण वापरायची सूटच नाही! आता झाला का वांदा (की वान्दा?) तर मूळ मुद्दा असा आहे की पर-सवर्णाच्या नादात जोडाक्षरे वाढतात, ती बेढब दिसतात. लिहायला अवघड जातात. अनुस्वाराची बिंदी वर लावली की खाली त वर्ग आहे की प वर्ग याची चिंता करावी लागत नाही. तसेच तत्सम की तद्भव याचाही विचार करावा लागत नाही.

पर-सवर्ण नीट विचार करून वापरला नाही तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.

उदाहरणार्थ:

वेदांत=वेदांमध्ये, वेदान्त= तत्वज्ञान,
देहांत=शरीरांमध्ये, देहान्त= मृत्यू.

या विषयाला एक तांत्रिक बाजू देखील आहे. युनिकोडमध्ये (गूगलमध्ये) तेंडुलकर आणि तेण्डुलकर तसेच तेन्डुलकर वेगवेगळ्या इंडेक्सखाली नोंद होतात. कुणी तेंडुलकर म्हणून शोधले तर पर-सवर्ण पद्धतीने लिहिलेला लेख मिळणार नाही.

खाली दिलेले सर्व शब्द मराठी आहेत. सबब त्यांना अनुस्वाराची बिंदी लावावी. पर-सवर्णाची फॅशन तिकडे हिंदीत करा फार तर, इकडे नको!

सन्त अम्बादास मन्दिर मण्डळ, शेन्दूर पारम्पारिक सौन्दर्यासाठी बान्धल्यानन्तर यशवन्तराव स्वातन्त्र्यसैनिकान्ना

_____

इंग्रजी शब्द लिहिताना देखील अनुस्वारयुक्त शब्द लिहिणेच बरोबर आहे. पर-सवर्ण पद्धतीने लिहू नयेत.

१) "ब्रँडी" = ब ् र ँ ड ी (३ मुळाक्षरे + ३ स्वर) - ७२ हजार रिझल्ट

२) "ब्रॅंडी" = ब  ् र ॅ ं ड ी (३ मुळाक्षरे + ४ स्वर) - १६ हजार रिझल्ट

३) "ब्रॅण्डी"  = ब ् र ॅ ण ् ड ी (४ मुळाक्षरे + ४ स्वर) - २२२ रिझल्ट

४) "ब्रॅन्डी" = ब ् र ॅ न ् ड ी (४ मुळाक्षरे + ४ स्वर) - ७ हजार रिझल्ट 

२४ एप्रिल, २०२०

Zero width joiner and non-joiner

The word वित्तवान can also be typed as वित्‍तवान  and वित्‌तवान using zero width joiner and non-joiner.  This is called "जोडाक्षराची उभी मांडणी" second is "आडवी मांडणी" and third is "सुटी मांडणी". Though all 3 are valid, use the first one only.  You can use 2 dash and 3 dash if using Pramukh IME to add joiner and non-joiner respectively.

Use these 4 steps to find and remove the joiners.

1) From Edit choose Find & replace.
2) In the find box type \u200D
3) Check "Regular Expression" box
4) Click the "Replace All" button.

Repeat the steps for non-joiner character  \u200C

In other words do not use either joiner or non-joiner while typing in Libre office writer. If you copy - paste the text from somewhere, use the steps mentioned above to remove joiners. Let the font take care of display. Use a font like yashomudra or Shobhika bold.

https://github.com/Sandhi-IITBombay/Shobhika

Note: 
1) "Non breaking space" \u00A0 can be replaced with regular space " " using find - replace. Do not forget to check Regular Expression option.

2) To change line breaks with paragraph marks, find \n and replace with \n while regular expression check box is selected.

०९ एप्रिल, २०२०

लॉकडाऊनच्या निमित्ताने

सध्या लोकांकडे भरपूर मोकळा वेळ आहे, तेव्हा खाली दिलेल्या समस्या या खरोखरच्या समस्या आहेत हे निदान मान्य करण्याकरता थोडा वेळ कोणाला काढता येईल का?

१)  गर्दीचा सोस
२) थुंकण्याचा रोग
३) स्वच्छतेचे महत्त्व
४) प्रदूषणाचा राक्षस
५) ध्वनी प्रदूषणाची समस्या
६) रांगेची शिस्त
७) व्यसनाचा विळखा
८) लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार

१)  गर्दीचा सोस
"अंत्यसंस्कारांचे कार्यक्रम"  या लेखात डॉ. सुधीर देवरे म्हणतात...

सुख असो की दु:ख. लग्न असो की मृत्यू. कार्यक्रम भरगच्च हवाच. खूप गर्दी हवी कार्यक्रमाला. माणसाला गर्दीशिवाय सुख साजरं करता येत नाही की दु:ख. जेवढी गर्दी तेवढा जसा मोठा आनंद; तशी जेवढी गर्दी, तेवढं प्रचंड मोठं दु:खं. माणसाला गर्दी आवडते. दु:खात सुध्दा आपल्या आजूबाजूला प्रचंड गर्दी हवीच. गर्दीने दु:खाची सुध्दा प्रतिष्ठा वाढते असा आपला समज होतोय का?

http://sudhirdeore29.blogspot.com/2019/10/blog-post.html

२) थुंकण्याचा रोग
थुंकू नये याचा भारतीय अर्थ थुंकून ये असा होतो असे सचिन वाडी म्हणतात...

तर मित्रांनो, मी (आणि आपण पण) रोज आपल्या आजूबाजूला थुंकणाऱ्या व्यक्तींचे थवे च्या थवे (कळप म्हणा हव तर) बघतो. अगदी मनापासून थुंकतात हे लोक. यांना काही वेळ, काळ, जागा याचं भान ठेवण्याची गरज नसते. हे आपल्याच विश्वात असतात . ट्राफिक सिग्नल असोत, दवाखाने असोत, ऑफिसेस च्या इमारती असोत का त्या इमारतीमधील लिफ्ट्स किंवा भिंती असोत; आम्ही आपल्या बापदादांची जागा आहे असे समजून एकदम बेभान होवून थुंकणार.

https://sachinwadi.wordpress.com

३) स्वच्छतेचे महत्त्व
स्वच्छ भारत अभियान आणि आपण या लेखात निलेश म्हणतात...

आपण सगळे आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. आपला पैसा, आपला वेळ वाया जात आहे. आपल्या नद्या या सांडपाणी वाहून नेणारी गटारे बनल्या आहेत. कचर्‍याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत.

https://www.misalpav.com/node/29008

त्यावर आलेली पहिलीच (मासलेवाईक) प्रतिक्रिया म्हणजेः सुंदर निंबध. शुद्धलेखनासाठी पाच मार्क एकस्ट्रा

इतर काही प्रतिक्रिया अशाः

गाडगेबाबा थकले सांगून.
नागरिकशास्त्राची पुस्तकंसुद्धा कामी येयीनात.
हजारेंच्या अण्णांनीही प्रयत्न केलेच.
आता मोदी.
चालायचंच.

लोक फक्त आपल्या स्वतःच्या रहात्या घराला घर समजतात, शहराला/ गावाला/ देशाला 'आपले घर' समजत नाहीत, हा खरा प्रॉब्लेम आहे. लोकांमध्ये एकमेकांमधली दरी कमी होत नाही आणि नागरिक विरुद्ध सरकार असा एक विनाकारण बसलेला तिढा सुटत नाही, तोपर्यंत लोक स्वच्छतेच्या बाबतीत बेपर्वा रहाणार हे देखील एक कारण आहेच.

४) प्रदूषणाचा राक्षस
थुंकण्याची तुलना श्वसनाशी करणारे सारंग दर्शने म्हणतात…

सर्वसामान्य भारतीय नागरिकांना थुंकू नका, असे सांगितले तर ‘श्वसन करू नका’ असे सांगितल्यावर जशी एखाद्याची जीवघेणी घुसमट होईल, तशी घुसमट सामान्य भारतीय नागरिकाची होईल. रस्त्यात थुंकू नका किंवा रेल्वेच्या डब्यातून प्लॅस्टिकची पिशवी बाहेर टाकू नका अथवा सार्वजनिक ठिकाणी हातातला कचरा बेलाशक फेकून देऊ नका, हे नियम आणि निकष योग्यच आहेत. आवश्यकही आहेत.

https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/athatho/swachh-bharat-abhiyan-competition/

५) ध्वनी प्रदूषणाची समस्या
एक गलबलून टाकणारा अनुभव सांगताना चंद्रशेखर म्हणतात…

पुण्यात नागरिक शास्त्र जाणणारे, शिकलेले लोक रहातात असा माझा कालपर्यंत भ्रम होता. काल रात्रीच्या दोन तासात तो दूर झाला. पुणे ही अनेक जंगली टोळीवाल्यांची मिळून बनलेली वस्ती आहे हे लक्षात आले. यापैकी प्रत्येक टोळीची स्वत:ची वागण्याची तर्‍हा आहे. यामुळे इतर लोकांना कितीही त्रास झाला तरी या जंगली टोळीला त्याची पर्वा असण्याचे काहीच कारण नाही. त्या लोकांनी स्वत:चे बघून घ्यावे.

http://mr.upakram.org/node/2621

६) रांगेची शिस्त
शाळेतील रांगेची शिस्त जाते कुठे? असा प्रश्न विचारणारे नागोराव येवतीकर म्हणतात...

शाळा तर सर्वांनीच शिकलेली असते मग शाळेत शिकलेली शिस्त कुठे गेली? असा प्रश्नदेखील मनात येतो. शाळेतल्या कोणत्याच बाबीचा परिणाम प्रत्यक्षात समाजात जीवन जगताना दिसत नसेल तर या शिक्षणाचा फायदा तरी काय? शिक्षण हे फक्त नोकरीसाठीच आहे काय? मुलांना पुस्तकी ज्ञान देताना त्यांना मूल्यशिक्षण देण्याचे पार विसरून चाललो आहोत

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/saamana-epaper-saam/lekh+shaletil+rangechi+shist+jate+kuthe-newsid-99436965

७) व्यसनाचा विळखा
व्यसनाबद्दलचा आपला स्वानुभव सांगताना तुषार नातू म्हणतात...

मी पूर्णपणे ब्राऊन शुगर च्या आहारी गेल्यावर माझी भूक मंदावली होती , वजन कमी होत चालले होते , तसेच आता ब्राऊन शुगर साठी लागणारे पैसे जमवणे देखील कठीण होत चालले होते. त्यामुळे घरात चोऱ्या करणे, बाहेर उधारी करणे, ओळखीच्या लोकांकडे उसने पैसे मागणे असे प्रकार सुरू झाले होते.

http://tusharnatu2013.blogspot.com/2013/03/blog-post_1623.html

८) लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार
लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीतील लेखक म्हणतात...

दर चार मुलींपैकी एका मुलीला आणि दर सात मुलग्यांपैकी एका मुलग्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागलेलं असतं. अशी आकडेवारी बाहेर आली की, एक प्रतिक्रिया नेहमीच समोर येते- ‘‘हे असले प्रकार होत असतील पाश्चात्त्यांकडे. आमची भारतीय मूल्यव्यवस्था फार चोख आहे!’’

https://www.loksatta.com/chaturang-news/we-must-speak-5598/ 

१८ फेब्रुवारी, २०२०

स्पेल चेक ए-पी-आय


हैदराबादच्या कृष्णा अग्रवाल यांच्या सहकार्याने मराठी स्पेल चेकचा ए-पी-आय आता उपलब्ध करून देत आहोत. खाली दिलेल्या साईटवर जाऊन आपल्या ब्लॉगची लिंक तेथील इनपुट बॉक्समध्ये कॉपी-पेस्ट करा. पुढील पानावर चुकीचा शब्द आणि त्याला सुचवलेल्या शब्दांची यादीच पहायला मिळेल.


सोर्स कोड मुक्त स्रोत लायसंसखाली येथे उपलब्ध आहे.


आपल्यापैकी कोणी संगणक तज्ज्ञ असतील ते ही डॉकर कमांड वापरून हा ए-पी-आय स्वतःच्या साईटवर उपलब्ध करून देऊ शकतील.

docker run -p 5000:5000 -d shantanuo/flaskspell

मी माझ्या साईटवर ही सुविधा शक्य तितके दिवस पुरवीनच.


३१ जानेवारी, २०२०

मनोगताचा स्पेल चेकर

आतून, करून, नजीक, बदली आणि वतीने ही अव्यये मनोगत साईटने स्वीकारलेली दिसत नाहीत. याचा अर्थ बसण्याबदली, बसण्यावतीने असे शब्द त्यात चुकीचे म्हणून दाखविले जातात.  तसेच अनेकवचनी रूपे म्हणजे बसण्यांचा, बसण्यांच्या बसण्यांस ही देखील त्यात नाहीत. पण मनोगतात नाहीत म्हणजे मराठीत नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून यात ठेवली आहेत.

बसलय की बसलंय?

टॅग P  मधील हे चार रूल बरोबर आहेत का?

SFX P णे लस णे
SFX P णे लंस णे
SFX P णे लय णे
SFX P णे लंय णे

यापासून बसलस, बसलंस, बसलय, बसलंय किंवा बसवलय, बसवलंय असे शब्द तयार होतात. त्यातील अनुस्वारयुक्त शब्द बरोबर आहेत. अनुस्वार नसलेले म्हणजे बसलय, बसवलय काढायचे तर हे दोन रूल कमी करावे लागतील.
 
SFX P णे लस णे
SFX P णे लय णे

सध्यातरी अनुस्वार नसलेले आणि असलेले असे चारही रूल्स आहेत. पण भविष्यात बहुतेक हे दोनच रूल्स राहतील.

SFX P णे लंस णे
SFX P णे लंय णे

२९ जानेवारी, २०२०

नाबर की नंबर?

गुगलने मशीन लर्निंगचा वापर करून सर्च रिझल्ट दाखवायला सुरुवात केली, त्याला आता फार नाही पण एक-दोनच महिने झाले असतील.

https://www.blog.google/products/search/search-language-understanding-bert/

काही बाबतीत रिझल्टमध्ये सुधारणा झाली असली तरी इतर बऱ्याच बाबतीत आणि विशेषतः देवनागरी सर्चची क्वालिटी घसरलेली दिसते.  आज मी "मंगेश नाबर” या व्यक्तीची माहिती गुगलून पाहिली तर "मंगेश" आणि "नंबर"  हे दोन शब्द असलेली पाने पहिल्या पानावर दिसत आहेत. बहुतेक गुगलने "नाबर” या शब्दाला बदलून "नंबर” केले असावे!

१२ जानेवारी, २०२०

स्पर्धापरीक्षेचा खरा धोका

राजन गवस यांचा "सुत्तडगुत्तड : स्पर्धापरीक्षेची लष्करअळी” हा लेख वाचण्यासारखाः
https://www.loksatta.com/chaturang-news/armyworm-of-the-competition-exam-abn-97-2020627/

लेखाचा सारांश असाः
नोकऱ्याच नसतील, असलेल्या वशिल्याशिवाय मिळतच नसतील, तर शिकायचं कशाला, अशी मानसिकता तयार होत असतानाच यूपीएससी, एमपीएससीची लष्करअळी कोणीतरी गावात आणून सोडली. जागा कमी, परीक्षा देणाऱ्यांची संख्या कैक लाखांत. एक परीक्षा, दोन परीक्षा करत करत तिशी उंबऱ्यावर येऊन ठेपली आणि समोर सगळा अंधारच दिसायला लागला.. आईबाप कंगाल झाले. उमेदीची वर्षे मातीत गेली. या भयंकर साथीच्या अळीनं त्यांची आयुष्यंच बरबाद केली. याला जबाबदार कोण? हजारात एक होत असेल अधिकारी पण या नऊशे नव्याण्णवांचे काय?

हे वास्तव नक्कीच चिंताजनक आहे. पण माझ्यामते खरी समस्या वेगळी आणि अधिक गंभीर आहे. स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली जो अभ्यास करून घेतला जातो त्याचा बहुतांश भाग हा "माहिती" या स्वरूपाचा असतो. म्हणजे अमुक एका नेत्याचे निधन कोणत्या वर्षी झाले? अमुक एक शासन पुरस्कार कोणाला मिळाला?  त्यातही विद्यार्थ्याला जातीयवादी बनविणारे कित्येक प्रश्न असतात. उदा. अमुक एक जात ओबीसी वर्गात मोडते का? अमुक एक जात तमूक एका जातीच्या वरची की खालची (असा प्रश्न डायरेक्ट नव्हे तर अप्रत्यक्षरीत्या विचारलेला) सध्या मार्केटमध्ये  मागणी असलेले अभ्यासक्रम म्हणजे "डेटा सायन्स”, "मशिन लर्निंग”, “आर्टिफिशियल इंटेलिजन्स" यांची त्यांना गंधवार्ताही असत नाही. जातीयवादी आणि कंपूबाजी याचा सराव झाला की कोणत्यातरी राजकीय / सामाजिक  पक्षात आपोआप प्रवेश होतो आणि जीवनाची दिशाही बदलते. ही दशा मात्र खात्रीने अधोगतीकडे घेऊन जाते!