"चिन्ह" आणि "चिह्न" यापैकी कोणता शब्द योग्य आहे? मराठी विकिपीडियामध्ये चिह्न शब्द वापरला जातो परंतु मराठी व्याकरणाच्या पुस्तकात (लेखक: मो.रा. वाळंबे व बाळासाहेब शिंदे) मात्र चिन्ह हाच शब्द आढळतो. कृपया, स्पष्टीकरण द्यावे.
संस्कृत-हिंदीत ण्ह, (न्हाणीघरातला) न्ह, (म्हशीतला) म्ह, ल्ह, (पोऱ्यातला) ऱ्य, (कऱ्हाडमधला) ऱ्ह ही अक्षरे नाहीत. त्यांऐवजी ह्ण, ह्न, ह्म, ह्ल, ह्र ही अक्षरे वापरली जातात. (ऱ्य ला संस्कृत-हिंदी पर्याय नाहीत!) 'ह'चा उच्चार आधी करून मग ण, न, म, ल र यांचा उच्चार करणे मराठी माणसाच्या जिभेला जमत नाही. म्हणून मराठीत ब्राह्मणऐवजी ब्राम्हण, चिह्नऐवजी चिन्ह, उह्लासऐवजी उल्हास, ह्रासऐवजी ऱ्हास असे लिखाण आणि उच्चारण होते. ह्य (ह्+य)चा उच्चार मराठी माणूस य्ह असा करतो, कारण अस्सल संस्कृत ह्य उच्चारणे त्याला जमत नाही.
संस्कृत-हिंदीत ह्न, ह्म आदी अक्षरे ही जोडाक्षरे आहेत, त्यामुळे शब्दात त्यांच्यापैकी एखादे आल्यास आधीच्या अक्षरावर आघात होतो. मराठीत न्ह-म्ह-व्य आदी अक्षरे आल्यास आधीच्या अक्षरावर आघात होत नाही, म्हणून ही जोडाक्षरे नाहीत असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे मराठीत चिन्ह बरोबर, हिंदी-संस्कृतात चिह्न.