०५ ऑगस्ट, २०२२

इंग्रजी शब्द मराठीत (भाग १)

 "टेक्नॉलॉजीचा" हा शब्द खाली दिलेल्या २० – २५ प्रकारे लिहिला जात आहे असे दिसते. त्यातील एकच पद्धत नक्की करून ती वापरणे सर्वांच्या फायद्याचे ठरेल.  

टॅक्नॉलॉजीचा
टेक्नलॉजीचा
टेक्ऩॉलॉजीचा
टेक्नालाजीचा
टेक्नालॉजिचा
टेक्नालॉजीचा
टेक्नॉंलॉजीचा
टेक्नॉलजीचा
टेक्नॉलाजीचा
टेक्नॉलीजीचा
टेक्नॉलॉगीचा
टेक्नॉलॉचीचा
टेक्नॉलॉजिचा
टेक्नॉलोजीचा
टेक्नोलॉजिचा
टेक्नोलोजीचा
टेक्‍नॉलॉजीचा
टेक्‍नोलॉजिचा
टेक्नोलाॅजीचा
टेक्‍नोलॉजीचा
टेक्नोलॉजीचा
टेक्नाॅलाॅजीचा
टेक्नॉलॉजीचा

यातील शेवटचे दोन शब्द दिसायला सारखे दिसले तरी युनिकोडच्या नियमानुसार ते वेगवेगळे आहेत. नोटपॅडमध्ये कॉपी-पेस्ट केल्यावर त्यातील वेगळेपण लगेच समजत आहे. स्पेलचेकमध्ये शेवटचा "टेक्नॉलॉजीचा" हा शब्द बरोबर दिसत असून इतर शब्द चुकीचे दाखवत आहे. ते बहुधा बरोबर असावे.  उच्चाराप्रमाणे लेखन, जोडाक्षरांचे वैकल्पिक लेखन, युनिकोडच्या नियमाप्रमाणे लेखन, परभाषेतील शब्दांना मराठीचे नियम लावून केलेले लेखन अशा सर्व कसोट्यांची परीक्षा घेणारा हा शब्द आहे!  ऑक्सफर्डमध्ये पाहिले तर हा शब्द खरा म्हणजे "टेक्नॉलजीचा" असा लिहावा लागेल. तसा तो कोणीच लिहीत नाही हे गूगलमध्येच शोधले तर स्पष्ट दिसत आहे. तेव्हा शास्त्रापेक्षा रूढी बलिष्ठ या न्यायाने "टेक्नॉलॉजी" हा शब्द डिक्शनरीत घेत आहे. कुणाचा आक्षेप असेल तर ते इथे लिहितीलच.  असाच दुसरा शब्द आहे टेक्स्चर texture.

०१ ऑगस्ट, २०२२

अफिक्स फाईलमधील बदल

सध्याच्या स्पेल-चेकमध्ये खाली दिलेले चारही शब्द शुद्ध समजले जातात व त्याखाली लाल रेघ येत नाही.

घरामध्ये
घरामधे
घरामधें
घरामध्यें

शुद्धलेखनाच्या नियम १.५ प्रमाणे अनुच्चारित अनुस्वार देता येत नाहीत. त्यामुळे शेवटचे दोन शब्द आपोआप अशुद्ध ठरतात. तर "मधे” हे "मध्ये” या शब्दाचे बोली रूप असून ते देखील नियमाप्रमाणे अशुद्ध ठरते. फक्त पहिला "घरामध्ये” हा एकच शब्द शुद्ध ठरतो. तसे असले तरी सर्वसमावेशक डिक्शनरी बनविण्याच्या धोरणाप्रमाणे चारही शब्द योग्य दाखविले आहेत. कोणाला जर १००% नियमाने चालणारी डिक्शनरी हवी असेल तर अफिक्स फाईलमधील खाली दिलेले दोन रूल काढून टाकून स्पेल चेकर बनवून घेता येईल.

BREAK ं$
ICONV मधे मध्ये

१४ जुलै, २०२२

हंस्पेलची कंजुसी

 मी जर "कंजूषी" असा शब्द टाईप केला तर मला "कंजुसी" अशी सुचवणी मिळत नाही. कारण मूळ शब्दात दोन ठिकाणी बदल करावे लागत आहेत. हा हंस्पेलमधील दोष असून तो सुरवातीपासून तसाच आहे!

इंग्रजीतही testimont या शब्दाला  "testament" किंवा desimination या शब्दाला  "dissemination" असा शब्द सुचविला जात नाही. यासाठी साउंडेक्स पद्धतीचा अवलंब करावा असे हंस्पेलच्या कर्त्यांनी म्हटले आहे पण ते नेमके कसे करायचे ते सांगितलेले नाही.

https://bugzilla.mozilla.org/show_bug.cgi?id=519214

गुगलने क्रोमसाठी हंस्पेलमध्ये बरेच बदल केले आहेत. त्यामुळे त्यांचे सगळे ठीक चालले आहे असे दिसते!

१० जून, २०२२

भाषा बदलतेय नव्हे तर बदलली आहे!

भाषासूत्र या सदरात वैशाली पेंडसे-कार्लेकर यांनी "भाषा बदलतेय" या लेखात नियम १३ चा विस्तार करून त्यानं, इकडं, इथं, आतलं, मधलं अशा शिरोबिंदूयुक्त शदांचा प्रमाण भाषेत स्वीकार करावा असे सुचविले आहे. तसेच, बदलते आहे- बदलतेय, गेली आहे- गेलीय- गेलेय, बोलतो आहे- बोलतोय अशा प्रकारची संधिसाधू क्रियापदेदेखील नियमानुसार आपलीशी करावी असे म्हटले आहे.

loksatta.com/navneet/marathi-language-learning-changes-in-marathi-language-types-of-marathi-sentences-zws-70-2965010/

स्पेलचेकच्या डेटाबेसमध्ये हे शब्द अगदी सुरवातीपासून म्हणजे सुमारे १५ वर्षांपासून जमा आहेत. या शब्दांचा आम्ही कधीच स्वीकार केला आहे!

२९ एप्रिल, २०२२

नेहमी चुकणारे शब्द

मुल्य > मूल्य

स्विकार > स्वीकार

मंदीर > मंदिर

आधारीत > आधारित 

क्रांतीकारी > क्रांतिकारी

समुह > समूह

स्वरुप > स्वरूप

नमुद > नमूद

असुन > असून

सेल्सिअस की सेल्सियस?

यष्टीरक्षक > यष्टिरक्षक



२६ एप्रिल, २०२२

नामाचे लिंग सर्वनामाला

खाली दिलेल्या वाक्यात "असलेली" बरोबर आहे का "असलेले" बरोबर आहे?

१) बेल्हे जुन्नर तालुक्यातील एक मोठी बाजार पेठ असलेली मोठ्ठ गाव आहे. 

२) बेल्हे जुन्नर तालुक्यातील एक मोठी बाजार पेठ असलेले मोठ्ठ गाव आहे. 

माझ्यामते क्रमांक २ बरोबर आहे. त्याचे कारण यस्मिन शेख यांच्या लेखात वाचता येईल.

https://www.loksatta.com/navneet/gender-in-marathi-nouns-marathi-language-learning-zws-70-2831275/

ही दोन वाक्ये वाचा :

(१) 'वृद्धांना कधी कधी वाटते, की वार्धक्य किंवा दीर्घायुष्य हे परमेश्वराची कृपा नसून अवकृपा आहे.'

(२) 'मवाल्यांनी त्या सुंदर मुलीला इतका त्रास दिला, की सौंदर्य हे वर नसून शाप आहे असे तिला वाटू लागले.'

या दोन्ही वाक्यांत एक चूक आहे, 'हे' हा शब्द. या दोन्ही वाक्यांत 'हे' हे सर्वनाम, नपुसकिलगी, एकवचनी आहे. वास्तविक पहिल्या वाक्यात हे सर्वनाम 'वार्धक्य' किंवा 'दीर्घायुष्य' या नपुसकिलगी नामाचे नसून 'कृपा','अवकृपा' या स्त्रीलिंगी एकवचनी नामांचे आहे. तसेच, दुसऱ्या वाक्यात 'हे' हे नपुसकिलगी सर्वनाम 'सौंदर्य' या नपुसकिलगी, एकवचनी नामाचे नसून ते 'शाप' 'वर' या (पुल्लिंगी) नामांचे आहे. हे शब्द – नामे, पुल्लिंगी, एकवचनी आहेत, त्यामुळे ही वाक्ये अशीच योग्य आहेत. 

(१) 'वृद्धांना कधी कधी वाटते, की वार्धक्य किंवा दीर्घायुष्य ही परमेश्वराची कृपा नसून अवकृपा आहे.' 

(२) मवाल्यांनी त्या सुंदर मुलीला इतका त्रास दिला, की सौंदर्य हा वर नसून शाप आहे असे तिला वाटू लागले.

या संदर्भात लोकमान्य टिळकांचे एक अत्यंत प्रसिद्ध वचन येथे उद्धृत करावेसे वाटते. – 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.' 'हा', 'तो' ही पुल्लिंगी सर्वनामे 'स्वराज्य' या नपुसकिलगी नामाची नसून, 'हक्क' या पुल्लिंगी नामासाठी आहेत.

अलीकडेच 'लोकसत्ता'त छापलेले हे वाक्य पाहा – 'मुंबई पोलीस प्रशासनाने काढलेला आदेश हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाठपुराव्याचे यश आहे' असे परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. 'हे' हे सर्वनाम (नपुसकिलगी एकवचनी) 'आदेश' या पुिल्लगी नामाचे नसून 'यश' या नपुसकिलगी नामाचे आहे, हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल.

०९ एप्रिल, २०२२

कारकिर्द की कारकीर्द?

अरूण फडके यांच्या मार्गदर्शनाखाली बनलेल्या "शुद्धलेखन ठेवा खिशात" या ॲपमध्ये हे स्पष्टीकरण मिळाले.

बरोबरः उर्फ, कारकिर्द, शागिर्द, सुपुर्द

चूकः ऊर्फ, कारकीर्द,शागीर्द, सुपूर्द

उर्फ, कारकिर्द, शागिर्द, सुपुत्र हे मराठीतले तद्भव शब्द आहेत. त्यामुळे ह्यांमधले इकार-उकार मराठीच्या ऱ्हस्व-दीर्घ नियमांनुसार लिहिले जातील. परंतु ह्या चारही शब्दांमध्ये रफारयुक्त अ-कारान्त जोडाक्षर आहे. त्यामुळे ह्या शब्दांना दोन नियम लागू होतात.

१) अ-कारान्तापूर्वीचा इकार उकार दीर्घ असतो.

२) जोडाक्षरापूर्वीचा इकार-उकार ऱ्हस्व असतो.

हे दोन नियम परस्परविरुद्ध इकार-उकार दाखवतात. त्यामुळे आता अ-कारान्त जोडाक्षर असलेले इतर मराठी शब्द ह्या दोन नियमांपैकी कोणत्या नियमाने चालतात हे पहावे लागेल. ते शब्द असे - कुट्ट, खिन्न, खुट्ट, गुच्छ, ठुस्स, डिम्म ढिम्म, डु ढुस्स, फुस्स, भिल्ल, भिस्त, मिट्ट, शिस्त, सुस्त, हुश्श हे सारे शब्द जोडाक्षरापूर्वीचा एकार इकार - उकार ऱ्हस्व असतो ह्या नियमाने चालताना दिसतात. त्यामुळे ह्याच नियमानुसार उर्फ, कारकिर्द, शागिर्द, सुपुर्द असेच लेखन बरोबर ठरते.