१८ फेब्रुवारी, २०२५

हंस्पेलचा फायदा

हंस्पेलचा मला व्यक्तिशः काय फायदा झाला याचा मी विचार करतो तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे भाषेकडे पाहण्याची एक विशाल दृष्टी मला या प्रोजेक्टने दिली.  इंग्रजीत ज्याला  "birds eye view" म्हणतात अशी दृष्टी. म्हणजे बघा, तुम्ही जेव्हा विमानातून जमिनीकडे पाहता तेव्हा तुम्हाला शेकडो किलोमीटर परिसर एकाच नजरेत दिसतो.  गाव/ तालुका  वेगळे ओळखू येत नाहीत. जमिनीच्या हद्दीवरून होणारी भांडणे विमानातून पाहताना क्षुद्र वाटू लागतात.  आता असा विचार करा की तुमचे विमान आकाश ओलांडून अंतराळात गेले आहे. तिथून तर संपूर्ण पृथ्वी पाहता येते की नाही?  ह्या प्रोजेक्टने जवळपास संपूर्ण जगातील भाषा कवेत घेतल्या आहेत,  त्यातील आंतर-संबंध उलगडून दाखविले आहेत आणि त्यातील साम्यस्थळे अधोरेखित केली आहेत.  भाषेच्या अभ्यासकांना हंस्पेल हा विषय निदान २ मार्कांसाठी तरी ठेवला गेला पाहिजे असे मला वाटते. त्यातून भाषेकडे पाहण्याची एक वेगळी आणि विशाल दृष्टी मिळेल. तिचा आपल्याला इतर ठिकाणी देखील फायदा होईल. मी हिंदी भाषेतील स्पेल चेक बनविला, त्यावरून मायबोलीवरील एका सदस्याने टीकेचा अक्षरशः भडिमार केला तो येथे वाचता येईल.

https://www.maayboli.com/node/67422?page=4

वास्तविक हिंदी आणि मराठी एकाच भाषेपासून बनलेल्या असल्यामुळे त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत गेला आहे. एकमेकांना न संपवता सहजीवन जगता येणे वाटते तितके कठीण अजिबात नाही हे मी हंस्पेलच्या अभ्यासातून शिकलो.  भाषेचा भूतकाळ आणि त्याची वर्तमानाकडे झालेली वाटचाल याचा अभ्यास करणार्‍यांसाठी हा प्रोजेक्ट म्हणजे एक चांगले साधन आहे.

एखाद्याला कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथानंतर भाषेला सूत्ररूपात मांडण्याचा हंस्पेल हा एक महत्त्वाचा प्रयोग आहे.  हंस्पेलच्या फॉरमॅटमध्ये कोणतीही भाषा बसविताना शब्दांचा ल. सा. वि. काढावा लागतो आणि त्याला टॅग जोडावा लागतो. पाणिनीने देखील अशाच प्रकारे संस्कृत भाषेची बांधणी केली त्यामुळे तिचा विस्कळीतपणा जाऊन त्याला बांधेसूदपणा आला. संस्कृतच्या अभ्यासकांचे पाणिनी शिवाय पान देखील हलत नाही तसे काहीसे हंस्पेलच्या बाबतीत भविष्यात होऊ शकते. हंस्पेलच्या फॉरमॅटमधील पर्शियन (फारसी) भाषेची अफिक्स फाईल पाहिली तर आपल्या लक्षात येते की त्या भाषेची रचना देखील इतर इंडो-युरोपीयन भाषांसारखीच आहे. खाली दिलेल्या दुव्यावर सर्व भाषा पाहता येतील.  पहिली दोन अक्षरे भाषा दर्शवितात तर नंतरची दोन अक्षरे देश. (उदा. mr_IN म्हणजे मराठी_इंडिया)

https://github.com/LibreOffice/dictionaries/

उजवीकडून डावीकडे लिहिल्यामुळे पर्शियन लिपी दुर्बोध झाली तरी भाषेचा डी. एन. ए.  इतर भाषांशी मिळता-जुळता आहे.  फक्त अफिक्स फाईल पाहून आपण काही निष्कर्ष काढू शकतो. उदा. संस्कृतमध्ये कोणतेही दोन शब्द एकमेकांना जोडून संधी शब्द बनविता येतो. तसे जगातील इतर कोणत्या भाषेत शक्य आहे? या प्रश्नाचे उत्तर ह्या साध्या कमांडने देता येईल. 

# find . -name "*.aff" -exec grep -i -l "^compoundbegin" {} \;

डॅनिश (डेन्मार्क), जर्मन, क्रोएशियन, हंगेरियन, नॉर्वेजियन, कोरियन, स्विडिश, फारसी, डच, इस्टोनियन अशा ८ ते १० भाषा संस्कृत  सारखी संधी करू शकतात. कारण  "कंपाऊंड-बिगिन" हा टॅग जर त्या भाषेच्या अफिक्स फाईलमध्ये असेल तर त्याचा अर्थ ती भाषा शब्दाची संधी करू देते असा होतो.