२८ डिसेंबर, २०१२

युनिकोडमधील बग

मुळाक्षराचा पाय मोडता येतो. पण त्याला स्वर लागल्यानंतर त्याचा पाय मोडता येत नाही. पण युनिकोडमानकात असे करता येते असे दिसते. उदा...
खाली पाय मोडका "र" दिला आहे तो बरोबर आहे.
र्
पण "रा" चा पाय मोडणे देखील शक्य असे असे दिसते.
 रा्

अधिकारा्ची यात जो पाय मोडलेला आहे तो अस्थानी आहे. हा युनिकोडमधील दोष (बग) असावा.

२५ डिसेंबर, २०१२

मुक्त स्रोत थिसॉरस

ओपन ऑफिस / लिबर ऑफिसमध्ये थिसॉरस वापरून शब्दांचे अर्थ पाहू शकतो तसेच समानार्थी किंवा विरुद्ध अर्थी शब्द मिळवू शकतो.




बहुधा हाच शब्दसंग्रह वापरून समानार्थी शब्द एका राईट क्लिकवर आणलेले दिसतात.



मराठीमध्ये हे शक्य आहे का? माझ्या माहितीप्रमाणे अशी सुविधा बनवायला बराच वेळ / श्रम लागत असल्यामुळे अजून तरी असा प्रयत्न झालेला नसावा. मोफत आणि मुक्त स्रोत लायसन्सखाली वितरित करता येऊ शकेल असा थिसॉरस बनणे अत्यंत आवश्यक आहे.

_____

The relevant entry from th_en_CA_v2.dat file
ploy|2
(noun)|gambit|remark (generic term)|comment (generic term)
(noun)|gambit|stratagem|maneuver (generic term)|manoeuvre (generic term)|tactical maneuver (generic term)|tactical manoeuvre (generic term)
The relevant entry from th_en_CA_v2.idx file
ploy|12626348

१९ डिसेंबर, २०१२

स्पेल चेक डिक्शनरीला आपले योगदान

फायरफॉक्स व ओपन ऑफिस दोन्ही मध्ये राईट क्लिक वापरून शब्द डिक्शनरी वाढविण्याची सोय आहे. अशा प्रकारे इतरांनी जमा केलेले शब्द जर मला मिळाले तर मी ते थेट डिक्शनरीत टाकून ही डिक्शनरी अधिक परिणामकारक व सर्वसमावेशक बनवू शकतो. त्यासाठी मला एक फाईल पाठवून द्या.

फायरफॉक्स:
आपण जर फायरफॉक्स वापरत असाल व राईट क्लिक वापरून बरेच शब्द साठवून ठेवले असतील. तर त्या शब्दांचा बॅकअप घ्या व ती फाईल मलाही पाठवा. त्यासाठी Help मेन्यु मधून Troubleshooting Information निवडा आणि मग "Profile folder - Open Folder" बटनावर क्लिक करा.


आता जो फोल्डर उघडेल त्यातील "persdict.dat" या फाईलला कुठेतरी म्हणजे "माय डॉक्युमेंट" वा तशाच एखाद्या ठिकाणी सेव्ह करा व ती फाईल मला इ-मेल करा.
_____

ओपन ऑफिस, लिबर ऑफिसः
यातही आपण राईट क्लिक करून मराठी शब्द साठवलेले असतील. तर मग रायटरच्या Tools - Options - LibreOffice - Paths मध्ये जाऊन अ‍ॅटो करेक्टचा पाथ पाहून ठेवा.


 किंवा start – run च्या डायलॉगबॉक्स मध्ये %APPDATA% असे टाईप करा व "ओके" द्या. आता आपण थेट अ‍ॅप्लिकेशन डाटा या फोल्डरमध्ये पोहोचू.


इथून पुढे \LibreOffice\4\user\wordbook अशा पायर्‍या पार केल्या की standard.txt फाईल दिसेल हीच फाईल मला पाठवा व तिचा बॅक-अप देखील घ्या.


थोडक्यात ओपन ऑफिस वापरत असाल तर standard.dic आणि फायरफॉक्स वापरत असाल तर persdict.dat या फाईलचा बॅकअप घेऊन ठेवा आणि ती फाईल मला पाठवा, या पत्त्यावर shantanu.oak@gmail.com

०४ डिसेंबर, २०१२

सोळावा नियम धोक्याचा

मनोगताच्या यंदाच्या दिवाळी अंकाच्या संपादकीयात शुद्धलेखनाच्या नियमांचा फारच चांगला ऊहापोह केलेला आहे.
http://www.manogat.com/diwali/2012/node/63.html

मला या विषयी काही मत मांडायचं आहे. तसं पाहिलं तर सोळावा नियमही जाचकच म्हणायला हवा. तो नियम असा..
राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत
रहाणे, राहाणे, पहाणे, वहाणे, वाहाणे, अशी रूपे वापरू नयेत.

आधुनिक विचारवंतांना हा नियम बहुधा मान्य होणार नाही व भाषेला वाहाणे आणि वहाणे हे दोन्ही शब्द पुढेमागे स्वीकारावे लागतील असे दिसते. यात हरकत अशी आहे की वहाणे हे क्रियापदाचे रूप वहाण ह्या चप्पल या अर्थाने असलेल्या शब्दावर अतिक्रमण करतो. अशा वेळी त्या शब्दाचा अर्थ संदर्भाने घ्यावा लागेल. एकच शब्द विविध पद्धतीने लिहीला गेला तरी चालेल उलट त्यामुळे भाषेतील सर्वसमावेशकता वाढेल व प्रत्येकाला आपली भाषा(च/ही) बरोबर असल्याचा दिलासा मिळेल असा युक्तिवाद करणार्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की अशाने भाषेतील शब्दांचे स्थान डगमगीत होईल व कालांतराने ती भाषा मागे पडेल. कारण लिहीताना व वाचताना संदर्भ दरवेळी लक्षात घेतला जात नाही. बोलताना संदर्भच मोलाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे भाषणात एखाद्याने "देवाला फुले वहाणे" असा उल्लेख केला की तो शब्द वाहाणे या अर्थाने आला आहे यात शंका राहात नाही. पण लिहताना व वाचताना शब्द मागे-पुढे होऊ शकतो किंवा वाचायचा राहून जाऊ शकतो. संगणकाला तर फक्त शब्दच कळू शकतो. सॉफ्टवेअरला संदर्भ कळणे तर जवळजवळ अशक्यच दिसते. म्हणजे गुगल भाषांतरातही यामुळे चुका होतील. मराठीला बोली भाषा म्हणून काहीच धोका नाही पण जर इतर भाषांप्रमाणे भविष्यात ज्ञानभाषा म्हणून प्रगती करायची असेल तर शब्दांची संपत्ती जपावी व वाढवावी लागेल. त्यासाठी प्रत्येक शब्दाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करावे लागेल. हे नियम कमी अधिक प्रमाणात असे काम करत आहेत. त्यात बदल करायचा झाला तर फार काळजीपूर्वक केला पाहिजे असे मला वाटते.

१६ सप्टेंबर, २०१२

कारण "त्यां" ना तसंच हवं आहे म्हणून!

मनोगताचा मी अगदी पहिल्यापासूनचा मेंबर आहे. आणि मनोगताच्या अनेक चढ उतारांचा साक्षीदार देखील.

http://www.manogat.com/node/23447

मला "असे का? " या चर्चेत भाग घ्यायचा होता पण माझे म्हणणे सविस्तर व प्रशासकांच्या अनुमतीशिवाय प्रसिद्ध व्हावे म्हणून या ब्लॉगवर. असं का व्हावं याला अनेक कारणं आहेत.

१) प्रशाकीय हस्तक्षेपः यावर अनेकांनी प्रतिसादातून लिहिल्यामुळे अधिक लिहत नाही.

२) विदागाराला झालेला अपघातः मनोगतचा डेटाबेस कोसळला तेव्हा मी मनोगतावरच काहीतरी वाचत होतो. म्हणजे मी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष साक्षीदार. एकादे संकेतस्थळ असे अपघातग्रस्त होणे ही त्याच्या यशाची पहिली पायरी असते. ट्विटरला देखील अशा अपघाताचा सामना करावा लागला होता. पण मनोगत त्यातून सावरलेच नाही.

३) ओपन सोर्सला विरोधः मनोगत ड्रुपल या प्रणालीवर आधारीत असले तरी त्याच्या सोर्स कोडमध्ये बरेच बदल केले गेले आहेत. नवीन मॉड्यूल लिहीली गेली. ती कधीच बाहेर आली नाहीत. शुद्धलेखनाचे तंत्र API द्वारे इतरांना उपलब्ध करून देता आले असते. फुकट किंवा विकत कशाही प्रकारे तंत्रज्ञान शेअर झाले नाही. मी फक्त RSS फीड वाचतो. बहुतेक सर्व साईट्स अशा प्रकारे आपले लेख फीडमध्ये उपलब्ध करून देतात. मनोगतचा फीड पहिल्या काही महिन्यांनंतर गायब झाला. RSS फीडमुळे लेख चोरीला जातात असे कारण पुढे करणे हास्यास्पद आहे. मनोगताच्या लाखोपट अधिक व्हॅल्यू असलेले विकिपीडिया / स्टेक ओव्हरफ्लो सारख्या साईट्स API, RSS फीड एवढ्यावर न थांबता आपलं पूर्ण विदागार सर्वांसाठी उपलब्ध करून देतात हे पाहिल्यावर मला मनोगत एखाद्या हट्टी खडूस म्हातार्‍यासारखे वाटायला लागले.

मनोगताची अशी अवस्था का झाली असा प्रश्न विचारण्यापेक्षा मनोगताची अशी अवस्था (प्रशासकांनी) का केली? असा प्रश्न जास्त संयुक्तिक होईल आणि त्याचे उत्तर उघड आहे. प्रशासकांना एकहाती सांभाळता येईल इतकेच विदागार वाढायला हवे आहे. लोकांनी इथे फार काही लिहू / वाचू नये. महिन्यातून एखादी चक्कर मारावी अशी त्यांचीच अपेक्षा असल्याने मी सध्या तीच पुरी करतो आहे!