२३ डिसेंबर, २०११

ब्लॉग म्हणजे काय?

मराठी ब्लॉगजगाशी माझी ओ़ळख ही तशी अपघातानेच झाली. झालं काय की मी मराठी स्पेलचेक प्रोजेक्टमध्ये लक्ष घालायचं ठरवलं. त्यासाठी शब्दांचा जोगवा मागत फिरताना ब्लॉग वाचनाची आवड निर्माण झाली. मग स्पेल चेकचे काम राहिले बाजूला आणि ब्लॉगवाचनातच खूपसा वेळ जाऊ लागला. आता त्यात हवशे, नवशे, गवशे सर्वच असल्यामुळे दर्जेदार लिखाण वेगळं काढण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यासाठी ब्लॉग फॉलो करणे किंवा ते गुगल रीडरमध्ये जमा करणे असे सारे काही करून पाहिले. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ब्लॉगना पारितोषिके मिळालेली पाहिली. काही ब्लॉगर तर पेटल्यासारखे इतके लिहितात की आपल्याला वाचायला वेळ पुरत नाही, यांना लिहायला वेळ मिळतो कसा असा प्रश्न पडावा. त्यामुळे दर्जेदार ब्लॉगची यादी नव्हे तर त्यातील सर्वोत्क्रूष्ट ब्लॉगपोस्टची यादी करण्याच्या कल्पनेची आयडिया डोक्यात आली. तर असे हे माझे हैंडपिक्ड सर्वोत्तम ब्लॉगपोस्टस...
_____

ब्लॉगची लांबी, रुंदी किती असावी? ब्लॉगचा विषय काय असतो? ब्लॉगमध्ये स्वतःचा उल्लेख किती व कसा असावा? ब्लॉगचा शेवट कसा व्हावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे गुरुदत्त यांच्या "माझं चर्‍हाट" या ब्लॉगवरील खालील पोस्ट!

http://chimanya.blogspot.com/2010/07/blog-post.html

वर दिलेला ब्लॉग हा पर्फेक्ट ब्लॉग म्हणता येईल. पण प्रत्येक ब्लॉग हा आदर्श ब्लॉग म्हणून लिहावा असे नाही. ब्लॉगचा मूळ उद्देश व्यक्तिगत अभिव्यक्ती हा आहे.
http://karviharsamarthyane.blogspot.com/2009/11/blog-post.html
मुक्तपीठ म्हणा हवं तर! वर दिलेल्या "कर विहार सामर्थ्याने" या ब्लॉगवरील आपला अनुभव लेखिकेने शेकडो लोकांबरोबर शेअर केला आहे. असं अनुभव देवघेवीचे स्वस्त व्यासपीठ पूर्वी नव्हते. अर्थात आपण ते कसे वापरतो यावर बरंच काही अवलंबून आहे.
_____

मराठी माणसाचे अनुभव विश्व विस्तारत आहे. त्याचे स्पष्ट प्रतिबिंब फक्त ब्लॉगच्या माध्यमातून दिसते. पारंपारिक प्रसारमाध्यमे यात साफ तोकडी पडतात. ब्लॉगर आपल्याला त्याचे जगभरातले अनुभव वन - ऑन - वन संपादकांच्या कात्रीचा स्पर्श न होता सांगू शकतो, अगदी कोणतीही भीडभाड न बाळगता. उदाहरण म्हणून जपान मधील भूकंप व त्सुनामी यात सापडलेले ब्लॉगर नितीन पोतदारांचा स्वानुभव "टोकियोतील ते चार तास..." इथे वाचता येईल...
http://www.myniti.com/2011/03/tweet_18.html

मुंबई हल्ल्याचा आखों देखा हाल येथे वाचता येईल.
"त्या" रात्रीचा थरार ... मी अनुभवलेला !!!
http://www.maayboli.com/node/12250

वर दिलेली लिंक सापडत नव्हती. गुगुलमध्ये खाली दिलेला सर्च दिल्यावर तासाभराने सापडली!
सीएसटी स्टेशन अनुभव site:maayboli.com

गांबारोऽ निप्पोन! अशा शीर्षकाचा लेख मायबोलीच्या दिवाळी अंकातही वाचायला मिळतो.
http://vishesh.maayboli.com/node/955

मायबोलीवरील लेखन रूढ अर्थाने ब्लॉगर्सचे लिखाण म्हणता येणार नाही पण अपवाद म्हणून वरील दोन लेख दिले आहेत. म्हटलं तर ब्लॉगर्स नाहीतर सोशल साईट नेटवर्कींगवरचे (पडीक) म्हणजे मायबोलीकर!
_____

उन्हाळ्याच्या सुट्टीतले अनुभव इतक्या चविष्टपणे लिहीता येतात यावर माझा तरी खालील ब्लॉग वाचल्याशिवाय विश्वास बसला नसता...

http://unhalyachisutti.blogspot.com/2009/11/blog-post_14.html

सई केसकर लिहीत असलेली "उन्हाळ्याची सुट्टी" संपली असली तरी त्याचा गाज फार काळ वाचकांचा ठाव घेत राहील.
_____
कोणताही दूषित पूर्वग्रह मनात राहू न देता ज्या तटस्थतेने ऍडी जोशी यांनी आपले लहानपणाचे,विशेषतः शिक्षकांच्या व वडिलांच्या मार देण्याचे अनुभव मांडले आहेत ते वाचल्यावर खरच "आदित्याय नमः" म्हणावं लागतं आणि त्यातीलच "बंड्याची शाळा - धडा दुसरा" सर्वोत्तम ब्लॉग पोस्टच्या माझ्या यादीत येतो.

http://adijoshi.blogspot.com/2009/03/blog-post_03.html
_____

फाटक काका आपल्या जुन्या वहीतला एखादा निबंद ब्लॉगवर पोस्ट करतात तेंव्हा तो आपोआप माझ्या सर्वोत्तम ब्लॉगपोस्टच्या यादीत जातो. उदा. आयशॉटच्या वहीतून - आम्ची सहल !

http://rahulphatak.blogspot.com/2007/11/blog-post_21.html

_____

योगेश यांच्या मनमौजी या ब्लॉगवरील "येळकोट..येळकोट...जय मल्हार!!!" या पोस्टमध्ये देवाधर्माच्या नावाखाली तिर्थस्थानी कशी अक्शरशः लूट चालते ते वाचून एक वेगळा अँगल बघायला मिळतो. सर्वोत्तम ब्लॉगपोस्ट मध्ये त्याचा समावेश अपरिहार्य आहे.

http://manmaujee.blogspot.com/2010/08/blog-post.html
_____

राम जगताप यांच्या भेजाफ्राय या ब्लॉगवर व्यक्तिचित्रे कशी लिहावीत याची शाळाच निघाल्यासारखी वाटते. पण त्यांचा "काय लाड करू तुझे?" हा पोस्ट सर्वोत्तम ब्लॉगपोस्टच्या यादीत अगदी वर!
http://ramjagtap.blogspot.com/2011/02/blog-post.html
_____

"चुकामूक" हे पोस्ट "नस्ती उठाठेव" या ब्लॉगवरील. सर्वोत्तम मध्ये यायला या ब्लॉगवर इतरही बरेच काही आहे. पण मला थोडे वेगळे, गूढ अर्थाचा शेवट असणारे पोस्ट काही वेळा ब्लॉगवर वाचायला आवडतात. म्हणून याची निवड...
http://abhipendharkar.blogspot.com/2010/01/blog-post.html

_____

निसर्ग विरुद्ध माणूस विरुद्ध विकास असा एक त्रिकोणी पेच सध्या हातघाईवर येऊ पाहात आहे. "निसर्गवार्ता" ब्लॉगवरील "माळढोक संवर्धनातील गुंतागुंत" हे पोस्ट नक्कीच सर्वोत्तम मध्ये घेण्यासारखे.

http://nisargvarta.blogspot.com/2011/05/conservation-of-great-indian-bustard.html
_____

"किस्सा खुर्सी का!" हा टॅलीनामा वरील ब्लॉगपोस्ट सरकारी म्हणजेच मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीतला आलेला अनुभव वैश्विक सत्य सांगतो! सर्वोत्तम मध्ये टाकायला काहीच अडचण नसावी.

http://ejmarathe.blogspot.com/2009/09/blog-post_20.html
_____

"चवळी सूप" हे पोस्ट म्हणजे रेसिपी नव्हे तर चवळी पेरून त्याच्या शेंगा काढून मग स्वतःपुरते केलेले सूप आहे. हे असे सूप बनविणारी लेखिकाच "झाले मोकळे आकाश" म्हणू शकते!
http://mokale-aakash.blogspot.com/2010/11/blog-post.html
_____

कधी मधी आपल्या दुचाकीवर लिफ्ट देणारा आपला तो अनुभव जास्तीत जास्त किती साहित्यिक पद्धतीने सांगू शकतो? "निशाणी आडवा अंगठा" या ब्लॉगपोस्टवरील अनुभव वाचल्यावर "काय सांगता राव?" असे म्हणावेसे वाटले तर नवल नाही!

http://www.kaaysangurao.com/2011/03/blog-post_27.html

_____

"राशोमॉन - ज्याचं त्याचं सत्य!" यासारख्या सशक्त ब्लॉगपोस्टमधून "आपला सिनेमास्कोप" नव्या जुन्या तसेच मराठीसह जागतिक चित्रपटांची ओळख करून देत आहे. नक्कीच नोंदघेण्याजोगे!

http://apalacinemascope.blogspot.com/2011/10/blog-post_31.html

_____

"बोले तो तू करता क्या है मामू?" या प्रश्नाचे उत्तर "मै मराठी भाषा में ब्लॉग लिखता हूं" असं दिलं तर समोरच्याची काय प्रतिक्रिया येईल ते मला सांगता येत नाही कदाचित "Random Thoughts" चा लेखक सांगू शकतो...

http://rbk137.blogspot.com/2011/11/blog-post_18.html


मुक्तछंदातला "एका लग्नाची...किंबहुना....एका लग्नातली गोष्ट!" या ब्लॉगमध्ये लेखक स्वतःच्या लग्नाची गोष्ट सांगतो थोड्या विनोदी पद्धतीने. सर्वोत्तम नसला तरी प्रॉमिसिंग वाटणारे हे पोस्ट...

http://asudhanwam.blogspot.com/2011/08/blog-post.html
_____

"याला नशीब घडवणं म्हणतात!" हे "मनस्पंदने" वरील ब्लॉगपोस्ट स्वानुभव व साहित्यिक मूल्य असलेला ब्लॉग कसा दिसतो ते दाखवते...

http://manspandane.blogspot.com/2011/10/blog-post.html

"कॉलेजकाळातली ती घटना" काळीज कुरतडत असेल तर "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!" असं म्हणत ब्लॉगवर लिहावं. ह्रुदयातली कळ थोडीतरी शांत होईल! सर्वोत्तम नसला तरी ब्लॉगचा आणखी एक पैलू दाखवणारी ही पोस्ट...

http://arbhataanichillar.blogspot.com/2011/05/blog-post_29.html


_____

संदीप खरेच्या कवितेचे मनाला भावेल तसे रसग्रहण "उगाच काय ग छोट्या-मोठ्या गोष्टींवरून इतके वाद?" या पोस्टवर वाचण्यासारखे...
http://anaghaapte.blogspot.com/2011/08/blog-post_30.html
_____

"गंगासागर एक बार" या सचित्र ब्लॉगपोस्टमध्ये प्रवासवर्णनाबरोबरच धर्माचे एक वर्तुळ पूर्ण होतं...
http://suchalejase.blogspot.com/2011/11/blog-post_27.html

_____

अनुक्षरे ब्लॉगवरील "खेळ मांडला" या ब्लॉगपोस्टद्वारे एका आईच्या जिवाची आपल्या लेकरासाठी होणारी तगमग वाचता येते. नक्कीच सर्वोत्तम मध्ये!

http://anukshre.wordpress.com/2010/01/06/
_____

"स्वतःच्या शोधात मी.." अशा ब्लॉगवर केसरबाईंचे व्यक्तिचित्र वाचायला मिळते. नव्या पिढीला जुन्या सोन्याची तोंडओळख ब्लॉग या सशक्त माध्यमाशिवाय होणे मला तरी अशक्य वाटते.
http://komalrishabh.blogspot.com/2011/02/blog-post_4585.html
_____

"बब्याचो बंदोबस्त" ही टिपीकल कोकणी पोस्ट "माझ्या गजाल्या"शिवाय कोणत्या ब्लॉगवर वाचायला मिळणार? नक्कीच सर्वोत्तममध्ये...

http://dimag-kharab.blogspot.com/2011/07/blog-post.html

_____

http://mylifemyreviews.blogspot.com/2011/10/blog-post_2652.html

http://jchitale.blogspot.com/2011/03/blog-post.html

http://abdashabda.blogspot.com/2010/07/blog-post.html

http://majhiyamana.blogspot.com/2011/11/blog-post.html

http://ashutoshbapat.blogspot.in/2010/02/blog-post.html

गवई कितीही मोठा असला तरी त्याच्या सर्वच मैफिली जमतातच असे नाही. पण काही मैफिली मात्र रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. तसे ब्लॉगर्सचेही आहे. एखादी ब्लॉगपोस्ट अशी काही जमते की त्यावर बोलण्या/ लिहीण्यासारखे काही राहातच नाही. मला भावलेल्या अशा पोस्टांची एक झलक.
१) जातीयवादी लिखाणाचा विचारच केलेला नाही.
२) कविता आणि पाकक्रिया नाहीत कारण मला त्यातील काही कळत नाही.
३) प्रथितयश ब्लॉगर्सचे लिखाण घेतलेले नाही.

२३ एप्रिल, २०११

अव्यय, प्रत्यय, उपसर्ग इत्यादी



खाली दिलेल्या टेबलमध्ये सर्व प्रकारचे अव्यय, उपसर्ग वगैरे जमा केले. आता एकाच क्वेरीने विविध प्रकारचे शब्द चुकीचे/ बरोबर शब्द शोधणे शक्य होईल असे दिसते. उदा मला जर शब्दयोगी अव्यय लावलेले बहुतांश शब्द पाहायचे असतील तर ते सहज मिळू शकतील.

करिता हा शब्दयोगी अव्यय आहे, करी हा प्रत्यय आहे तर कु हा उपसर्ग आहे. म्हणून त्यांना प्रत्येकी १,२ व ३ असे नंबर मिळाले. असे सर्व अव्यय, प्रत्यय आणि उपसर्ग एका जागी आणून त्याचा उपयोग करून अशुद्ध शब्द मिळतात का ते पाहायचे आहे.

add_type
(1, 1, 'शब्दयोगी अव्यय'),
(2, 1, 'प्रत्यय'),
(3, 2, 'उपसर्ग')

add_word
(1, 'करिता', 'करीता', 'याकरिता'),
(2, 'करी', 'करि', 'गावकरी'),
(3, 'कु', 'कू', 'कुसंगती'),
(2, 'करू', 'करु', 'यात्रेकरू'),
(1, 'करून', 'करुन', 'येणेकरून'),
(1, 'करवी', 'करवि', 'याकरवी'),
(2, 'कीय', 'किय', 'परकीय'),

अधिक तांत्रिक माहिती या दुव्यावर उपलब्ध आहे.

http://code.google.com/p/hunspell-marathi-dictionary/wiki/avya_pratya_upsarg

याचा नक्की फायदा कसा, कोणाला होईल ते सांगता येत नाही. पण भाषेचे अभ्यासक याचा उपयोग करून घेऊ शकतील असे वाटते.
 _____
अधिक स्पष्टीकरण ऑगस्ट २५, २०१२ 
याचा उपयोग खाली दिलेले पर्याय सुधारण्यासाठी होऊ शकेल असे मला वाटते.



घोड्याप्रत , घोड्याप्रति घोड्याप्रमाणे आणि घोड्याप्रित्यर्थ असे चार शब्द दिसणे अपेक्षित आहे. त्याऐवजी घोड्यापर, घोद्याप्र घोद्यापर आणि घोदयाप्र असे चार ऑप्शन्स दिसत आहेत. हे चार शब्द पूर्णपणे कुचकामी आहेत कारण एकतर ते अशुद्ध शब्द आहेत आणि त्या शब्दांवरून एखादा शुद्ध शब्द बनू शकेल अशी शक्यता नाही. लेखकाने "घोड्याप्र" इतके टाईप केल्यावर दिसणार्‍या पर्यायांमध्ये डेटाबेसमधील शब्दांना प्राधान्य मिळाले पाहिजे.
त्यासाठी डेटाबेसमध्ये घोडा या शब्दाबरोबर त्यापासून बनणारे सर्व शब्द जमा करावे लागतील किंवा "घोड्या" असे रूप एकीकडे आणि त्याला लागू शकणारे अव्यय, उपसर्ग दुसर्‍या टेबलमध्ये अशी वर दाखविलेली रचना करता येईल.

१२ एप्रिल, २०११

वर्ल्ड कपच्या निमित्ताने...

ही चर्चा उद्बोधक आहे, आणि माझा प्रतिसाद त्यातील एका प्रतिसादाला उद्देशून आहे. तो विषयाशी संबंधित नाही. पुष्कळशा पसरटपणे माझे म्हणणे मांडायचे होते म्हणून उपक्रमावर न लिहीता ब्लॉगवर लिहीत आहे.

http://mr.upakram.org/node/3231#comment-55603

रोझा पार्कने जेव्हा स्वतः उठून बसमधील आपली जागा गोर्‍याला देण्यास नकार दिला तेंव्हा बहुतांशी लोकांनी "आहे हे असे आहे, इथे रहायचे असेल तर रहा. नाहीतर आम्ही काही निमंत्रण दिलेले नाही अमेरिकेचे" अशा अर्थाची काहीतरी बडबड केलीच.

http://en.wikipedia.org/wiki/Rosa_Parks

बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला तेंव्हाही लोकांनी विविध दाखले, परंपरा याचा उहापोह केला होता. पण शेवटी सत्य, समानता आणि विकास या त्रयीकडे जायचे की परंपरा आणि आगम प्रमाणाचा अतिरेक करायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते.

बर्‍याचदा एखादी गोष्ट इतकी आंगवळणी पडलेली असते की तिचे अस्तित्वच जाणवत नाही. अन्याय, अतिरेक हा देखील असाच सवयीचा होऊ शकतो. आपल्या अंगाला येणार्‍या घामट वासाची जाणीव जशी घरच्यांनी किंवा जवळच्या व्यक्तिंनी सांगितल्याशिवाय लक्षात येत नाही, सवयीचा भाग झाल्यामुळे. तशा खूप गोष्टी आपल्याला आपोआप दिसेनाशा होतात.

सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिकवायला सुरूवात केली तेव्हा समाजाची प्रतिक्रिया काय होती? सती जाणे, विधवांचे केशवपन हे सर्व स्टँडर्ड समजून पाळले जात होते. ज्यांना ते मान्य नसेल अशांना हिमालयात निघून जायचा सल्ला दिला जायचा. (आणि काहींनी तो पाळलाही!)

ज्या पू. ल. देशपांड्यांचे उदाहरण आपण दिले आहे, त्यांनी देखील आणिबाणीला विरोध केला होता. कॉग्रेसला पाडण्यासाठी ठिकठिकाणी प्रचार केला होता. "विदूषक" अशी हेटाळणी त्यांच्या वाट्याला आली आणि निवडणुकीनंतर सत्ता हे आपले ध्येय नाही असे जाहीर करत "परत विदूषकाच्या भुमिके"त असा लेख लिहीता झाले.

अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला पुलंना सहन झाला नाही, ते आपल्या परीने लढले. चंद्रशेखर यांना ध्वनिप्रदुषणाचा प्रश्न महत्त्वाचा वाटला, त्यांनी तो संयमित शब्दात मांडला. कुणाच्याही भावना न दुखावता आपली तक्रार समाजापुढे ठेवली, कारण कदाचित बहुमताविरुद्ध खूप मोठा संघर्ष करणे (कोर्टात/ पोलिसात जाणे वगैरे) त्यांना शक्य नसेल किंवा अन्य काही कारण असेल.

गोठ्यात राहून बैलाच्या मुताची घाण येते अशी तक्रार करणारी माणसे मला फार महत्त्वाची वाटतात. कारण त्याचा अर्थ त्यांना अजुन त्याची सवय झालेली नाही. सुवास आणि दुर्गंध यातील फरक ओळखण्याइतपत त्यांची घ्राणेंद्रिये काम करत आहेत आणि "घाण येतेय" अशी तक्रार करण्याइतपत तरी धैर्य त्यांच्यात शिल्लक आहे.

माणसाचं कंडिशनींग एकदा झालं की तो पोपटासारखा ऐकलेले बोलू लागतो. वाचलेले घडाघडा म्हणून दाखवतो, त्यातून फार तर त्याची बुद्धीमत्ता दिसते. त्याचा अर्थ तो बरोबर बोलत आहे असा होत नाही. आगम प्रमाणाचा अतिरेक हा प्रत्यक्ष प्रमाणाच्या अतिरेकापेक्षा जास्त घातक आहे. व्यभिचारी स्त्रीला दगडाने ठेचून मारणे यात मुस्लीम देशांना काही वावगं वाटत नाही. हे आगम प्रमाणाच्या अतिरेकाचे एक उदाहरण आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Stoning

जगातील कोणत्याही देशात अशी शिक्षा (कायद्याने) दिली जात नाही. पण "शरियत कायदा" या एका शब्दाने सर्व समीकरणे बदलून जातात आणि अचानक त्यातील क्रौर्य, निर्दयता दिसेनाशी होते.

ज्ञानेश्वरांनी दाखविलेला विवेकाचा मार्ग आणि पातंजलिने ठेवलेला संयमाचा आदर्श यापासून न ढळण्यातच खरी "समजदारी" है!

२७ मार्च, २०११

इतिहासाचे ओझे

इतिहास मग तो १ महिन्यापूर्वीचा असो किंवा ५ हजार वर्षांचा. तो आपल्याला काही ना काही शिकवत असतो. ही शिकवणी घ्यायची आणि भविष्याला भिडायचं असं अभिप्रेत असते, त्या इतिहासाचे कलेवर राजा विक्रमादित्याप्रमाणे आपल्या पाठीवर घेऊन नको तिकडे जायचे नसते. मला काय म्हणायचे आहे ते उदाहरणाने स्पष्ट करतो.

हरियाणात असे एक गाव आहे जिथे आल्यावर म्हणतात की श्रावण बाळाची मती फिरली आणि त्याने आईवडिलांकडे काशी यात्रेला घेऊन जायचे पैसे मागितले. तेव्हापासून "सो कॉल्ड" शाप हा गाव भोगतो आहे आणि कोणताही बुवा बाबा तिथे जाऊन बायकापोरांना ही गोष्ट सांगून रडवतो आणि जमेल तेवढी माया जमा करून जातो.

ही गोष्ट खरी की खोटी कोणाला माहीत? वादापुरती खरी मानली तरी तो त्या मातीचा दोष कसा मानता येईल? इमोशनल ब्लॉकमेलींगची एक से एक उदाहरणे हिंदू धर्मात मौजूद आहेत आणि त्याविषयी ब्र काढावासा कोणाला वाटत नाही. भावना दुखावणे हा फार हळवा प्रकार असतो आणि त्याचे परिणाम गंभीर स्वरूपाचे होऊ शकतात याची सर्वांनाच कल्पना असते.
_____

भटक्या जातीच्या हालाचे वर्णन करणारे एक पुस्तक मी २५ वर्षांपूर्वी वाचले होते. आता नाव विसरलो पण त्यातील मजकूर नाही. यात त्या तांड्याचा मुखीया लेखकाला सरकारी मदत नाकारण्याचे कारण सांगताना सांगतो "श्रीकृष्णाने आम्हाला तुम्ही भटकत राहा कुठेही स्थिर होऊ नका असा आदेश दिला आहे, तो मोडणे आम्हाला शक्य नाही."

आता यात खर्‍या खोट्याची शहानिशा कशी करणार? समजा खरे असेल, तरी तो आदेश आपद्धर्म म्हणून असेल. कृष्णाने स्वतःच्या जीवनात अशा काही गोष्टी (उदा. मथुरेतून पळून जाणे) अपवाद म्हणून केल्या होत्याच. आज तो कायदा समजून वागणे कितपत शहाणपणाचे आहे?

महाराष्ट्रातील एका अग्रगण्य मंदीरात लहान मुलींचे खुशाल कृष्णाशी लग्न लावून दिले जाते. मुलांचेही लावून दिले जाते. देवदासी फक्त मुलीच नाही, मुलेही बनतात म्हणे. आणि त्यांच्या जटा कापून टाकायला त्यांच्यातलाच एखादा पुढे आला तर तो होतो जातीबाहेर.

जाती-बहिष्कृत: जातीवरून आठवले. हिंदू धर्मातील विचारवंत, ख्रिश्चन धर्माशी तुलना करताना सांगतात, त्यांच्यात वेगळा विचार करणार्‍याला जाळून मारण्यात आलं, आमच्यात असलं काही नाही झालं. झालं ना सिद्ध? अहो कुठलं काय? आमच्याकडे जाळून मारण्यापेक्षा जास्त वाईट हत्यार होतं ना! जातीतून उठवणे. ज्ञानेश्वरांसारख्या सिद्ध पुरुषाला आत्महत्येकडे प्रवृत्त करणारा हा जातबाहेर प्रकार काय होता हे इतिहासाच्या अभ्यासातून कळते.

इतिहासाच्या अभ्यासातून मी खूप शिकलो. पण ते ओझे होईल असे वाटले की मी पुढे जात नाही. अभ्यास म्हणूनही नाही. कदाचित वयाचा परिणाम असेल. इतिहासाबरोबरच थकलेले शरीरही खूप काही शिकवते. नाही का?

२५ मार्च, २०११

मराठी हिंदीतील फरक

https://addons.mozilla.org/af/firefox/addon/hindi-spell-checker/

हिंदी भाषेसाठी बनलेला फायरफॉक्स स्पेलचेकर नुकताच माझ्या पाहण्यात आला. मी तो अर्थात लगेच वापरून पाहिला. त्यात मराठी / हिंदी भाषेतील एक मुलभूत फरक माझ्या लक्षात आला. टेक्निकल अंगाने व भाषाशास्त्राच्या दृष्टीनेही त्यात काही तथ्य असावे.
मराठी मध्ये जसे स, ला, ते, चा, ची, चे असे प्रत्यय लागतात तसे हिंदी भाषेत लागत नाहीत. त्यामुळे त्या भाषेतील स्पेलचेकरमध्ये केवळ पंधरा हजार शब्द असून तो स्पेल चेकर चांगला चालतो आहे. उदा..

भाषा की - भाषेची
भाषा का - भाषेचा
भाषा के - भाषेचे

मराठीत असे एका शब्दापासून अनेक शब्द बनतात तसे "तिकडे" बनत नाहीत. इकडे प्रत्येक शब्द स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखतो, पण हिंदी / इंग्रजीत असे होत नाही बहुतेक!

for language
to language

यात लैंग्वेज हा शब्द बदलत नाही. तर फॉर, टू असे प्रत्यय बदलतात. यामुळे त्या दोन भाषा जवळच्या वाटतात तशी मराठीला इंग्रजी तांत्रिक द्रष्ट्या जवळची वाटत नाही.

०६ मार्च, २०११

काळ आला आणि वेळही

सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते वंदिनस्ताः कथाः
सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ॥

ती सुंदर नगरी, तो ताकदवान राजा, त्याचे विश्वासू सरदार, त्याच्या आश्रयाने राहणारी विद्वान लोकांची सभा , चंद्राप्रमाणे सुंदर चेहऱ्याच्या स्त्रिया , उदंड असा राजपुत्रांचा समूह , स्तुती गाणारे देशी/ विदेशी भाट आणि त्या भाटांनी गायलेल्या त्या उत्तमोत्तम स्तुती हे सर्व गेले कुठे? वेळ बदलली. सद्दी संपली. वर्तमानाला इतिहासाच्या पानात ढकलून सतत पुढे जाणार्‍या काळाला नमस्कार करण्यावाचून आपल्या हातात काय आहे? सध्या जगात जे चालू आहे त्याला काळाचा आणखी एक महिमा असेच म्हणता येईल.