विकी नक्की काय आहे या विषयी बऱ्याच लोकांचा गैरसमज झालेला दिसतो. उदाहरण द्यायचे झाले तर मराठी विकीवरील सदस्य_चर्चा:ज हे पान पाहू शकता. हे सदस्य अत्यंत अनुभवी असून त्यांनी एका लेखातील काही विशिष्ट वर्ग काढून टाकले. संदेश हिवाळे यांनी स्पष्टीकरण मागितले की "या लेखातून तुम्ही कोणतेही स्पष्टीकरण न देता "वर्ग:दलित लेखक, वर्ग:दलित कार्यकर्ते, वर्ग:भारतीय बौद्ध, वर्ग:आंबेडकरवादी" हे चार वर्ग हटवले; हे चारही वर्ग मराठी विकिपीडिया खेरीज इंग्लिश विकिपीडियासह अनेक विकिपीडियांमध्येही उपलब्ध आहेत." त्यावर यांनी सांगितले की... "विकीवरच काय पण इतरत्र कुठेही कुठलाही जातवादी उल्लेख असू नये या मताचा मी आहे. तसे उल्लेख करत राहिलो तर जातिअंताच्या चळवळीचे काय भविष्य असेल?" विकिपीडिया हे जातिअंताच्या चळवळीचे साधन आहे असे यांना कुणी सांगितले?
मराठी विकीवर मुखपृष्ठावर रामदास स्वामींनी केलेला उपदेश विकीचे अधिकृत धोरण असल्यासारखे वापरले आहे. “आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन.” यातील पहिला अर्धा भाग विकीला चपखल लागू पडतो. पण नंतरचा अर्धा भाग विकीच्या तत्त्वात अजिबात बसत नाही. “शहाणे करोनी सोडावे” यात जो जबरदस्तीचा भाग आहे तो विकीला कधीच मान्य नव्हता. विकिपीडिया आपल्यासमोर फक्त काही माहिती ठेवते त्याच्या सत्यासत्यतेविषयी किंवा निष्पक्षतेविषयी कसलीही जबाबदारी घेत नाही. आई जसे औषध घेतल्याशिवाय मुलाला सोडत नाही तसे काही विकी करत नाही.
काही विचारवंत शासनावर दबाव आणण्यासाठी विकीचा वापर करावा असे लेख लिहून जाहीरपणे सांगतात. उद्या नक्षलवादी कार्यकर्तेदेखील विकीचा वापर आपल्या संघटनेच्या प्रचारासाठी करतील, काय सांगावे?