काही शब्दांना "स” आणि "त” हे विभक्ती प्रत्यय लागत नाहीत. उदा आइसक्रीम, फर्निचर कोशात अशा शब्दांपुढे (-स, -त X) अशी नोंद असते. असे सर्व शब्द वेगळे काढावे लागतील.
_____
स्वभाषेत टंकलेखन साहाय्य
काही शब्दांना "स” आणि "त” हे विभक्ती प्रत्यय लागत नाहीत. उदा आइसक्रीम, फर्निचर कोशात अशा शब्दांपुढे (-स, -त X) अशी नोंद असते. असे सर्व शब्द वेगळे काढावे लागतील.
_____
मराठी विकीवरील एका सदस्याने "निज़ाम" शब्द लिहिताना नुक्ता वापरला, चर्चा पानावरील सर्व मजकूर काढून टाकला अशा काही कारणास्तव विकीच्या मालकांनी त्यांना समज देऊन त्यांचे लिखाण बंद पाडले. त्या निमित्ताने...
या सदस्याने आपल्या चर्चा पानावरील सर्व मजकूर काढून टाकला यात गहजब करण्यासारखे काही नाही. त्यांनी इतर कुठेही असे केलेले नाही. आपले सदस्य पान आणि सदस्य पानाचे चर्चा पान म्हणजे आपली वैयक्तिक मालमत्ता आहे असा बहुधा त्यांचा समज झाला असावा. तो चुकीचा आहे हे कालांतराने त्यांच्या आपोआप लक्षात आले असते. हा उत्पात नव्हे. उत्पात याचा अर्थ कधीही भरून न येणारे नुकसान. त्या अर्थाने "आकडे इंग्रजीत लिहणे” हा देखील उत्पात नाही. नवशिक्या सदस्यांकडून या व अशा अनेक चुका अपेक्षितच आहेत. त्यातून नवीन आणि जुने असे सर्व सदस्य शिकत जातात. मराठीतील आकडे देवनागरीत न लिहता इंग्रजी पद्धतीने लिहिले तर मराठीचे सुलभीकरण होईल असे एखाद्याला वाटू शकते. विकीच्या धोरणात ते बसत नसल्यास त्याला तसे सांगावे लागेल. सांगून न ऐकल्यास धोरण बदलता येईल का याची चर्चा करावी लागेल. धोरण बदलता येत नसल्यास बॉट लावून इंग्रजी आकडे मराठी करायला कितीसा वेळ लागणार आहे? इंग्रजी विकीवर कशी लगेच ऍक्शन घेतात तशी मराठी विकी घेऊ शकत नाही. आधीच तोळा मासा असलेली मराठी विकी अशाने मरणपंथाला लागेल.
एका पानावरील इतिहास बदलून असत्य इतिहास लिहिला असा दुसरा आरोप आहे. सत्य हे सापेक्ष असून बहुमत, सत्ता, संपत्ती, अधिकार याच्या जोरावर हवे तसे वाकवता येते. काही एक सुप्त हेतू मनात ठेवून जाणूनबुजून असत्य लेखन केले असे या बाबतीत तरी म्हणता येणार नाही. लिखाण करणाऱ्यांचे पूर्वग्रह त्यांच्या लिखाणात येणे अगदी साहजिक आहे. आणि म्हणूनच विकीवर "ऐडिट” बटण आहे! तुम्हाला खटकणारे पूर्वग्रह तुम्ही दुरुस्त करू शकता. "आम्हाला काय इतर दुसरे धंदे नाहीत का" असा प्रश्न पडला असेल तर पूर्वग्रहविरहित, बावनकशी सोन्यासारखे निखळ सत्य सांगणारा ब्रिटानिका एनसायक्लोपिडीया आहेच की! विकीला विसरा.
विकीवरील कोणतेही पान कधीच "संपूर्णपणे पूर्ण” होत नाही. कोणतेही पान कधीच "संपूर्णपणे नष्ट” होत नाही. तसेच ते कधीच "संपूर्णपणे सत्य” सांगत नाही. विकी ही कुणी सती-सावित्री असून, आतमध्ये शंकराच्या पूजेत मग्न आहे तेव्हा तिचे पावित्र्य आणि कौमार्य यांचे रक्षण करण्यासाठी हातात नंग्या तलवारी घेऊन दिवस-रात्र दरवाज्याबाहेर खडा पहारा दिला पाहिजे असे नाही. त्याचबरोबर विकी म्हणजे "मोकळे कुरण” असे समजणे देखील चुकीचे ठरेल. या दोन्ही मधील सुवर्णमध्य काढावा लागेल. जर एका बाजूला झुकावेच लागले तर मोकळ्या कुरणाच्या बाजूने झुकावे लागेल. कारण हा "मोकळेपणा” विकीच्या डी.एन.ए. मध्येच लिहिला आहे. ते काही व्यंग नाही. त्यातूनही तो जर दोष मानला तर तो विकीचा जन्मजात दोष म्हणावा लागेल. त्यावर काही उपाय नाही.