२५ मे, २०१०

असेही असते तर...

अनेक वेळा चावून चोथा झालेले विषय वारंवार चर्चेत आणून त्याचा आधार घेत सुतावरून स्वर्गात जाण्याचा प्रयत्न इंटर्नेटवर पडीक असलेली मंडळी करीत असतात. यातून काहीवेळा जातीय विखारही फुत्कारून घेतला जातो. उदाहरण द्यायचे तर या चर्चेचे देता येईल.

http://mr.upakram.org/node/2510

"वाल्मीकी रामायणातील स्त्रीजीवन" या विषयाशी फोटोसहित "सिक्स पॅक्स विश्वामित्र" आणि "एट(की टेन) पॅक्ड् भगवान परशुरामाचे पक्के युरोपियन वाटणारे कल्पनाचित्र" कसे काय संबंधित असू शकते? याचा अर्थ एकच आपला प्रतिसाद या विषयाशी संबंधित असो वा नसो आपल्या अन्ननलिकेत सतत घोळणारे गरळ कुठेतरी ओकून टाकले की माणसाला थोडे बरे वाटते. अर्थात इंटरनेटचा वापर अशा कारणांसाठीदेखील मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्याला काही हरकत असू नये.

माझाही खालील प्रतिसाद विषयाशी संबंधित नाही, तर एका प्रतिसादाशी संबंधित आहे - म्हणून मी ब्लॉगवर लिहित आहे.
_____

सहज शक्य असणार्‍या अनेक गोष्टी रामाने केलेल्या नाहीत ही गोष्ट लक्षात घेतली की रामाचे वेगळेपण जाणवायला हरकत नाही.
राज्यावर येण्यासाठी बापाचा, भावाचा काटा काढणार्‍या कथांनी जागतिक इतिहासाची पानेच्या पाने भरून गेलेली असताना सहज शक्य असताना राज्याभिषेकापासून दूर जाणारा राम मला तरी अपवादात्मकच वाटतो.

रावणाचे अंत्यसंस्कार करण्यास बिभिषणाने नकार दिला, तेंव्हा मेल्यावर वैर संपते असा विचार देणारा राम तेंव्हाच्याच नव्हे तर नंतर आलेल्या अनेक राजांपेक्षा वेगळा ठरतो.
मरणान्तानि वैराणि निवृतं नः प्रयोजनम् । कीयतामस्य संस्कारो ममापेष्य यथा तव ॥

लंकेतून परत येताना फक्त सीता आणि एअर लंकेचे एक फ्लाईट इतकेच रामाने आपल्याबरोबर आणले. त्यावेळचे त्याचे उद्गार निदान संस्कृत साहित्यात तरी अमर झाले आहेत.
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥

राम-सीतेबरोबर इतकी वर्षे वनात राहूनही मी केयूरे, कुंडले ओळखत नाही पण सीतेची पैंजण मात्र ओळखतो असे म्हणणारा लक्ष्मण तर काही वेळा रामापेक्षा मोठा वाटतो.
नाहं जानामि केयुरे नाहं जानामि कुण्डले । नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात् ॥

केवळ रामाचेच नव्हे तर लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सर्व भावंडांचे व त्यांच्या अर्धांगिनींचे चारित्र्य सोळा आणे शुद्ध होते असे बहुतेक ऐतिहासिक संसाधने सांगतात. 'तसला' आरोप रामावर कोणी केल्याचे माझ्यातरी वाचनात नाही. प्रस्थापित विचारांना उडवून लावण्याच्या सध्याच्या फैशनचा हा भाग असे असे समजून या आरोपाकडे दुर्लक्ष करणेच चांगले असे माझे वैयक्तिक मत आहे.