२४ ऑगस्ट, २०२४

मराठी स्पेलचेक अ‍ॅप (Google play store)

 शंतनू ओक यांच्या प्रयत्नातून साकार झालेले मराठी शुद्ध चिकीत्सक अ‍ॅप

अ‍ॅन्ड्रॉईडसाठी बनविलेले अ‍ॅप प्ले स्टोअरवरून "marathi spell check" या नावाने शोधून डाऊनलोड करता येते. यात मराठी बरोबरच संस्कृत स्पेल चेक आणि संस्कृत संधी / विग्रह देखील करून पाहता येतो. 

पार्श्वभूमी:

मॉड्युलर इन्फोटेक या कंपनीने अरूण फडके यांच्या सहकार्याने ७-८ वर्षांपूर्वीच असे एक अ‍ॅप विकसित केले होते. पण ते शुद्धलेखनाचे अ‍ॅप होते. त्यात तुम्ही एखादा शब्द टाईप करायला सुरुवात केली की त्या शब्दाने सुरू होणारे शब्द दिसू लागत. उदाहरणार्थ तुम्हाला माध्यमिक शब्दातील "मी" पहिली की दुसरी प्रश्न असेल तर तुम्ही "मा" असे टाईप करणे अपेक्षित असे. तसे केले की त्यावरून सुरू होणारे शब्द म्हणजे माधुर्य, माधवी, माध्यमिक दिसू लागत.  त्यावरून तो शब्द कसा लिहिला पाहीजे ते समजत असे.  थोडक्यात छापील मराठी भाषा कोश मोबाईलवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झाला होता. एका मर्यादित अर्थाने यशस्वी झालेले ते अ‍ॅप आता प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही.

इंग्रजी - मराठी डिक्शनरी (English Marathi Dictionary by Innovative Software)  हे अ‍ॅप लाखो लोकांपर्यंत पोहोचले आहे. त्यात "test" हा इंग्रजी शब्द टाईप केला की चाचणी, कसोटी आणि परीक्षा असे अर्थ दिसतात.  तर "माध्यमिक" असा शब्द टाईप केला तर seminary, secondary असे इंग्रजी शब्द मिळतात.  पण "माध्यमीक" हा शब्द चुकीचा असून तो माध्यमिक असा पाहिजे असे खात्रीपूर्वक सांगणारे एकही अ‍ॅप नाही. गूगल की-बोर्ड किंवा देश मराठी कीबोर्ड या सारखे की-बोर्ड जर इन्स्टॉल असतील तर त्यात टाईप करतानाच योग्य तो शब्द सुचविला जातो हे बरोबर आहे पण तो शब्द शुद्धलेखनाच्या नियमानुसार शुद्धच असेल अशी काही शाश्वती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर खूप मोठा मजकूर स्पेल चेक करायचा असेल तर एक एक शब्द गूगल की-बोर्डच्या साहाय्याने टाईप करत बसावा लागेल. जर हाताने कागदावर लिहिलेला मजकूर असेल किंवा तुमच्याकडे छापील मजकुराचा फोटो असेल तर त्यातील लिखाण गूगल लेन्सच्या माध्यमातून युनिकोडमध्ये बदलता येते.  आणि मग अशा कॉपी-पेस्ट केलेल्या मजकुरासाठी मराठी स्पेल चेक या अ‍ॅपमधील शुद्धीचिकीत्सक वापरता येतो.

एखाद - दुसरा शब्द बरोबर आहे का किंवा तो शब्द नेमका कसा लिहायचा हे पाहण्यासाठी ऑनलाईन/ ऑफलाईन बरेच मार्ग उपलब्ध आहेत. पण संपूर्ण मजकुराचा स्पेल चेक करून देणारे असे अ‍ॅप मराठीत प्रथमच उपलब्ध होत आहे. त्याचे स्वागत करू या. 

_____

संगणकावर मराठी स्पेल चेक हवा असेल तर शंतनू ओक आणि ओंकार जोशी यांच्या प्रयत्नातून साकार झालेला मराठी शुद्ध चिकीत्सक फायरफॉक्स आणि लिब्रे ऑफिस या सॉफ्टवेअरसाठी एक्स्टिंशनच्या स्वरूपात अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे.

firefox 

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/marathi-dictionary/

libreoffice

https://extensions.libreoffice.org/en/extensions/show/marathi-spellchecker

_____

ज्यांना सिक्युरिटीच्या कारणाने किंवा अ‍ॅपची गर्दी होऊ नये म्हणून हे अ‍ॅप इन्स्टॉल करायचे नसेल त्यांच्यासाठी टेलिग्राम बॉट उपलब्ध आहे. (मराठी स्पेल बॉट आणि संस्कृत वन बॉट)  आयफोन वापरणारे देखील टेलिग्रामसाठी बनविलेल्या या दोन्ही बॉटचा उपयोग करू शकतात.

Marathi Spell Bot

https://t.me/Marathispellbot

_____

Sanskrit One Bot

https://t.me/SanskritOneBot

संस्कृत पानावर संधी आणि विग्रह अशा दोन्ही सोयी उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही जर "कर्मण्येवाधिकारस्ते" असे टाईप केले तर "कर्मणि एव अधिकारः ते" अशी फोड करून मिळेल. तसेच दोन किंवा अधिक शब्द टाईप केले तर त्यांची संधी करून मिळेल. उदा.  "गणेश उत्सव" असे टाईप केले तर "गणेशोत्सव" असे उत्तर मिळेल.