मराठी विकीवरील संदेशः
ज्ञानसंप्पन आणि माहितीसमृद्ध समाज घडवण्यासाठी वाचन संस्कृतीचा विकास व प्रसार आवश्यक आहे. वाचन संस्कृतीचा विकास व प्रसार होण्याचे उद्देशाने भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्याचा जन्मदिवस हा महाराष्ट्र सरकार २०१५ पासून वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. मराठी भाषा विभाग मंत्रालयाच्या आव्हाना प्रमाणे मराठी विकिपीडिया २०१५ पासून १५ ऑक्टोबरला जोडून दरवर्षी वाचन प्रेरणा सप्ताहाचे आयोजन करीत असतो.
१) "ज्ञानसंप्पन" हा शब्द "ज्ञानसंपन्न" असा हवा होता.
२) "प्रसार होण्याचे उद्देशाने" असे न म्हणता आपण "प्रसार होण्याच्या उद्देशाने" असे म्हणतो.
३) "सरकार साजरा करतो" असे न म्हणता आपण "सरकार साजरा करते" असे म्हणतो.
४) "मंत्रालयाच्या आव्हाना प्रमाणे" मंत्रालय सर्वांना उठसुठ आव्हान देत असले तरी इथे मात्र तो शब्द "आवाहनाप्रमाणे" असा वाचावा.
५) "आव्हाना प्रमाणे", "भारत रत्न" असे शब्द हिंदीप्रमाणे तोडून नव्हे तर जोडून लिहिण्याची प्रथा आहे. ती त्रासदायक वाटत असेल आणि सुटे सुटे शब्द वाचायला सोपे वाटत असतील तर मी तसेही वाचण्याची सवय लावून घेईन.
६) "अब्दुल कलाम ह्याचा" असे न म्हणता "अब्दुल कलाम ह्यांचा" असे आपण आदरार्थी बहुवचन वापरतो.
संदेश देण्याघेण्याकरता भाषा हे एक माध्यम आहे आणि माध्यमाने म्हणजेच साधनाने साध्य होण्याचा प्रयत्न करू नये हे ठीक. पण वाचन संस्कृतीचा विकास व प्रसार व्हावा असे खरोखरच वाटत असेल तर भाषेचे प्रमाणीकरण करावे लागेल. तीन-चार वाक्ये समजून घेऊन वाचता येतील. अशी आणखी किती वाक्ये फेरफार करीत वाचणार?