०५ जुलै, २०१३

विद्यार्थीदशेतील प्रवेशाचे स्वागत


माझा सगळ्यात पहिला सल्ला म्हणजे बोलताना शिव्या देता कामा नये. प्रत्येकाचा आदर करायला हवा. आपण जेव्हा शिवी देतो तेव्हा संवादाचा एक मोठा मार्ग आपण आपल्या हाताने बंद करतो. संवाद संपला की शिक्षण संपतं. आणि शिक्षण संपलं की माणूस म्हातारा बनतो. म्हणून शिव्यांपासून लांब राहा. जर सगळे मित्र असंच बोलत असतील तर कोणाशीही मैत्री न करता एकटं राहायची तयारी ठेवा. कोणत्याही धर्मात सुसंगतीचे महत्त्व सांगितले आहे ते यासाठीच.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत शिकत राहा. आणि शिकण्यासाठी चांगली शाळा, चांगलं कॉलेजच पाहिजे असं नाही. आपल्या आजूबाजूचं जग हीच एक मोठी शाळा आहे. एका कवीने म्हटले आहे. "जग हे बंदिशाळा, जग हे बंदिशाळा ! कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला" जग म्हणजे एक तुरुंग आहे असं वाटणं ही कविकल्पना आहे. जग म्हणजे बंदिशाळा नव्हे तर एक मोठी शाळा म्हणजे university  आहे. ज्यात वाईट लोकं आहेत तशीच चांगली लोकं आहेत. एरवी चांगली वागणारी लोकं काहीवेळा भलतंच वागतात, बोलतात. त्यामागेही काहीतरी कारण असतं. प्रत्येक माणसाचा स्वतःचा असा "पॉइन्ट ऑफ व्ह्यू" असतो. तो समजावून घेणं म्हणजे जगाच्या युनिव्हर्सिटीत शिकण्यासारखं आहे. रिक्षा ड्रायवरकडून ट्राफिकमधून मार्ग कसा काढायचा हे शिकूया. वाण्याच्या दुकानात किंवा मॉलमध्ये काम करणाऱ्यांकडून वजन कसं करायचं आणि वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू व्यवस्थित कशा पॅक करायच्या हे नुसतं बघून शिकता येतं की नाही? कधी मोठ्या हॉटेलात गेलो तर तिथली स्वच्छता आणि टिश्यू पेपरचा वापर कसा करायचा हे शिकण्यासारखं वाटत नसेल तर आपण आदर्श विद्यार्थी बनू शकणार नाही. हे शिकून काय करायचं आहे? मला काही हॉटेलात काम करायचं नाही, असा द्रूष्टीकोन ठेवू नका. शिक्षण कधीही वाया जात नाही. ते कधीना कधी आपल्या उपयोगी पडतं.

तिसरी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान फार झपाट्याने विकसित होत आहे आणि त्याचा वेग यापुढे सतत वाढत राहणार आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार मोकळ्या मनाने करायला हवा. मोबाईल आणि इंटरनेट ही या टेक्नोलॉजीची साधने आहेत. ती वापरायला शिकायला हवे. पण त्यांच्या आहारी जाता कामा नये. फेसबुक म्हणजे काही जग नव्हे. फेसबुकवर "लाईक" करणारी लोकं प्रत्यक्षात "हेट" करतात. हे समजेपर्यंत काही वेळा उशीर होतो. आभासी जग आपल्यापरीने आनंद देत असते पण तो आनंद व्यसनातून मिळणार्‍या आनंदासारखा क्षणिक असतो. अशा आनंदाचा शेवट चटकन आणि दु:खकारक होऊ शकतो. म्हणून तंत्रज्ञान वापरताना त्याचा उपयोग नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि आपलं जीवन अधिक व्यवस्थित आणि "ऑर्गनाइज्ड" व्हावा यासाठी केला पाहिजे. त्यासाठी इंटरनेटवर इमेल आहे, कॅलेंडर आहे, आपला डेटा कायमचा सुरक्षित ठेवण्याचीही सोय आहे. हे सर्व न वापरता फेसबुकवर वेळ घालवणं आणि कॉम्प्युटरवर गेम खेळणं म्हणजे एखादं विमान विकत घेऊन त्याचा उपयोग आकाशात उडण्यासाठी न करता घसरगुंडी म्हणून वापरल्यासारखं आहे.

चौथा नियम जो आपण लहानपणापासून पाळायला हवा, तो म्हणजे आपला रोजचा खर्च एका कागदावर लिहायचा. मी हा नियम फार उशिरा शिकलो. त्यापूर्वी आपण वायफळ खर्च करत नाही मग आपल्याला पैसे का पुरत नाहीत असा मला नेहमी प्रश्न पडायचा. मग मी संध्याकाळी किंवा रात्री दिवसभरात केलेला खर्च एका कागदावर लिहायला लागलो. मग माझ्या लक्षात आले की रिक्षावर इतका खर्च का होतो? कारण निघायला उशीर झालेला असतो. सकाळी लवकर उठलो तर लवकर निघता येईल आणि मग रिक्षा, बस किंवा चालत स्टेशनपर्यंत जाण्याचा पर्याय निवडता येईल. खर्च लिहिण्याची ही सवय खूप फायदेशीर आहे. पुढे मोठ्या कंपन्यात काम करताना व्हाऊचर वगैरे भरताना त्याचा उपयोग होईल. मी खर्च लिहीण्यासाठी डायरी वगैरे न वापरता एक कागद वापरतो आणि तो लगेच फाडून टाकतो. कारण हा कागद घरच्यांच्या, विशेषतः वडिलांच्या नजरेस पडला तर खर्च लिहिण्याची ही वाईट सवय आपल्याला का लागली याचा विचार करावा लागेल.

भाषा मधूर आणि दुसर्‍याला आदर देणारी असायला हवी. शिक्षण कधीच संपत नाही आणि ते संपू नये. भावी काळ स्किल्ड लेबरचा असणार आहे. कोणतीच कला अंगात नसेल, कोणतेही व्यावसायिक शिक्षण नसेल, एखाद्या विषयात तज्ञ बनता आले नाही तर कॉम्पिटीशनमध्ये टिकणं कठीण होईल. म्हणून लहान / मोठी प्रत्येक गोष्ट समोर येईल त्या मार्गाने शिकता आली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा आणि म्हणूनच महत्त्वाचा सल्ला म्हणजे दिवसभराचा खर्च रोजच्या रोज एका कागदावर लिहा.

भाषेची मधुरता, न संपणारं शिक्षण, तंत्रज्ञानात आघाडी आणि खर्चावर नियंत्रण ही आपली भविष्यातील चतु:सुत्री असली पाहिजे.

०३ जून, २०१३

बुद्धिवर ज्ञानाचा अंकुश!

मनोगतावर स्त्रियांच्या संशयी स्वभावावर एकाने (स्वानुभवावर आधारित?) लेख लिहिला आहे.

हिडिंबा आणि मेनका !

यात लेखकाच्या बायकोने भीम आणि विश्वामित्रचे उदाहरण देऊन लेखकाला कोणत्याही वयाच्या स्त्रीपासून लांब ठेवलेले दिसते. त्यांनी दिलेले दाखले अगदी बिनतोड आहेत आणि त्यांचा महाभारत व पुराणांचा अभ्यासही गाढा दिसतो. पण लेखकाने त्यांना उत्तर म्हणून लक्ष्मणाचे उदाहरण का दिले नाही? इतिहासात हिडिंबा आणि मेनका आहे तशीच सीताही आहे की!
विषयांतर होईल म्हणून तिथे प्रतिसाद न देता इथे माझे मत लिहितो. रामायणातील एक सुंदर प्रश्नोत्तर हे या संशय पिशाच्चावरचा उतारा आहे. लक्ष्मणाला विचारण्यात येते...
अग्निकुण्डसमा नारी घृतकुण्डसमः पुमान| पार्श्वे स्थिता सुन्दरी चेत् कस्य नोच्चलते मनः॥
अग्नि जवळ आला की तूप वितळते तशी अग्निकुंडासारखी सुंदरी समोर असताना कुणाचे मन विचलित होत नाही?

त्यावर दिलेले लक्ष्मणाचे उत्तर पाहा:
मनो धावति सर्वत्र मदोन्मत्तगजेन्द्रवत्‌| ज्ञानांकुशसमा बुद्धिस्तस्य नोच्चलते मनः॥
मन मदोन्मत्त हत्तीसारखे धावते पण ज्याच्या बुद्धिवर ज्ञानाचा अंकुश आहे त्याचे मन विचलित होत नाही.

तात्पर्य: सगळ्याच स्त्रिया "तशा" नसतात. सगळेच पुरूष "तसे" नसतात. स्त्री पुरुषांच्या नात्यात वैषयिक नात्यापलिकडे खूप काही असते जे दोन भिन्नलिंगांच्या सहजीवनाला उपयुक्त असते. काही वेळा स्त्रियांच्या नजरेने एखाद्या विषयाकडे पाहता येते त्यामुळे आधी न दिसलेले कंगोरे दिसू लागतात. "कायम संशय" हा वैवाहिकच नव्हे तर कोणत्याही नात्यात धोकादायक ठरू शकतो!